स्वयंशिस्त...

दिंनाक: 01 Nov 2019 14:34:58


मनीष बारावीत होता. त्याला एका परीक्षेत (टर्मिनल) खूप कमी गुण मिळाले. तेव्हा तो खूप निराश झाला आणि माझ्याकडे आला. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता. म्हणून आधी औषध सुरू करून त्याला शांत केले. नंतर आठवड्याने तो आला, तेव्हा त्याला खूप बरे वाटत होते.
“मनीष, आता सांग बरं मला? कमी मार्कस् मिळण्याची साधारण तीन कारणं असू शकतात. एक तर बुद्धी कमी किंवा आकलन कमी (ॠीरीळिपस), अभ्यासच केला नाही तर किंवा काही कारणाने अभ्यासच नीट झाला नाही तर. यापैकी तुझं कारण साधारण काय असू शकेल किंवा काय आहे?”
“डॉक्टरकाका, मला कमी मार्कस् मिळण्याचं कारण म्हणजे माझा अभ्यासच नीट झाला नव्हता.”
‘का रे? अभ्यासात लक्ष नाही लागायचं का?”
“नाही, अभ्यासाला बसलो की एकदम व्यवस्थित व्हायचा; पण अभ्यास करताना, करायला मी थोडी टाळाटाळ करायचो. कॉलेज, क्लास वगैरे झाल्यावर मी कंटाळा करायचो. आज करायचा तो उद्या करू म्हणायचो किंवा थोडा करायचो. थोडा उद्या करू, नंतर करू असं करायची माझी सवय मलाच महागात पडली. थोडा उद्या, थोडा नंतर करतकरत शेवटी अभ्यास एवढा साचत गेला की, शेवटी तो पूर्ण झालाच नाही. मला कळतंय काका, पण वळत नाही असं झालंय माझं. प्लीज, मला मदत करा डॉक्टरकाका.”
“हो बरोबर आहे. तुझी स्थिती अगदी ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल मे परलय होएगी, बहूरी करेगा कब?” या कबीराच्या दोह्याप्रमाणे झालीय. तू याच्याविरुद्ध वागलास नि जाळ्यात सापडलास. ठीक आहे, वाचवू या तुला.
त्यासाठी तुला, तुझ्या मनाला विशेषकरून ‘थोडा वेळ नंतर’ हे शब्द तुझ्या शब्दकोशातून प्रयत्नपूर्वक दूर करावे लागतील! त्याला वेळ लागेल; पण तू जेवढ्या लवकर ही सवय बदलशील तेवढा तुलाच फायदा होईल.”
थोडक्यात, मनीषने स्वत:च त्याच्या मनाला शिस्त लावणे अगदी आवश्यक आहे. पुढे ढकलण्याची सवय एक प्रकारची बेशिस्तच बनू पाहत होती, तिला पुन्हा योग्य मार्गावर आणायची गरज होती.
मध्यंतरी सुमितला घेऊन त्याचे आईवडील माझ्याकडे आले होते. सुमितला आणण्याचे कारण म्हणजे त्याची अभ्यासातील अधोगती!
“काय झालं सुमित? का बरं असा प्रॉब्लेम होतोय? आधी तर तू हुशार होतास; मग बुद्धी तर काही अशी कमी होत नाही. मग काय झालं असं, की कमी मार्कस् मिळायला लागले?”
“डॉक्टरकाका, अहो मला आता अभ्यासच आवडत नाही, लक्षच लागत नाही.”
“का रे?”
“डॉक्टरकाका, आई जाम कटकट करते हो. सारखा अभ्यासच करायला सांगते. दुसरा काही विषयच नसतो तिला. मला खेळायलापण आवडतं. फुटबॉल मी चांगला खेळतो, पण आईसारखी मागे लागते अभ्यासाच्याच! आईला वाटतं की, मी खेळतोच फक्त; अभ्यास करतच नाही!”
“पण मग ते खरं आहे की खोटं?”
“नाही; म्हणजे मी एकदा फुटबॉल खेळत बसलो मित्रांबरोबर, की भानच राहत नाही. खेळायचं, गप्पा मारायच्या हेपण आवडतं. पण मग उशीर व्हायचा घरी जायला. मग आईने माझं खेळणंच बंद केलं. म्हणून मला इतका राग येतो ना अभ्यासाचा की, अभ्यासच होत नाही माझा.”
त्याच्या वडिलांच्या मतेही आई खूपच मागे लागायची. पण आपला मुलगा हुशार आहे. त्याने अभ्यासच करायला पाहिजे हे तिला वाटणे ठीक असले, तरी तिची पद्धत चुकीची होती. सुमितला अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचा वाटत होता, तर त्याने स्वत:ला त्याबाबतीत नियंत्रित करायला हवे होते, शिस्त लावायला हवी होती. तसे झाले असते, तर आई त्याच्या मागे लागली नसती हेही तितकेच खरे! थोड्याच दिवसांपूर्वी रितेश आला होता माझ्याकडे. त्याचे वय 25 वर्षे होते. त्याला खूप नैराश्य आले होते. आता माझे पुढे कसे होणार असे त्याला वाटत होते. मी त्याला विचारले, “असं काय झालं आहे तुला एवढं नैराश्य यायला?”
“डॉक्टर काय सांगू, आज माझी ही स्थिती/दशा व्हायला मीच कारणीभूत आहे!”
“अरे, म्हणजे रे काय? काय झालं ते नीट सांग बरं.”
“डॉक्टर, मी न माझ्या आई-वडिलांचं कधी ऐकलंच नाही. त्यांनी किती वेळा मला सर्व गोष्टी वेळच्या वेळी करायला समजावले, पण मी कायम माझ्या बेफिकीरीतच राहिलो. कधी व्यायाम केला नाही, अभ्यास नीट केला नाही. त्यामुळे आज माझी नोकरी धड नाही, जी आहे ती आता कशीबशी टिकवली आहे. पण मनाला मात्र समाधान नाही. व्यायाम कधी केला नाही; कधीही उठा, कधीही झोपा, काहीही खा, यामुळे आता या लवकरच्या वयात मला ब्लडप्रेशरचासुद्धा त्रास जाणवतो. त्यासाठी औषधंपण चालू आहेत. किती वेळा आईने सांगितलं की, सारखं बाहेरचं खाऊ नको. पण मी ऐकलं नाही आणि आज माझं वजन माझ्या कह्यात राहिलं नाही आणि आज मी अनेक आजारांचं आगार बनलोय. डॉक्टर, कसं होणार माझं? (रडायला लागतो) खरंच अहो, शिस्तीचं महत्त्व मला आज समजतंय, पण फार उशीर झालाय असं वाटतंय, सगळं संपलंय हो.”
“अरे रितेश, असा निराश होऊ नकोस. आपल्याकडे इंग्रजीत म्हण आहे, इशीींंशी श्ररींश ींहरप पर्शींशी. उशिरा का होईना, पण तू शहाणा होऊ शकतोस. आज उशिरा का होईना, तुला शिस्तीचं; स्वयंशिस्तीचं महत्त्व पटलं आहे. तुझ्या आई-बाबांनी तुला समजावलं; पण कधी जबरदस्ती केली नाही. त्यांनी स्वयंशिस्तीचं महत्त्व सांगितलं. स्वयंशिस्त पाळण्याची, त्या रस्त्यावर चालण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. चल रितेश, शुभस्य शीघ्रम्!”
स्वयंशिस्त ही आयुष्यातली फार महत्त्वाची बाब आहे. मनिष, सुमित, रितेश असे हे सगळे आपल्याच आजूबाजूला वावरत आहेत. आपल्यातच आहेत किंवा आपणही आहोत.
त्यामुळे आज आपण नुसते हुशार असून उपयोगी नाही; तर त्यासाठी सातत्याने मेहनत करणे, त्यासाठी आपल्यामधल्या प्राकृत भावनांना नियंत्रित करणे महत्त्वाचे असते. आपल्या प्रत्येकाच्या मताने आपण मोठे होत गेलो तरी कायम एक बालक आपल्यात दडलेलेच असते. ते बालक हट्ट करतच असते. त्यातूनच आळस, बेफिकीरी, सतत नंतर करण्याची (एक प्रकारे आळसच!) वृत्ती जन्म घेतात व त्यावर योग्य वेळीच आपल्याला नियंत्रण आणावे लागते.
दुसर्‍यांनी सांगितले, विशेषत: आपल्या आई-वडिलांनी सांगितले की, ती आपल्याला सक्ती वाटते. काही वेळा ते मागे लागतात असे वाटून खूप राग येतो, मन (मनातले बालक) बंड करून उठते, मग विरोधात जाऊन मुद्दामहून उलटे वागू लागते. पण जसे रितेशला उशिरा का होईना सगळे कळेल, तसे प्रत्येकाला कळेलच असे नाही.
त्यामुळे आपण आपल्यावरच थोडा संयम ठेवला पाहिजे. रोजच्या दिवसाच्या वेळेचे नियोजन केले; ते नीट पाळले, तर आपले काम, आपला व्यायाम, आपले मनोरंजन, आपले खेळ सगळेच गणित नीट जमून येते आणि व्यक्तिमत्त्वाला झळाळी येते! म्हणून स्वत: स्वत:ला शिस्त लावणे खूप महत्त्वाचे असते!

- डॉ. अद्वैत पाध्ये
मनोविकासतज्ज्ञ