बाईंनी जेव्हा निबंध स्पर्धेचे विषय सांगितले तेव्हा माझ्या मनात ‘जेथे राबती हात तेथे हरी’ या विषयावरचा निबंध लिहिण्याचे आले. याच सुट्टीतील माझा अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे.

एक वेगळा अनुभव घेण्यासाठी म्हणून मी आमच्याकडे पेपर टाकायला येणार्‍या तुषारदादाबरोबर एक दिवस पेपर टाकायला जायचं ठरवले. आईपण हो म्हणाली. मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांनी माझी खिल्ली उडवली. पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिले.

आम्ही एक दिवस ठरवला. मला मनातून खूप उत्सुकता लागली होती. पहाटे 4 वाजताच मी उठून तयार होतो. तुषारदादा मला घ्यायला आला. तो गाडीवर आणि मी सायकलवर असे आम्ही निघालो. तुषारदादाने झोपडपट्टीतील एका घरापाशी नेले. ते घर खूप छोटे होते. त्याचा दरवाजा पण छोटासाच होता. ते घर होते गणेशचे. गणेश इ.10वीमध्ये शिकत होता. तुषारदादाने आमची ओळख करून दिली. मग आम्ही दोघे आप्पा बळवंत चौकात पेपर घ्यायला गेलो.

पहिल्यांदा आम्ही सायकलच्या कॅरीअरला पेपर लावून घेतले आणि चहा प्यायला. मग त्याने पेपरची लाईन काढली म्हणजे कोणाला, कुठला आणि किती पेपर द्यायचे याचे सेट करून घेतले. मग आम्ही निघालो. आम्ही शनिवार, नारायण, सदाशिव या पेठांमध्ये पेपर टाकायला सुरुवात केली. आम्ही पन्नास घरे केली. कधी लिफ्ट असायची तर कधी नसायची तर कधी असून बंद असायची. कधी पाचवा तर कधी तिसरा मजला असे करून आम्ही सगळे पेपर टाकले.

सगळे पेपर टाकून झाल्यानंतर गणेश मला सोडायला माझ्या घरी आला. पण तो आमच्या बिल्डींगमध्ये येऊनही माझ्या घरी आला नाही. केवढा स्वाभिमानी होता. तो महिन्याला आठशे रुपयांसाठी एवढे कष्ट करूनही त्याने स्वाभिमान सोडला नाही. सहावीत असल्यापासून तो हे काम करत होता. सहावी ते दहावी एवढ्या वर्षांमध्ये त्याने किती संकटे झेलली असतील. शिवाय इतके करूनही त्याला लोकांचा ओरडा खावा लागायचा. कोणी म्हणे आवाज करू नको, कोणी रागवे, लिफ्टने ये-जा करायची नाही. इतक्या लहान वयापासून त्याला कष्टाचे महत्त्व समजले होते. आमच्याकडे पेपर टाकणारा तुषारदादा आणि त्याचा मोठा भाऊ दोघेही झोपडपट्टीत राहत असूनही बॉक्सींगचे नॅशलन प्लेअर आहेत. आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे आपल्याला भेटतात. प्रत्येकवेळी खूप मोठे लोकच आपले आदर्श असले पाहिजेत असे नाही तर अशा प्रामाणिकपणे कष्ट करणार्‍या, राबणार्‍या हातांमध्येही आपल्याला देव भेटतो. हे आईचे म्हणणे मला त्या दिवशी पटले.

मी एकच दिवसच पेपर टाकायला गेलो तर एवढा घामाघूम झालेलो, एवढा थकलो की बास पण गणेश मात्र येऊन परत दूध टाकायला जाणार होता. मी त्याला म्हणालो ‘कसं रे हे सगळं करतोस तू?’ तो म्हणाला, ‘आईच्या पैशावर किती दिवस जगणार? बाबा तर नाहीयेत. म्हणून मला हे सगळं करावं लागतं.’ माझी गिअरची सायकल असूनही मी थकलो तर गणेश त्याची ती जड सायकल चालवून कसं करत असेल? शिवाय परत शाळा, दहावीचा अभ्यास. मनोमन ती त्याला प्रणाम केला.

हे सगळे बघून, अनुभवून मला खूप काही शिकायला मिळाले आणि नक्की कळले की देव फक्त मंदिरात नसतो देवापुढे तासन्तास बसून पूजा केली म्हणजेच देव प्रसन्न होतो असे नाही तर कष्ट करून, आपले कर्तव्य, आपले काम प्रामाणिकपणे मनापासून करणे म्हणजेच देवाचे काम करणे. देव तेव्हाच प्रसन्न होतो. खरोखरीच हे अगदी खरे आहे की, ‘जेथे राबती हात तेथे हरी.’

- अमेय प्रमोद परदेशी

इ.१० वी, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग