"आभाळाचे गुपित' - प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी पूरक वाचन

या किशोरांसाठीच्या विज्ञान कवितासंग्रहाला 'आभाळाचे गुपित' हे कुतूहलजनक शीर्षक देऊन किशोरवयीन वाचकांची जिज्ञासा जागृत करण्यात, प्रथमदर्शनीच कवीची कल्पकता यशस्वी ठरली आहे. मुखपृष्ठावरील किशोरवयीन मुलगा दुर्बिणीतून आकाशातील ग्रहताऱ्यांचे निरीक्षण करत आहे व तत्सम वयाची एक किशोरी निरीक्षणाच्या नोंदी वहीत नोंदवीत आहे. दोघांच्याही नेत्रात कुतुहल आणि आनंद तेजाळत आहे. वर अनंत लुकलुकणारे तारे दाटीवाटीने आपली उपस्थिती अधोरेखित करत आहे. असे बोलके मुखपृष्ठ लाभलेला हा काव्यात्मक विज्ञान ज्ञानकोश आपल्या स्वरुपाचा एकमेवाद्वितीय काव्यसंग्रह असावा असे वाचतांना पदोपदी (कडव्याकडव्यातून) जाणवते.

पहिलीच कविता 'आभाळाचे गुपित' ही आहे. याच कवितेचा संग्रहाला नाव देण्यासाठी वापर करणे, यावरून प्रा.देवबा पाटील यांची चाणाक्षता लगेच लक्षात येते. या कवितेत कोणतेही सत्य स्वीकारतांना ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासूनच स्वीकारले पाहिजे; तेथे अंधश्रध्देला थारा असता कामा नये, हे आवर्जून सांगितले आहे.

‘आकाशगंगा' कवितेत आकाशगंगेची सोपी सरळ व्याख्या करून आकाशगंगेत येणाऱ्या ग्रहताऱ्यांची ढोबळमानाने माहिती देऊन तिच्या व्याप्तीचा व अनंततेचा सूतोवाच केला आहे. ग्रहताऱ्यांचे आपसातील संतुलन व त्यास कारणीभूत असलेले गुरुत्वाकर्षण याविषयीची शास्त्रीय माहिती 'गुरुत्वाकर्षण' या कवितेत पुढीलप्रमाणे दिली आहे.

"ताऱ्यांना असते । गुरुत्वाकर्षण । त्यांच्या ग्रहांना। ते ठेवती गुंतवून।।"

 

'ग्रह-तारे' या कवितेत ग्रहताऱ्यांची निर्मिती प्रक्रिया, धनता, गती, गुरुत्वबल आदींचा सूचक उल्लेख केला आहे. 'सूर्यमाला' कवितेअंतर्गत सूर्यमालेची सुटसुटीत व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. "सूर्य, ग्रह, उपग्रह। लघुग्रहांचा मेळा।ह्यांपासून बनली। आपली सूर्यमाला।।"

तसेच ग्रह, उपग्रह, उल्का, धूमकेत, पृथ्वी आदींच्या निर्मितीची तोंडओळख करून दिली आहे. 'सूर्य' कवितेत सूर्याची भ्रमंती व त्याचे पृथ्वीशी असलेले नाते विशद केले आहे.'

 

नवग्रह शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. कवीने 'नवग्रह' कवितेत नवग्रहांची नावे व सूर्यापासून कोण जवळ, कोण दूर, मंगळाच्या तांबूस रंगाचे रहस्य, गुरू, शुक्र, शनी, युरेनस इ.ची वैशिष्टये आदींचा उहापोह केला आहे. 'पृथ्वी'कवितेतून पृथ्वीची निर्मिती, भ्रमणकक्षा, सूर्य व चंद्राशी असलेले भौगोलिक संबंध स्पष्ट झाले आहेत.

'निळे आकाश' कवितेमध्ये प्रकाशात सामावलेले सप्तरंग व परिणामी प्रकाशाचा पांढरा रंग तसेच आकाशाचानिळा रंग यांची कारणमीमांसा दिली आहे. सूर्य लहान मोठा असत नाही, पण उगवतीचा व मावळतीचा सूर्य मोठा कादिसतो, याचे शास्त्रीय विवेचन 'मोठा सूर्य' या कवितेत दिले आहे. 'चंद्र'कवितेमध्ये चंद्राची उत्पत्ती, पृथ्वीचा उपग्रह, कलेकलेने होणारी प्रकाशवाढ वा घट, त्याचे परप्रकाशित्व आणि पृथ्वीवरून दिसणारी मोहकता इ.चे सुंदर निरुपण केले आहे. 'चांदण्या' कवितेत स्वयंप्रकाशी तारे म्हणजेच चांदण्या असे सांगून त्यांचा कमीजास्त प्रकाश व रंगभिन्नता यावरहीप्रकाश टाकला आहे. याचप्रमाणे 'चंद्रडाग', 'सौरडाग', 'उल्का' आदींची आवश्यक माहिती सुंदरश्या कवितांमध्ये दिली आहे.

'धूमकेतू' कवितेत आगळ्या वेगळ्या डोके, धड, शेपटी अशा अजस्त्र शेंडे नक्षत्राची माहिती दिली आहे. (कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत'या त्यांच्या अजरामर कवितेत धूमकेतूचा उल्लेख 'पिसाटापरि केस पिंजारून धूमकेतू करी प्रीतीचे आर्जव' असा केला आहे.) शेवटच्या 'तेजोमेघ', 'कृष्णविवर', 'अवकाश' ह्या कविताही वैज्ञानिक माहितीवर आधारित असून किशोरांची जिज्ञासा भागविणाऱ्या आहेत. '

कवी प्रा.देवबा पाटील यांनी किशोर गटाला डोळ्यांसमोर ठेवून 'आभाळाचे गुपित' या कवितासंग्रहातील कवितांची भाषा अतिशय सोपी, सरळ ठेवली असून दिलेली माहितीही सहज आकलन होणारी आहे. मात्र हा संग्रह केवळ किशोरवयातील मुलामुलींसाठी आहे, असे म्हणून चालणार नाही. सर्वसामान्य वाचकालाही ही माहिती वाचायला आवडेल. मांडणी व शब्दयोजना इतकी सुटसुटीत आहे की कोणीही सहज वाचनानंद घेऊ शकेल. एका बैठकीत वाचता येईल असा हा लघुकिशोर विज्ञान काव्यसंग्रह आहे. विज्ञानासंबंधीची शास्त्रोक्त माहिती साध्यासोप्या भाषेत मुलांना समजावून सांगणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यातही ती माहिती काव्यमय असल्यास मुलांच्या मनावर ती माहिती चांगल्याप्रकारे बिंबते व कायम राहते. त्यामुळे हा संग्रह मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून पूरक वाचन म्हणून लावण्याची गरज आहे,

असे मला मनापासून वाटते. तसा प्रयत्न कवी आणि प्रकाशक यांनी करणे गरजेचे आहे. प्रा. देवबा पाटील यांचे नाव सर्वांनाच सुपरिचित आहे. ते जेष्ठ साहित्यिक आहेत. त्यांच्या 'आभाळाचे गुपित' या अभिनव विज्ञान कविता संग्रहाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. शुभं भवतु.

  • प्रा.डॉ.राम नेमाडे, रामनिवास, अजंठा सोसायटी, नांदिवली पथ, डोंबिवली (पू.), जि.ठाणे४२१२०१. मो.८७६७८०३५३५