बहे – बोरगाव

मित्रांनो, नदीचं वय किती असते माहित आहे का ? पाचशे वर्ष, हजार वर्ष ? नक्की किती आहे सांगता येईल का ? एका जलतज्ञांच्या भाषणात मी ऐकले होते, कृष्णा नदीचे वय दोन कोटी वर्षे इतके आहे !!! ऐकून आश्चर्य वाटले ना, वाटणारच.

दोन कोटी म्हणजे थोडं झालं का ? याच कृष्णा नदीतील एका ठिकाणाबाबत आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्ही समुद्रातले बेट पाहिले असेल. त्यावर किल्ले बांधलेले आहेत. सिंधुदुर्ग, अलिबाग इ. पण नदीच्या पात्रातील बेट कधी पाहिले आहे का ? कृष्णा नदीच्या पात्रात सांगली जिल्ह्यात एक मोठे बेट आहे. वाळवा तालुक्यातील बहे-बोरगाव या गावात.

इथे कृष्णा नदीवर मोठा बंधारा बांधला आहे. त्यामुळे मोठा जलाशय. अगदी धरणासारखा निर्माण झाला. आहे. याच्याच दुसऱ्या बाजूला हे मोठे बेट आहे. त्याचे नाव – रामलिंग बेट. या बेटावर स्वतः प्रभू रामांनी स्थापन केलेले शिवलिंग आहे. आणि त्याच्याच मागे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. मारुतीची ही मूर्ती ६ फूट उंच आहे. हेच ते रामलिंग बेट.

गेली दोन कोटी वर्षे नदी वाहते आहे. तिच्या प्रवाहामुळे इथला दगड झिजत झिजत गेलेला आहे. त्यामुळे नदीपात्रात एक मोठे व अन्य लहान बेटे तयार झालेली आहेत. नदीच्या पाण्याच्या वेगामुळे दगडाची झीज होते आणि विविध आकार निर्माण होतात. बहे इथे अशी अनेक दृश्ये पाहायला मिळतात. रांजणाच्या आकाराचा खड्डा पडला की त्याला रांजण खळगा म्हणतात. कुठे लहानशा गुहेसारखा आकार निर्माण झालाय. कुठे एखादी दगडी कमान असावी तसा आकार बनलेला आहे. याच्यातून नदीचे पाणी सारखे वहात असते.

कृष्णेचे पात्र इथे एक किलोमीटर रुंदीचे आहे. असंख्य प्रकारचे आकार या खडकाळ पात्रामध्ये निर्माण झालेले आहेत. फक्त खडकाळ नदीपात्र एवढेच याचे महत्त्व नाही. तर, या बेटांवर राहायला हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात. चक्रवाक, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, पांढरा कुदळ्या, हळदी कुंकू बदक, शेकाट्या असे अनेक पक्षी मोठाल्या थव्यांमध्ये येतात. याची दोन कारणे आहेत, कृष्णा नदीतील मासे यांना खायला मिळतात. आणि बेटांवर राहायला असल्याने माणसे किंवा प्राणी यांचा कसलाच त्रास होत नाही. बेटांवर अंडी, पिल्ले सुरक्षित राहतात. त्यामुळे बहे इथे भूगोलाचा चमत्कार आणि वन्यजीवांचा अविष्कार असे दोन्ही पहायला मिळते. हे स्थलांतरित पक्षी बघायला हिवाळ्यात जरूर जा.

- सौरभ अनंत देशपांडे