चित्र म्हणजे काय हेही समजत नसतं त्या वयात मुलं हातात पेन्सिल धरून कागदावर किंवा एखाद्या भिंतींवरही खडून रेघोट्या ओढून चित्रं काढतात. थोडक्यात शब्दांच्याही आधी मुलं चित्राला जवळ करतात. आपल्या भवतालचं जग हे चित्रांद्वारे समजून घेणं त्यांना सोपं जातं. चित्राचा आकार, रंग हे त्यांचं लक्ष वेधून घेतात. आपल्या कल्पनेनुसार चित्र काढण्याचा, पाहण्याचा आनंद मनापासून लुटतात.
 
अशाच काही बालकलाकारांच्या मोहिन शैलीतल्या चित्रांचं प्रदर्शन सुरु झालं आहे. कोथरूडमधल्या हॅपी कॉलनीत, पूना गाडगीळ अॅन्ड सन्स यांच्या शोरूममध्ये बारा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत आणि  सकाळी अकरा पासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. श्रुती पानसे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे. 
 
पुण्यातले आर्ट टिचर आणि ग्राफिक डिझायनर मिलिंद देशपांडे यांची ही शैली असून ते गेली काही वर्षं ही कला शिकवत आहेत. मोहिन चित्रं म्हणजे मिनिएचर शैलीचं एक वेगळं रूप. नाजूक, बारीकसारीक कलाकुसर असलेलं, उजळ, तजेलदार रंगांची उधळण करणारं. मोठ्यांइतकंच मुलांनाही भावणारं. म्हणून तर इयत्ता तिसरी ते आठवी अशा वयोगटातल्या विक्षा केंजळे, तनिष्का उमाळकर, प्रणव कोंडपल्ली, प्रणव ब्रम्हे, शुभांगी सिंग, हेरंब मेंडकी, शुभंकर सहस्त्रबुद्धे, अर्णव पत्की या बालकलाकारांनी ही चित्रं काढली आहेत. जी पाहून खरंच थक्क व्हायला होतं. 
 
मुलांच्या दृष्टीनं या चित्रांचं विशेषत्व असं की एरवी लिहायला कंटाळणारी, बैठक आणि चिकाटी नसणारी मुलंही ही चित्रं काढायला उत्सुक असतात. यानं त्यांची एकाग्रता, कल्पनाशक्ती, चिकाटी, अभ्यासूवृत्ती, आत्मपरीक्षण या सगळ्यांत वाढ होते. 
 
- तृप्ती कुलकर्णी