‘‘आई, माझ्या चित्राला पहिला नंबर मिळाला.’’, अन्वी ओरडत एखाद्या वादळासारखी घरात शिरली. तिच्या आवाजाने अर्णव दचकला. ‘‘अन्वी किती जोरात ओरडतेस, तो घाबरलाना.’’ ‘‘ते जाऊ दे, हे बघ बक्षीस.’’

‘‘अरे व्वा, अभिनंदन! मला खात्री होतीच. चल, आज तुझ्या आवडीची पावभाजी बनवूया.’’ ‘‘नाही! पावभाजी मला बिलकूल आवडत नाही. मला बटाट्याची भाजी हवी.’’ अर्णवने पावभाजीचा बेत उधळून लावण्याचा प्रयत्न सुरू केला! 

‘‘अर्णव, तू आहेस सहा वर्षांचा, माझ्यासारखा दहा वर्षांचा होशील आणि तेव्हा जर तुला बक्षीस मिळालं, तर आपण करू हो बटाट्याची भाजी. सध्या तू घरातल्या भिंतीवर चित्र काढ आणि मुकाट्याने पावभाजी खा.’’, अन्वीने आक्रमक पवित्रा घेतला.

‘‘अर्णव, आज तिला बक्षीस मिळाले ना, म्हणून तिच्या आवडीचा मेनू, उद्या तुझी बटाट्याची भाजी.’’, अस्मिताने दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

‘‘कधीच नको करू बटाट्याची भाजी. तू सगळं ताईसाठीच करतेस. परवा नवीन ब्रश, रंग, तिच्यासाठीच आणलेस. मी मागितले, तर तुझे रंग शिल्लक आहेत, तुझा ब्रश अजून चांगला आहे, असं म्हणालीस. नवीन कपडे, नवीन शूज सगळं तिलाच.’’

मनातला राग शब्दांतून व्यक्त करणे अशक्य झाल्याने पाय आपटत तो बेडरूममध्ये गेला.

त्याला समजावून शांत करावे असा विचार अस्मिताच्या मनात आला, पण अर्णव शांत झाल्याशिवाय त्याच्याशी बोलणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकणे, हे लक्षात आल्याने ती शांत राहिली.

अन्वी खेळायला पळाली, अस्मिता पावभाजीच्या तयारीला लागली, तर अर्णव झोपून गेला.

पावभाजीची तयारी करून होताच ती बेडरुममध्ये डोकावली, तर अर्णव चक्क उठून खेळत बसला होता.

‘‘मग, आज तिच्या आवडीची पावभाजी का?’’

‘‘अच्छा, अजून डोक्यात तेच आहे का पिल्लूच्या? आज ताईला बक्षीस मिळाले, त्याचा आपल्या सगळ्यांना आनंद झाला, म्हणून आज पावभाजी. आणि ती तुझी बहीण आहेना, मग तिच्याशी सारखी तुलना करत बसायची का ? दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी करायच्या. आज तिचे कौतुक झालं, तर उद्या, परवा, कधी ना कधी तुझं पण कौतुक होईलच ना! जसे आम्ही तिला कपडे घेतो, तसे तुला, मला, बाबांना पण. जशी गरज पडेल तसे कपडे, इतर गोष्टी घेतोचना. आणि मला सांग, शाळेत जेव्हा तुम्ही वाढदिवस साजरा करता, तेव्हा रोज सगळ्यांचाच करता का?’’

‘‘नाही, ज्याचा त्यादिवशी वाढदिवस असेल त्याचाच करतो?’’, अर्णवची गाडी एकदाची रुळावर आली.

‘‘ज्याचा वाढदिवस असेल, त्याचा एकट्याचाच साजरा केला, म्हणून तुम्हाला राग येतो का?’’

‘‘अजिबात नाही, उलट आम्ही त्याला ‘हॅप्पीबर्थडे’ म्हणतो आणि सगळे मिळून मज्जा करतो.’’

‘‘बरोबर.आता असं समज की शाळेत जसा बर्थडे असतोना, तसा आज ताईचा बक्षीस डे आहे, तुझा असेल तेव्हा आपण तुझा पण साजरा करू.’’

‘‘अच्छा, आत्ता मला समजले.’’

‘‘आणि हे बघ, तू कुणाशीतरी सारखी बरोबरी, तुलना करायचा प्रयत्न केलास; त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न केलास, तर तू ज्याच्याशी तुलना करतोयस त्याच्या थोडासा पुढे जाशील, इतकंच. पण जर स्वत:ची शक्ती वापरून प्रयत्न केलेस आणि कोणतीही गोष्ट केलीस, तर तू जास्त यशस्वी होशील आणि तू खरोखर आनंदी होशील.’’

‘‘म्हणजे काय, आई?’’

‘‘म्हणजे बघ, पळण्याच्या शर्यतीत पहिलानंबर येण्यासाठी तुला किती प्रयत्न करावे लागतील, तर दुसरा नंबर येणार्‍या मुलापेक्षा थोडेसे जास्त. पण जर तू दुसरा नंबर येणार्‍या मुलाकडे न बघता तुझी सगळी ताकद वापरून पळत राहिलास, तरच तुला तुझी खरी पॉवर कळेल, आणि मग पळण्याचा खरा आनंद मिळेल, हो ना!’’

‘‘हो गं, खरंच की, मला हे माहितीच नव्हतं.’’

तेवढ्यात अन्वी आली. ती दिसताच अर्णवने ‘‘हैप्पी बक्षीस डे, ताई !’’, असं म्हणत तिच्याशी एकदाची हातमिळवणी केली!

आनंदात अस्मिताने पावभाजीचा तवा गॅसवर ठेवला!

  • चेतन एरंडे