विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आमच्या घरातील तुम्हा सर्वांना अतिशय प्रिय असणाऱ्या अशा सदस्याची ओळख करून देत आहे. त्याचं नाव आहे कथा म्हणजेच गोष्ट. विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट ऐकायला, लिहायला, वाचायला आवडते हो की नाही...जाणून घेऊयात कथेविषयीची माहिती.

कविता, कशी तयार झाली ते वाचलं. त्यांनतर विष्णूशास्त्री चिपळूणकर, शि.म.परांजपे यांनी समाज प्रबोधनासाठी निबंध लिहायला सुरु केले. वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागले. परंतु साधारण लोकांना ते उमजत नव्हते म्हणून मनोरंजनाच्याद्वारे लोकशिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रयत्न सुरु झाले. गोष्टी सांगण्याची आणि त्यांच्याद्वारे मनोरंजन किंवा बोध करण्याची जगामधील अत्यंत जुनी पद्धत आहे. तिला क्वचित दंतकथा (एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेली) अथवा ऐतिहासिक गोष्टीचा आधार असतो.

तुम्ही चक्रधरस्वामींच्या ‘लिळाचरित्र’ या ग्रंथातील ‘दृष्टांतकथा सात आंधळ्यांची’ नक्की वाचा आणि तेथूनच कथेची निर्मिती झाली. कथेचे अनेक प्रकार आहेत. १) दंतकथा २) पौराणिक कथा ३) ऐतिहासिक कथा ४) सामाजिक कथा ५) वैज्ञानिक कथा ६) विश्लेषणात्मक ७) साहसकथा ८) शृंगारकथा ९) विनोदी कथा ११) हेरकथा १२) रहस्य कथा १३) अद्भुत कथा इ.

कथा या दोन प्रकारच्या असतात. मनोरंजन आणि ध्येयपर लेखक काही विशिष्ट हेतूने लिहितो. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच काही विशेष प्रकारचे ध्येय बोध त्या कथेत असते. त्याद्वारे ही लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला जातो. सिंदबादच्या सफरी, गॅलिव्हरचा वृतांत इ. या अद्भुत कथाच आहेत.

जेष्ठ कथाकार हरी नारायण आपटे यांनी मराठी वाङ्मयामध्ये कथेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. हरिभाऊंच्या कथा या वस्तुस्थितीदर्शक, उपदेशप्रधान सानंदबोध देणाऱ्या असून सामाजिक वास्तवाचेही भान त्यातून होते.

त्यांच्या पाडव्याला भेट, पक्की अद्दल घडली, भुताटकीचे घर इ. स्फुट गोष्टी प्रसिद्ध आहेत. अशा रितीने कथेचा प्रवास सुरु झाला. यानंतर प्रारंभीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन समाजसेवेचे व्रत चालविणाऱ्या काशिताई कानिटकर,  आनंदीबाई शिर्के इ. कथालेखिकांनी  आपल्या कथेमधून ठसा उमटविला व प्रबोधन केले.

य.गो.जोशी यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नात्यागोत्यातील भावबंधावर आधारलेल्या अनेक सुरस कथा वाचकांना मिळाल्या. अनंत काणेकर, वामनराव चोरघडे, अरविंद गोखले, वा.म. जोशी, दि.कृ. केळकर इ. कथाकार होऊन गेले. त्यांच्या कथा आपल्याला पाठ्यपुस्तकात सुद्धा वाचायला मिळतात. दर्जेदार ग्रामीण कथांसाठी व्यंकटेश माडगूळकर यांच्या माणदेशी माणसं, गावाकडच्या गोष्टी इ. कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

- गायत्री जवळगीकर,

ग्रंथपाल, म.ए.सो. मुलांचे भावे हायस्कूल, पुणे.