उन्हाने शुष्क झालेल्या मातीवर जेव्हा पावसाचे टपोरे थेंब पडतात. तेव्हा किमया घडून येते आणि काही दिवसातच सारं काही हिरवंगार होऊन जातं. पावसाळा संपायला लागला की, त्याही दिसेनाशा होतात. खरंच नवल करण्यासारखं आहे हे !

१) शेवळ – एखाद्या भाल्याप्रमाणे या वनस्पतीच्या फुलांची रचना असते. या वनस्पतींची उंची ३०-९० सें.मी. असते. तर फूल पाच सें.मी. असते. याची फुले पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दिसतात. ही वनस्पती प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळते. शेवळाला एकदा का फुलोरा येऊन गेला की मग तिला पानं फुटतात. पिवळट रंगाचं हे असतं.
२) रानहळद – रानहळदीला येणारा फुलोरा खूप सुंदर दिसतो. याची सुंदर फुलं देठावर येतात. देठाचा शेंडा जांभळ्या, गुलाबीही रंगाचा असतो. फुले पिवळ्या रंगाची असतात. त्यांचा आकार एक-दोन सें.मी इतका असतो. डोंगराळ भागात उतारांवर रानहळद बऱ्यापैकी दिसून येते. ही वनस्पती प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळते.
३) काळी मुसळी – ताऱ्याच्या आकाराची १-१.५ सें.मी. फुलोरा असणारा वनस्पती. वनस्पतीची वाढ १५-२० सें.मी. फुलांचा रंग पिवळा. फुलाची वाढ जमिनीलगतच होते. ह्या वनस्पतीचा आढळ शुष्क जागा वगळता संपूर्ण भारतभर.
४) कळलावी – लाल रंगाचा शेंडा व खाली पिवळा अशी रंगरचना असलेला फुलोरा म्हणून संस्कृतमध्ये त्याला अग्निशिखा असे संबोधले जाते. फुलाची उंची ८-१० सें.मी. असते. वनस्पतीची वाढ वेलीप्रमाणे असते. पानांच्या टोकाची रचना आधार देणाऱ्या तंतूप्रमाणे असते. प्रसुतीच्या वेली येणाऱ्या कळा वाढवण्यासाठी हिचा वापर होतो.
५) पेव – ही एक ते दीड मीटर वाढणारी वर्तुळाकार जिन्याप्रमाणे वाढणारी वनस्पती आहे. याच्या शेंड्याला पांढऱ्या रंगाची फुले येतात. आपल्या देशात शुष्क प्रदेश सोडून सर्वत्र ही दिसून येते. याच्या मुळांचा वापर औषधांमध्ये होतो. अशा अनेक वनस्पतींची वाढ पावसाच्या आगमनाने होते. याचा फुलोरा देखील याच ऋतूत पहावयास मिळतो. यांचा मनाला भुरळ घालणारी फुलोरा व त्यांचे ओषधी गुणधर्म पाहता त्या जंगलातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा त्या गोळा न करता यांच्या संवर्धनासाठी जंगल राखायला होते.
६) भुईचक्र – पावसाळा सुरु झाला की जमिनीत सुप्तावस्थेत असलेल्या बियांना, कंदांना जाग येते. पाण्याच्या थेंबाने त्यांना नवजीवन मिळते. हिरवे नाजूक अंकुर मातीतून बाहेर येतात. तरारून वाढू लागतात. रानावनात वाढणाऱ्या जमिनीवर पसरण्याची या गवत सदृश छोट्याशा झाडांचे आयुष्यसुद्धा फार थोड्या काळाचे. तेवढ्या काळात ते फुलतात आणि पुन्हा बीच्या रुपात जमिनीत जाऊन बसतात. ते हे भुईचक्र नावाप्रमाणे जमिनीला चिकटून पसरट वाढणारी ही वनस्पती कंदाच्या चार-पाच पानातून तुरे बाहेर येतात. या तुऱ्यावर फुलणारी फुलं म्हणजे भुईचक्राची फुले. हलक्या जांभळ्या, गुलाबी रंगाच्या सहा टोकदार पाकळ्या २ सें.मी. लांबीच्या तर आत प्रत्येक पाकळीच्या तळात असलेले छोटेसे पिवळे पुंकेसर आणि मध्यभागी असलेला स्लीकेसर असे त्याचे नाजूक रूप आकर्षक असते. छोटंसं रानफुल असले तरी निसर्गात स्वतःच्या सौंदर्याने भर घालायला विसरत नाही.

अशी बरीच रानफुलं बराच काळ सुप्तावस्थेत राहून पावसाची वाट पहात असतात. त्यांचं आयुष्य जरी अल्पकाळ असलं तरी निसर्गात आनंदात डोलणारी आणि लोकांना नेत्रसुख, आनंद देत पटकन भूमीत लपून जाणारी !

- मीनल पटवर्धन