रामाचे चरित्र सांगणारे नृत्य नाटक- रांमलीला

आपल्या सर्वाना भगवान रामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि रावण, हनुमान यांच्या गोष्टी माहिती असतातच. लहानपणी आईकडून, आजीकडून आपण या गोष्टी ऐकत असतो. थोडे मोठे झालो की आपण पुस्तकांमध्ये रामायण वाचतो. हेच रामायण उत्तर भारतात एका वेगळ्या पद्धतीने सांगितले जाते- त्यालाच म्हणतात रामलीला!

 

भगवान रामचंद्र आणि त्यांच्या आयुष्यातील गोष्टी या नाटक आणि गीते यांच्या माध्यमातून सादर केली जातात. हे नाटक असल्यामुळे त्यात वेगवेगळी माणसे रामायणातील एकेक पात्र वठवितात. तुलसीदास यांनी लिहिलेल्या तुलसीरामायणाचे वाचन रामलीला सादर करताना केले जाते. जे लोक ते वाचून दाखवितात त्यांना “पाठक “ म्हणतात आणि जे त्याचा अर्थ सांगतात त्यांना “धारक” असे म्हटले जाते. 

रामलीला या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एका जागी सादर केले जात नाही. त्यातील वेगवेगळे प्रसंग हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आवर्जून सादर केले जातात.  म्हणजे यातील हनुमान हा एखाद्या झाडावर उड्या मारतो किंवा राम -सीता हे एखाद्या  तलावातून होडीत बसून पलीकडे जातात.  काही प्रसंग उदा. रामाने केलेला रावणाचा वध हे गावातील मोकळ्या जागेत सादर केले जातात. रावणाचा पुतळा करून त्याचे दहन करणे हे रामलीलेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपल्यासमोर प्रत्यक्ष रामायण घडते आहे असा अनुभव जमलेल्या प्रेक्षकांना मिळतो. 

 

 इतिहास-

रामलीलेची सुरुवात महंत तुलसीदास यांनी केली असे मानले जाते. त्याच जोडीने बहादुरशहा जफर यांच्या कारकीर्दीत महंत राघोदास यांनी रामलीला सादर करायला सुरुवात केली असेही सांगितले जाते. 

उत्तर भारतातील लहान लहान गावांमध्ये आश्विन शुक्ल प्रतिपदेला रामलीला सुरु होते आणि ती दसरा म्हणजे विजयादशमीला संपते. याच काळात भारतात सगळीकडे देवीचे नवरात्र साजरे होते. दशमीच्या दिवशी रामाने रावणाला मारले असे मानले जाते म्हणूनही या दिवसाला विजयादशमी म्हणतात. त्यामुळे रामाचा रावणावर विजय झाला हा प्रसंग सादर होऊन रामलीला संपते. 

भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात १९२० सालापासून रामलीला सादर होते आहे. पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यात देखील  रामलीला सादर केली जाते. 

 

कालावधी-

काही प्रांतात रामलीला  दहा दिवसांमध्ये  सादर केली जाते, रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे रामलीला सतरा दिवस सादर करतात तर काही गावात रांमलीला ४० दिवस सादर केली जाते. 

 

सादरीकरण-

रामलीला सादर करणारे बहुतेक सर्व पुरुष असतात म्हणजे सीतेचे पात्रही पुरुष कलाकारच  सादर करतो. काही ठिकाणे स्त्रिया आता सीतेची भूमिका करू लागल्या आहेत. यामध्ये मोठी  शेपूट लावलेला गलेलठ्ठ मारुती आणि छोटी छोटू मुले त्याचे सोबती असलेली माकडे होतात!

 

रावणाची लंका आणि रामाची अयोध्या यांचे देखावे  गावात ठिकठिकाणी उभारले जातात. रामलीलेतील पात्रे जशी पुढे पुढे जातात तसेच प्रेक्षकही त्यांच्या मागे मागे जातात! आहे ना गंमत ! म्हणजे आग्रा शहरात जेंव्हा रामलीला सादर होते तेंव्हा राम वनवासाला निघण्याच्या दृश्यात प्रेक्षकही राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मागे यमुना नदीपर्यंत जातात . 

काशीजवळ असलेल्या रामनगर गावात जी रामलीला होत असे  त्याचा खर्च पूर्वी तेथील राजा करीत असे आणि राजा स्वतः सर्व दिवस आपल्या कुटुंबासह रामलीला पहायला येत असे.

 

संवाद-

रामलीला सादर होते तेंव्हा त्यातील पात्रे स्वतः फार कमी संवाद बोलतात म्हणजे जवळजवळ बोलतच नाहीत. ते फक्त अभिनय करतात. 

तुलसी रामायणातील श्लोक ज्यांना चौपाई असे म्हटले जाते ते या वेळी गायले जातात. पाठक आणि धारक यांना गाण्यासाठी साथ करायला पेटी, तबला, अशी वाद्ये असतात. विशेष आक्रमक प्रसंगी तबला जोरात वाजविला  जातो आणि त्यातून वीररस सुचविला जातो. रामाचे गुणगान केले जाते त्यावेळी उपस्थित प्रेक्षक आरती म्हटल्याप्रमाणे सगळे मिळून रामाचे  भजन करतात. 

 

रावणदहन-

रामाने रावणाला मारले आणि वाईट प्रवृत्तीचा नाश केला अशी समजूत आहे. त्याचे प्रतीक म्हणून रामलीला सादर होताना शेवटच्या म्हणजे विजयादशमीच्या दिवशी रावणाचा एक मोठा  गवताचा पुतळा तयार केला जातो. त्याला दहा तोंडे सुद्धा लावलेली असतात.  याची चौकट लाकडी केलेली असते. यामध्ये दारुकामाचे म्हणजे फटाक्यांचे सामान आत भरलेले असते. मोकळ्या मैदानात रावण वध होतो. यावेळी राम आणि लक्ष्मण  आणि वानरसेना एका बाजूला आणि पलीकडे रावण आणि त्याची सेना उभी असते. सीता अशोकवनात बसली आहे असे दृश्य दाखविलेले असते. राम आणि रावण  यांची पात्रे  आपापसात घनघोर युद्धाचे नाटक करतात आणि प्रत्यक्ष रावणाला  ठार करण्याऐवजी  राम आपल्या हातातील धनुष्यातून  रावणाच्या पुतळ्यावर बाण सोडतो . त्या बाणाला आग लावलेली असल्याने रावणाचा पुतळा पेट घेतो आणि त्यातून शोभेचे फटाके उडू लागतात आणि रावणाचा गवताचा पुतळा जळून जातो. 

नाटक अभिनय आणि मनोरंजन असे सारेच  यातून साधले जाते ज्यामुळे प्रेक्षक मोठ्याने ओरडून आपला आनंद साजरा करतात. 

आदर-

रामलीला सादर करणारी पात्रे ही खरे तर माणसेच असतात. पण या काळात प्रेक्षक त्यांनी भक्तिभावाने आदर देतात. त्यांना देव मानून आपल्या घरी जेवायला बोलवतात. छोट्या गावात देखील या पात्रांची मिरवणूक काढली जाते. 

 

अशी ही रामलीला. महाराष्ट्रात या लोककलेचा प्रसार खूप नाही पण उत्तर भारतातील ही लोककला आवर्जून एकदा तरी पाहण्याची संधी घ्यावी.

  • डॉ. आर्या जोशी