वय वर्षे पाच, जेव जेव म्हणून घास भरवणारी आई; इयत्ता पाचवी, आंघोळ घालणारे बाबा; वय तेरा, आईच्या पाठीवर दप्तर अडकवून स्वत: मजेत चालणारा मुलगा मुलगी. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असा सार्वत्रिकपणे दिसणारी ही दृश्ये. म्हणूनच आज यावर लिहावंसं वाटलं. मुलांचं जेवण, मुलांचा अभ्यास, त्यांना नसलेला वेळ हे अनेक पालकांचे बोलण्याचे आवडते विषय. ही मुलं म्हणजे वय वर्ष एकपासून वय वर्षे एकवीसपर्यंत. हो..., हो ए.क.वी.स. बरोबरच सांगत्येय मी. एकवीस वर्षाच्या आपल्या बाळाची परीक्षा चालू आहे, त्यामुळे तू आज माझ्या घरी येऊ नको असं म्हणणारी एक सख्खी मैत्रीण मलाही आहे. हे सगळं वाचताना तुम्हा सर्वांना विचित्र किंवा अनपेक्षित वाटतंय का? तर मग एक क्षण थांबा, तुम्हाला किंवा ज्या तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी वगैरे यांना या वयोगटातली मुलं आहेत अशा अनेकांच्या संभाषणातले काही क्षण मनात आणा आणि स्वत:शी खरं बोला, सापडतायत ना असे क्षण? नक्कीच सापडणार. जेव्हा ते इतरांचे असतील, तेव्हा ते फार गमतीचे वाटतात. म्हणजे बघा हं, आमच्या शाळेत इयत्ता पहिलीचे पालक आमची मुलं छोटी आहेत, त्यांना हीही गोष्ट जमणार नाही ती सांगू नका अशी मागणी घेऊन येतात आणि दहावीचे पालकही त्याच प्रकारची कैफियत आणतात. बरं, पूर्व-प्राथमिक वर्गांचे पालक पहिलीच्या पालकांना हसतात तर पहिलीचे दहावीवाल्यांना. पण स्वत:च्या मुलाला तुम्ही सांगितलेलं काम जमू शकतं, कदाचित जमणार नाही पण ते मूल प्रयत्न करू शकतं हे मान्य करायला मात्र जमत नाही. तेव्हा आजपासून हेच जमवायचा प्रयत्न करायचा आहे. अनेकदा घरात किंवा शाळेत त्या-त्या वयोगटाला झेपतील किंवा त्या-त्या वयोगटाने अशीच कामं आपसूकच दिली जातात. अशा वेळी आपल्या पाल्याला ते काम करण्यासाठी प्रोत्साहित करावं. त्याला जमत नसेल तर ते सुकर करण्यासाठी मदत करावी. मी सुकर करण्यासाठीची मदत म्हणत्येय. आपल्या पाल्याचा प्रोजेक्ट आपण रात्री दोन वाजेपर्यंत पुरा करण्याचा अट्टहास नकोच. त्याने केलेला अपुरा प्रोजेक्ट नेऊदेना तो शाळेत. आपण केलेला सुंदर आणि नेटक्या प्रोजेक्टहून तो किमती आहे, कारण त्यात भविष्यात त्याच्यामध्ये परिश्रमांची सवय रुजवण्याचं गमक लपलं आहे.

- मेघना जोशी