“A dream is not What you see in sleep ; Is the thing which doesn’t let you sleep.” असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात.

जगण्याशी नातं जोडताना एक नवीन भविष्य, नवी ओळख निर्माण करण्यास प्रेरित करून नवी दृष्टी व नवचैतन्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात ती स्वप्नं असतात.

छोटी स्वप्नं व मनातील अपेक्षांना स्वप्नांची सांगड घालून भविष्य आपल्या हाताने सजवण्यासाठी पाहिलेली मोठी स्वप्नं असे स्वप्नांचे प्रकार असतात. एखादं छोटं स्वप्न साकारताना अपयश आल्यास आपण स्वप्नांच्या बाबतीत निष्क्रिय बनतो आणि मनातून त्या स्वप्नाचा विचार काढून टाकतो. परंतु मोठी स्वप्ने पाहणे, ही एक प्रक्रिया आहे. पण ही प्रक्रिया नेहमी स्पष्ट, सोपी असेलच असे नाही. तरीही मोठी स्वप्ने पाहिल्यामुळे शोध, उत्तेजन व समाधान या मानवी गरजा पूर्ण होतात. म्हणूनच पाहायची असतात मोठी स्वप्ने!

ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ ‘गटे’ यांनी म्हटले आहे, “मोठी स्वप्ने पाहण्याचे साहस करा; कारण साहसामध्ये प्रतिभा, शक्ती व जादू असते.” मनात जिद्द निर्माण करतात ती स्वप्नं असतात; तर संघर्षमय प्रसंगात आत्मविश्‍वासाने उद्दिष्टाप्रत वाटचाल करून यश संपादन करण्यास प्रेरित करतात ती मोठी स्वप्नं ठरतात.

वयाच्या अवघ्या १६व्या वर्षीच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणार्‍या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे महान स्वप्न पाहिले. त्याच्या पूर्तीसाठी महाराजांनी अत्यंत बिकट परिस्थितीत स्वकीय व परकीय शत्रूंचा बंदोबस्त करून भगवा झेंडा फडकवला.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘इन्कलाब झिंदाबाद’ या घोषणा देत हसत फासावर चढणारे क्रांतिकारक, नेते, समाजसुधारक, देशभक्त यांनी पाहिलेले स्वतंत्र भारताचे उत्तुंग स्वप्न. या त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामुळेच तर दीडशे वर्षं गुलामगिरीत असलेला भारत देश स्वतंत्र राष्ट्र बनले.

भारतीय स्त्रियांची - विधवा, परित्यक्ता, कुमारी मातांची वाईट अवस्था पाहून काळीज गलबलून जाणारे, आपल्या प्रथम पत्नीच्या निधनानंतर विधवेशी जाणीवपूर्वक विवाह करणारे ‘महर्षी आण्णा’. त्यांनी स्त्री शिक्षणाचे, स्त्री उद्धाराचे व उत्कर्षाचे पाहिलेले उत्तुंग स्वप्न त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज हिंगण्याच्या माळावर फुलताना दिसत आाहे.

दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेल्या स्वप्नांमुळे आज दलितांना राष्ट्रीय प्रवाहाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साध्य होऊ शकले.

विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींनी आपल्या मोठ्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल करून या व्यक्ती यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान झाल्या आहेत.

मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करताना संकटे, टोकाची स्पर्धा व त्यातून येणारी निराशा अडसर ठरू शकतात. अशा वेळी ‘आशा-आकांक्षा, धैर्य, जिद्द, आत्मविश्‍वास व परिश्रम’ या पंचसूत्रीच्या आधारे मोठी स्वप्ने साकार होतात. हीच मोठी स्वप्ने आपल्याला विकासाच्या नवनवीन संधींकडे जाण्याचा राजमार्गही ठरतात. यासाठीच मोठी स्वप्ने पाहावीत.

म्हणूनच म्हणावेसे वाटते,

एकरूप व्हा कार्याशी,

करा सामना परिस्थितीशी.

नको पर्वा कष्टांची,

द्वारे उघडा स्वप्नांची

- अश्विनी जाधव

महिलाश्रम हायस्कूल