कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. लोकसंस्कृतीत या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. पाठारे प्रभू समाजात बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे. . दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात.

या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करता.

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते.

असा हा आनंद देणारा दिवाळीचा सण. माणसांची मने जोडणारा, निसर्गाला आदर देणारा. प्राण्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणारा आसा आहे.

अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश सर्वाना पोहोचविणारी दिवाळी आपल्याला आनंदाची, समृद्धीची आणि ज्ञानाच्या उपासनेची जावो ही सदिच्छा!

- डॉ. आर्या जोशी