बालदिन...

दिंनाक: 14 Nov 2019 16:13:45


नमस्कार  बालदोस्तांनो... दिवाळीची सुटी संपून शाळा सुरू झाली असेल ना? शाळा सुरू होताच तुमच्यासाठी  एक सरप्राईज तुमची वाट पाहतंय. कोणतं ते आठवा बरं! आठवलं...अगदी बरोबर

तुमचा आवडता ‘बालदिन’

शाळेत आता तो मोठ्या उत्साहात साजरा होईल.

खरं तर जागतिक बालदिन हा २० नोव्हेंबरला साजरा केला जातो. पण भारतात मात्र तो आपण पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजे १४ नोव्हेंबरला साजरा करतो.  बालकांनी अधिक सक्षम व्हावं, त्यांना प्रगतीचा उत्तमोत्तम संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी मोठ्यांकडून अनेक योजना आणि कार्यक्रम या दिवशी राबवले जातात.

पण दोस्तांनो मोठी माणसं जरी आपल्यावर उत्तम संस्कार करत असली तरी काही संस्कार हे भवतालाच्या निरीक्षणांमधून आपणच आपल्यावर करून घ्यायचे असतात. मधमाशी ज्याप्रमाणे जे जे उत्तम ते ते अगदी नेमकं निवडून घेते, तसं आपल्याला योग्य ते निवडता यायला हवं. ज्यायोगे आपली घडण्याची प्रक्रिया ही अव्याहत चालू राहिल.

मी लहान असताना मला मराठी पुस्तकं वाचायला फार आवडायची, पण इंग्रजी पुस्तकं वाचताना तितकीशी मजा येत नसे आणि हिंदी वाचताना तर फारच कंटाळा यायचा.

एक दिवस इंग्रजीच्या तासाला आमच्या बाईंनी सत्यजित रे यांनी लिहिलेली एक सुरेख गोष्ट सांगितली . यावेळी मूळ इंग्रजी गोष्ट वाचायला मिळाली तर... असं मनात येऊन गेलं आणि शोधाशोध करून ती मिळवली आणि वाचली सुद्धा. तेंव्हा मला त्यातली खरी गंमत कळली. पुढे सत्रजित रेंच्या इतर गोष्टी मी मिळवून वाचला. रस्किन बॉन्ड यांच्याही कथा मला वाचायला आवडू लागला. इंग्रजी वाचनाची गोडी लागल्यावर साहजिकच मी हिंदीकडेही वळले. प्रेमचंद शरदचंद्र यांच्या छोट्या गोष्टी आवडायला लागल्या. मग ही यादी पुढे खुप वाढत गेली.

या अवांतर वाचनाचा मला पुढे माझ्या इतर भाषिक मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना फार उपयोग झाला. त्यांच्या धारणा, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरीती यांच्याशी मला सहज जोडून घेता आलं.

बालपणी मिळवलेलं ज्ञान पुढे असं कामी आलं. त्यामुळे मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषाही आपल्याला यायला हव्यात.

तुमच्रा शाळेप्रमाणे आमच्याही शाळेत बालदिन साजरा होत असे. पण त्याचे स्वरूप मात्र थोडं वेगळं होतं.

त्या दिवशी मुलांना शाळेचे तास नसतं. तर मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात. स्पर्धेचे निकालही त्याच दिवशी लागतं आणि बक्षीसही ताबडतोब दिली जात.

एक वर्ष आमच्या वर्गात फळं आणि भाज्या यांच्या साहाय्याने सजावट करण्याची स्पर्धा घेतली गेली. सगळ्यांनी अगदी हिरीरीने त्यात भाग घेतला. चांगली चांगली फळं आणि भाज्या निवडून त्यापासून वेगवेगळे आकार तयार करण्यात सगळे अगदी गढून गेले होते. शिक्षक सगळ्याचं बारकाईने निरीक्षण करत होते.

होता होता स्पर्धेची वेळ संपली. काहींची सजावट पुर्ण झाली होती तर काहींची अपूर्णच राहिली होती.

कोणाचा पहिला नंबर येऊ शकतो याचा अंदाज जसा तुम्ही बांधता, अगदी तसाच तो आम्हीही बांधला होता. साधारण त्याप्रमाणेच पहिला-दुसरा नंबर घोषित झाला.  मात्र गंमत पुढेच होती. जेव्हा तिसरा नंबर दिला गेला तेव्हा सगळेच विचारात पडले. कारण तो ज्या मुलीला मिळाला तिची तर सजावट अपूर्ण होती.

आमच्या चेहऱ्यावर उमटलेलं आश्चर्य आमच्या बाईंनी अचूक ओळखलं .

त्यामुळे बक्षीस देण्याआधी त्यांनी खुलासा केला की हे तिसरं पारितोषिक त्या मुलीच्या कामातल्या चिकाटीमुळे तिला मिळाले आहे. इतर मुलं काय करतायत , कोणाचं किती चांगलं झालयं हे बघण्यात वेळ न घालवता ती आपल्या कामात गढून गेली होती. मक्याच्या कणसाच्या सालींपासून बाहुली तयार करताना अनेक वेळा तिची बाहुली खाली पडे, तिचे पदर विस्कटून जातं तर कधी ती नीट उभीच रहात नसे. पण तिने शेवट पर्यंत झटून प्रयत्न केला. आशा सोडली नाही. आपलं काम जिद्दिने पुर्ण करण्याची तिची ही धडपड बाईंनी हेरली आणि म्हणूनच तिला बक्षीस मिळालं होतं.

आम्हा मुलांच्या मनावर ती गोष्ट कायमची ठसली. 

तेव्हा दोस्तांनो बालदिन उत्साहात साजरा करताना आपल्याला नवीन काय शिकता येईल याकडे जरूर लक्ष द्या.

मजा करा , आनंद घ्या.

बालदिनाच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा . . .

- मैत्रेयी केळकर