आपण कोणतेही चांगले काम केले की, मोठी माणसे आपले कौतुक करतात. आपल्याला ते आवडतेच. त्यांच्या शाबासकीतून एक प्रेरणा मिळते ना! आपल्या आजूबाजूला आपल्याच वयाच्या मित्र-मैत्रिणी अशीच काही धाडसी कामे करत असतात. त्यांच्या धाडसाचे कौतुक म्हणून आपले शासन त्यांना एक पुरस्कार देते. कोणाला, कधी आणि कसा दिला जातो हा पुरस्कार? जाणून घेऊ या.

२ ऑक्टोबर १९५७ रोजी महात्मा गांधी जयंंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दिल्लीतील रामलीला मैदानावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मुलांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पाहत होते. कार्यक्रम चालू असताना शॉर्टसर्किटमुळे कार्यक्रमासाठी उभारलेल्या शामियान्याला आग लागली. एवढ्यात तिथे उपस्थित असलेल्या स्काउटमधील एक १४ वर्षांचा मुलगा पुढे आला. त्याने आपल्याजवळील चाकूने जळणार्‍या शामियान्याचे कापड फाडून बाजूला केले आणि प्रेक्षकांना बाहेर जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. त्याच्या या प्रसंगावधानाने शामियान्यात उपस्थित असलेल्या हजारो जणांचे जीव वाचले. त्या धाडसी मुलाचे नाव होते हरिश्‍चंद्र मेहरा.

हरिश्‍चंद्रचे प्रसंगावधान पाहून पंडित नेहरूंना आश्‍चर्य वाटले. त्याच्या शौर्याचे त्यांनी कौतुक केले. या घटनेतून प्रेरणा घेऊन देशभरातील धाडसी लहानग्यांना ‘शौर्य पुरस्कार’ देऊन त्यांचे कौतुक करण्यात यावे, अशी संकल्पना त्या वेळी पंतप्रधानांनी मांडली. त्याला मान्यता मिळून पंडित नेहरूंच्या हस्ते १९५८ साली हरीश्‍चंद्रला पहिल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून ६ ते १८ वर्षे या वयात कठीण प्रसंगी शौर्य, धाडस दाखवणार्‍या देशाभरातील मुला-मुलींना केंद्र सरकार आणि आय.सी.सी.डब्ल्यू (खपवळरप र्उेीपलळश्र षेी उहळश्रव थशश्रषरीश) यांच्या वतीने शौर्य पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पुढे या पुरस्काराच्या स्वरूपात अनेक बदलही होत गेले.

संजय चोप्रा आणि गीता चोप्रा या बहीण-भावंडांचे अपहरणकर्त्यांनी त्यांना मारले. या भावडांची आठवण म्हणून १९७८ पासून एका मुलीला आणि एका मुलाला शौर्य पदक देण्यात येते.

शौर्य पुरस्कार, बापू गायधनी पुरस्कार, संजय चोप्रा पुरस्कार, गीता चोप्रा पुरस्कार आणि भारत पुरस्कार या पाच प्रकारांमध्ये शौर्य पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये भारत पुरस्कारासाठी सुवर्ण पदक, तर इतर चार पुरस्कारांसाठी रौप्य पदक प्रदान करण्यात येते. या पुरस्कारांचे स्वरूप पदक, मानपत्र आणि मानधन असे असते. तसेच, पुरस्कारप्राप्त मुलास पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक मदत केली जाते. इंदिरा गांधी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रविद्या निकेतन अशा शाखांसाठी आरक्षित जागा दिल्या जातात.

दर वर्षी शौर्य पुरस्कारासाठी आय.सी.सी.डब्ल्यू.कडे देशभरातील अनेक राज्यांतून अर्ज येतात. राज्य सरकार आपल्या राज्यातील अशा धाडसी मुलांची माहिती आय.सी.सी.डब्ल्यू.कडे पाठवते. ३० सप्टेंबर ही अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे. आलेल्या अर्जांतून, माहितीतून शौर्य पुरस्कारसाठी ज्या मुलांची निवड झाली आहे, त्यांची नावे १४ नोव्हेंबर बालदिनी जाहीर केली जातात. २६ जानेवारी या आपल्या प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी राजपथावर होणार्‍या समारंभात आपल्या बाल शूरवीरांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. आपल्या नॅशनल चॅनेलवर हा सोहळा दाखवला जातो.

यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा आवर्जून पाहा. आपल्या देशातील मित्रांनी काय काय पराक्रम केले, ते बघा. आपल्या राज्यातील, शहरातील, गावातील कोणी असे शौर्य दाखवले असेल, तर त्याची माहिती घ्या.

- रेश्मा बाठे