विनोदी कथेमध्ये शंकर पाटील, द.मा. मिरासदार, पु.ल.देशपांडे, रमेश मंत्री इ. यांचे  कथा संग्रह प्रसिद्ध आहेत.कथालेखक शंकर पाटील हे नवीन शिक्षणाचे खेड्यात झालेल्या प्रगतीचे व पडझडीचे रेखीव चित्रण आपल्या कथासंग्रहातून करतात. उदा. धिंड, तमाशा, दसरा, वळीव इ. तसेच जुनी कथापद्धती स्वीकारूनही विनोदामुळे मिरासदारांची कथा लक्षणीय ठरलेली आहे. उदा. माझ्या बापाची पेंड, कोणे एके काळी इ.

मानवी जीवन किती विविधतेने नटले आहे, किती संपन्न आहे, बहुरंगी आणि सखोल आहे, याचे दर्शन जी.ए.कुलकर्णी यांच्या कथांतून होते. कोकणच्या पार्श्वभूमीवर भावमधुर अशा कथा जयवंत दळवी व मधु मंगेश कर्णिक यांच्या गहिवर, पारध, इ. कथा संग्रहातून दिसून येतात.

घर हरवलेली माणसे, गुलमोहर, वपुर्वाई इ. व.पु.काळे यांचे कथा संग्रहातून वास्तवतेचे दर्शन होते. विज्ञानविषयक आवड निर्माण व्हावी म्हणून विज्ञानकथा लेखक जयंत नारळीकर यांची ‘यक्षाची देणगी’ प्रेषित अनेक कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. आता अलिकडेच दिपाताई देशमुख यांची ‘जिनीयस’ शास्त्रज्ञांविषयीच्या पुस्तकांची सिरीज खूप सुंदर आहे. रहस्य कथाकार विजय देवधर, श्रीकांत यिनकर, नारायण धारप यांनी आपल्या कथेतून वेगळाच ठसा उमटवला आहे.

तसेच सानिया, अरुणा ढेरे, सुधा मूर्ती यांच्या कथा मार्गदर्शक व उपदेशपर आणि प्रबोधनात्मक आहेत. त्यांच्या कथा आपल्याला नक्कीच आवडतील.

बरं का मुलांनो, आपल्या आवडीच्या बाल वाङ्मयातील कथालेखकांनी खूप सुंदर गोष्टी लिहिल्या आहेत. दत्ता टोळ, संगिता बर्वे, धनश्री देसाई, राजीव तांबे, स्वाती राजे इ. भरपूर लेखकांनी आपल्यासाठी छान छान गोष्टींची पुस्तके लिहिली आहेत. आपण नक्की वाचा. आणि हो एक गोष्ट आपण सुद्धा लिहा हं...!

अशा रितीने मराठी वाङ्मयातील ‘कथा’ हे वाङ्मय नावारूपाला आले आणि आज मराठी साहित्यात कथा, लघुकथा या वाङ्मयाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाला आहे.

आमच्या घरातील हा सदस्य तुम्हाला आवडला का? नक्की कळवा बरं...!

- गायत्री जवळगीकर,

 ग्रंथपाल, म.ए.सो. मुलांचे भावे हायस्कूल, पुणे.