दिवाळीचे गिफ्ट

दिंनाक: 25 Oct 2019 17:43:27


 

बंड्या आणि मिनी दोघे आजोबांचे लाडके होते. आजोबांनीच त्यांना लाडाने ही नावे ठेवली होती. एक दिवस दोघे भांडतच आजोबांजवळ गेले. मिनी म्हणाली, ‘‘बघा नं, आबा बंड्या मला कसा त्रास देतोय ते.’’ आजोबा हसत हसत म्हणाले, ‘‘किती रे भांडता एकमेकांशी? आता काय झालं भांडायला?’’ मिनी म्हणाली, ‘‘आबा आता दिवाळी जवळ आली आहे. मला फटाक्यांची भारी भीती वाटते, तर हा मला म्हणतो तुझ्या जवळच वाजवणार मी फटाके आणि भित्री भित्री म्हणून सारखा मला चिडवतो.’’ त्यावर बंड्या म्हणाला, ‘‘आबा ही काही कमी नाही. मला म्हणाली, तुला मला भाऊबीज द्यावीच लागते. इतर भावांकडूनही भरपूर गिफ्ट्स मिळतात. तुला तर काहीच मिळत नाही.’’

हे सारं आबा ऐकत होते. पण ते कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मिनी आणि बंड्या एकदम शांत झाले. आजोबांना म्हणाले, ‘‘आबा काय झालं? तुम्हाला काय होतंय का? पाणी आणू का? औषध आणू का?’’ त्याचबरोबर आजोबा एकदम भानावर आले आणि म्हणाले, ‘‘नाही रे, बछड्यांनो काही नाही.’’ ‘‘पण मग सांगा न आबा तुम्ही का रडत होतात ते?’’ मिनी म्हणाली, ‘‘आबा रडू नका. मला मिळालेल्या गिफ्टमधून मी तुम्हाला पण गिफ्ट देईन.’’ आजोबांना हसू आलं. ते म्हणाले, ‘‘बाळांनो, मला माझे बालपण आठवले. मी लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलो. तिथे मला ना बहीण ना भाऊ. कोणाशी भांडणार मी? कोणाला गिफ्ट देणार आणि फटाके तर नाहीतच पण साध्या फराळाचीही चव माहीत नव्हती मला. कोण देणार हे सारं अनाथ मुलांना? ते सारं आठवलं म्हणून डोळ्यांत पाणी आलं.’’ डोळे पुसत आजोबा म्हणाले, ‘‘असो, पण या दिवाळीत माझ्याकडून काय गिफ्ट हवं आहे ते सांगा पटकन.’’ मिनी आणि बंड्या म्हणाले, ‘‘आम्हाला एक गिफ्ट द्याल तुम्ही ? परत असे रडू नका. सतत हसत राहा.’’ आता हे ऐकून आजोबांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आले. मिनी आणि बंड्या चिडले. ‘‘हे काय आबा, आम्ही नाही बोलणार मग अशाने.’’ मग आबा म्हणाले, ‘‘बरं बरं आता नाही हं रडणार मी. हे पाहा डोळे पुसले. आता बोलाल नं माझ्याशी?’’ दोघेही होऽऽऽ म्हणत आजोबांच्या कुशीत शिरले. थोडे दिवसांनी दिवाळी आली. सून विनया फराळाचे पदार्थ भरभरून करत होती. पोळ्यावाल्या मावशी व कामवाल्या मावशी रोज तिच्या मदतीला येत होत्या. आजोबांनी विनयाला विचारले, ‘‘अगं, एवढे पदार्थ का करते आहेस? आपण इतकं खाणार आहोत का?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मी या वर्षी ऑर्डर घेतली आहे आणि ते विकणार आहे.’’ मिनी आणि बंड्या दोघे खुसखुस करत हसले. आईने डोळे वटारले.

दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. सर्वजण सकाळी उठून आंघोळी करून नवीन कपडे घालून तयार झाले. मिनी आणि बंड्या चक्क कटकट न करता उठले. पटपट आवरलं. आजोबांना आश्‍चर्यच वाटलं. इतक्यात मिनी आणि बंड्या ओरडले, ‘‘आबा, चला लवकर. बाबांनी गाडी काढलीसुद्धा.’’ आजोबा म्हणाले, ‘‘अरे सतीश, विनया मला काहीच बोलले नाहीत. कुठे बाहेर जायचं आहे का? आज घरी फराळ नाही का करायचा? आज नरकचतुर्दशी. आपण दर वर्षी फराळ करतो मग आज?’’ मुलं म्हणाली, ‘‘आजोबा चला नं, किती प्रश्‍न विचारताय आम्हाला.’’

सर्वजण गाडीत बसले. गाडी एका मोठ्या इमारतीपाशी थांबली. सर्वजण आत गेले. तिथे हॉलमध्ये सजावट केली होती. रांगोळी काढून ताटे मांडली होती. सर्व मुले फराळाची वाट पाहत होती. आता मात्र सारा प्रकार आजोबांच्या लक्षात आला. त्यांनी मिनी आणि बंड्याला घट्ट जवळ घेतलं.

मिनी आणि बंड्या म्हणाले, ‘‘आबा, कसं वाटलं आमचं सरप्राईझ गिफ्ट?’’ आजोबा म्हणाले, ‘‘माझ्या पिलांनो, तुम्ही मला खरंच खूप छान सरप्राईझ गिफ्ट दिलंत. हे मी कधीच विसरू शकणार नाही.’’

विनया म्हणाली, ‘‘बाबा, या मुलांचीच कल्पना बरं का! मी फक्त त्यांना मदत केली. आणि हो, सतीशने सगळा बोनस या मुलांना कपडे आणण्यासाठी खर्च केला. आणि फराळाचे पदार्थ करणार्‍या दोन्ही मावशींनीसुद्धा मदतीचे पैसे घेतले नाहीत बरं का!’’

हे ऐकून तर आजोबांना आनंदाश्रू अनावर होत होते. इतक्यात मिनी आणि बंड्या म्हणाले, ‘‘हे काय हो आबा, तुम्ही रडायला लागलात परत! आम्हाला प्रॉमिस केलं होतंत ना तुम्ही? अशाने आम्ही बोलणार नाही हं तुमच्याशी.’’ आजोबा म्हणाले, ‘‘बरं बाबांनो, सॉरी चूक झाली.’’ मिनी आणि बंड्या खूश झाले. चक्क आबा आपल्याला सॉरी म्हणाले आणि तेही सर्वांसमोर. त्यानंतर सार्‍यांनी अनाथ मुलांबरोबर फराळ केला आणि दिवाळी साजरी केली.

मुलांनो, तुम्हीसुद्धा तुमच्यातला वाटा देणार नं या मुलांसाठी!