सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी झाली होती. अजूनही फटाक्यांचा थोडा आवाज येतच होता. सुट्टीचे आणखी काही दिवस शिल्लक होते. यंदा राहुलच्या घरी सर्वच कुटुंबाने एकत्र दिवाळी साजरी केली होती. म्हणून सर्वांनी मिळून ठरवले की, दोन दिवस निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहायचे.

ठरल्याप्रमाणे राहुलच्या घरचे 25, 30 जण एका जंगलातील निसर्गरम्य ठिकाणी गेले. पूर्ण दिवस जंगलभर हिंडले, खाल्ले, पिल्ले, नाचले, गायले, मस्ती केली आणि संध्याकाळी गप्पा मारत गाण्याच्या भेंड्या खेळत झाडाखाली बसले.

अचानक बसलेल्या लोकांच्या भोवताली वडाच्या पारंब्यांचे जाळे बनायला लागले. जणू काही पिंजर्‍यामध्ये माणसांना बंदिस्त केले आहे आणि चारही बाजूंनी वेगवेगळे प्राणी, पक्षी, वेली, ढग, नदी, तलाव, कीटक इत्यादी येऊन उभे राहिले आहेत. राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना कळलेच नाही, काय चालू होते ते. क्षणात तिथे झाडेवेलींच्या खुर्च्या तयार झाल्या व त्यावर जंगलचा राजा सिंह, समुद्र, चंद्र, सूर्य, आकाश अशी मोठी मंडळी विराजमान झाले आणि त्या ठिकाणाला वनदरबाराचे रूप आले.

सिंह म्हणतो, ‘वनदरबारातील कोर्टाची कारवाई सुरू करा.’’ राहुलचे बाबा म्हणाले, ‘‘हे काय चाललंय? आम्हाला असं पिंजर्‍यात का कोंडलंय?’’ सागर म्हणला, ‘‘तुमच्यावर निसर्गातील बर्‍याच गोष्टींनी आरोप केले आहेत.’’ काका म्हणतात, ‘‘का पण, आम्ही काय केले आहे?’’ ढग म्हणतो, ‘‘तुम्ही आम्हाला न विचारता आमच्या हद्दीत आलात आणि याशिवाय निसर्गातील बर्‍याच गोष्टींचे तुम्हा लोकांवर विविध आरोप आहेत. आम्ही खूप दिवसांपासून माणसांच्या अशाच मोठ्या टोळीच्या शोधात होतो.’’ मामा म्हणाले, ‘‘अहो, पण आम्हालाच का पकडलय तुम्ही?’’

चंद्र म्हणाला, ‘‘हे पहा, आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यावर आरोपपत्र ठेवणार आहोत. तुम्हाला जी शिक्षा मिळेल ती तुमच्या मानव साथीदारांना पण भोगावी लागेल.’’

आकाश म्हणाले, ‘‘नैसर्गिक आपत्तींसाठी तुम्ही निसर्गाला दोष देता. आम्हाला याचा खूप मानसिक त्रास होतो. निसर्गाच्या असमतोलावर कधीतरी शांतपणे विचार करा. याची कारणं शोधा. तुमच्यामध्येच याची कारण, उत्तरं दडलेली आहेत.’’

हत्ती म्हणाला, ‘‘तुम्ही जंगले तोडून जंगलात अतिक्रमण करता, नदीच्या पात्रालगत घरे बांधता, डोंगर फोडून वस्ती करता, नदीत राडारोडा टाकता, सांडपाणी सोडता, रासायनमिश्रित पाणी सोडता, झाडे तोडता, प्रचंड प्रमाणात ध्वनी, वायू, जल प्रदूषण करता, समुद्रातून तेल उपसण्यासाठी समुद्रजीवांचे नुकसान करता.’’

पिंपळ म्हणाला, ‘‘एकंदरीत काय तर, निसर्गावर सतत अतिक्रमण करायचे. निसर्गातील गोष्टींचा योग्य प्रमाणात नाही, तर अति प्रमाणात वापर करायचा आणि स्वतःच बनवलेली म्हण विसरायची, अति तेथे माती.’’

हे ऐकून राहुलच्या कुटुंबियांच्या माना शरमेने खाली गेल्या.

सिंह म्हणाला, ‘‘आज वनदरबारात सर्व मानवांना शिक्षा सुनावण्यात येते की, प्रत्येकाने एक झाड लावायचे व त्याचे जतन करायचे. प्राणी-पक्ष्यांची काळजी घ्यायची, परिसर स्वच्छ ठेवायचा आणि असे न करणार्‍या मानवाला निसर्गातील एकाही गोष्टीचा उपभोग घेता येणार नाही.’’

राहुलचे कुटुंब शिक्षेचा स्वीकार करतात आणि क्षणार्धात त्यांच्या भोवतालचा पिंजरा, सर्व प्राणी, पक्षी, ढग, नदी नाहीसे होतात.

तिथून घरी आल्यावर राहुल ‘निसर्ग आपला सखा’ या समितीची स्थापना करतो व त्या अंतर्गत पर्यावरण संवर्धनाचे विविध कार्यक्रम राबवतो.

- शहनाझ हेब्बाळकर, सहशिक्षिका

एच.ए. स्कूल पिंपरी