जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने सन १८०८ मध्ये अणुसिद्धांत मांडला होता. या विश्वामधले सर्व पदार्थ अत्यंत सूक्ष्म अशा अदृश्य अणूंचे बनलेले असतात, असे त्याने सांगितले होते. पण आपल्या सभोवती असलेले दगडमाती, हवापाणी इतकेच नव्हे तर माणसे, पशू, पक्षी, झाडे, चंद्र-सूर्य-तारे वगैरे सगळी निर्जीव किंवा सजीव सृष्टी सूक्ष्म कणांपासून बनलेली असते अशी धक्कादायक कल्पना सर्वसामान्य लोकांना समजणे कठीण होते.

 

आपल्या डोळ्यांना हवा दिसत नाही,पण तिचे असणे आपल्याला जाणवते. टॉरिसेलीओटो व्हॉन गेरिक, रॉबर्ट बॉइल यासारख्या शास्त्रज्ञांनी या अदृश्य हवेवर प्रयोग करून तिच्या अनेक गुणधर्मांचे शोध लावले. पुढील शतकातल्या शील, प्रेस्टली, लेवोजियरगे ल्युसॅककॅव्हेंडिश वगैरे शास्त्रज्ञांनी प्राणवायूनायट्रोजन आणि हैड्रोजन यांसारख्या निरनिराळ्या वायूंचे शोध लावले. वायूंवरील संशोधन हा अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या संशोधकांसाठी महत्त्वाचा विषय होता. डाल्टननेसुद्धा यात मोठी भर घातली होती. त्या काळातल्या काही संशोधकांना डाल्टनचा अणुसिद्धांत पटला आणि त्यांनी त्यावर अधिक संशोधन केले. इटालियन शास्त्रज्ञ अॅमिलियो अॅव्होगाड्रो हा त्यातला एक प्रमुख शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने डाल्टनच्या सिद्धांतात भर टाकून त्याच्या सिद्धांताला पुढे नेले.

 

अॅमिलियो अॅव्होगाड्रो याचा जन्म सन १७७६ मध्ये इटलीमधील तुरीन या गावातल्या  एका स्थानिक राजघराण्यात झाला. त्याने आधी वकीलीचा अभ्यास करून वकिली सुरू केली  होती. पुढे त्याच्या मनात गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि तो त्या विषयांच्या अभ्यास आणि संशोधनाकडे वळला. त्याने या विषयांचे अध्यापनही केले, तसेच आपले शोधनिबंध पुस्तकांमधून प्रसिद्ध केले.

 

वायुरूप पदार्थांचे आकारमान त्यांचे तापमान आणि दाब यानुसार बदलत असते. म्हणून अॅव्होगाड्रोने सन १८११ मध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखात असे सांगितले की प्रमाणभूत तापमान आणि दाब (Standard Tempearature and Pressure) असताना समान आकारमानातील कुठल्याही वायूच्या रेणूंची संख्या तेवढीच असतेत्याने हे गृहीतक म्हणून (hypothesis) मांडले होते. पुढील काळात त्याला अॅव्होगाड्रोचा नियम (Avogadro's law) असे नाव दिले गेले. सन १८१४ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ अँपियर याने सुद्धा अशाच प्रकारचे गृहीतक स्वतंत्रपणे मांडले होते आणि त्या काळात तो जास्त प्रसिद्ध असल्यामुळे काही काळ ते त्याच्या नावाने ओळखले जात असे

 

अठराव्या शतकाच्या अखेरीला लेवोजियरने मूलद्रव्यांची नवी संकल्पना मांडली आणि जगामधील सर्व पदार्थांची मूलद्रव्ये (Elements), संयुगे (Compounds) आणि मिश्रणे (Mixtures) या तीन प्रकारांमध्ये विभागणी केली. पण डाल्टनने अणुसिद्धांत मांडला होता त्या काळापर्यंत अणू (Atom) आणि रेणू (Molecule) यांच्या स्पष्ट व्याख्या झाल्या नव्हत्या. हे दोन्ही शब्द सूक्ष्म कण म्हणूनच ओळखले जात होते. अणू किंवा रेणूएवढा सूक्ष्म कण डोळ्यांनी पाहणे आजही शक्य नाही आणि भविष्यातही शक्य होणार नाही. पूर्वीच्या काळातसुद्धा कुठलेही अणू रेणू वेगळे काढून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे किंवा दाखवणे अशक्यच होते. डाल्टनने त्याच्या तर्कशुद्ध विचारांमधून अशा कणांची कल्पना केली होती आणि अॅव्होगाड्रोनेही तशाच प्रकारे रेणूंचा नियम सांगितला होता, पण ते विचार इतर लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे होते. त्यात इंग्लंडमधला डाल्टन, इटलीमधला अॅव्होगाड्रो आणि फ्रान्समधला अँपियर यांनी त्यांच्या देशात प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमधल्या कल्पना सर्व देशांमधल्या विद्वानांच्या वाचनात येऊन त्यांना त्या पटायला कित्येक वर्षांचा काळ लागला.

 

मूलद्रव्यांचे सर्वात लहान कण म्हणजे अणू आणि संयुगांचे सर्वात लहान कण म्हणजे रेणू अशी एक ढोबळ कल्पना बऱ्याच काळानंतर रूढ झालीपण वायूंचे आकारमान, वस्तुमान, तापमान वगैरेवरील प्रयोगातून अणूरेणूंचे गुणधर्म शोधण्याच्या प्रयत्नात काही विसंगती दिसून येत होत्या. प्राणवायूहायड्रोजन आदी मूलद्रव्यांचे दोन दोन अणू एकत्र येऊन त्यांचे रेणू तयार होतात असे अॅव्होगाड्रोने सुचवल्यानंतर या विसंगतींचा उलगडा झाला. अशा मूलद्रव्यांचा सर्वात लहान नैसर्गिक कण हा रेणू असतो, पण रासायनिक क्रियेमध्ये भाग घेताना त्यातले अणू वेगळे होतात.

 

अणू, रेणू वगैरेंच्या सिद्धांतांबद्दल लोकांच्या मनात शंका होत्या. त्यामुळे ऑव्होगाड्रोच्या नियमाकडेसुद्धा त्याच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी फारसे लक्ष दिले नव्हते. नंतरच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी यावर अधिक संशोधन केलेसुमारे पन्नास वर्षांनंतर  सन १८६५ मध्ये जोसेफ लॉश्मिट या जर्मन शास्त्रज्ञाने रेणूंच्या संख्येचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ १०० वर्षांनंतर सन १९०९ मध्ये जीन पेरिन या शास्त्रज्ञाने असे सिद्ध केले की प्रत्येक ग्रॅमरेणू एवढ्या वस्तुमानात त्या पदार्थाचे .०२२१४०८६ × १०^२३ इतके अणू असतात. त्याने या आकड्यला 'अॅव्होगाड्रो नंबर'असे नाव सुचवले आणि सर्वानुमते ते नाव देण्यात आले.