दिवाळी अंक म्हणजे सर्वांसाठीच वाचनाची मेजवानी. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण दिवाळी अंक प्रकाशित करणे, ही शिक्षणविवेकची खासियत जपत या वर्षी शिक्षणविवेकच्या बालसाहित्य विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर २०१९ रोजी बालसाहित्यकार राजीव तांबे आणि बालसाहित्यकार ल.म. कडू यांच्या हस्ते प्रकाशित झालेला बालसाहित्य विशेषांक हा बालांबरोबर मोठ्यांच्याही आवडीचा अंक ठरेल. कार्यक्रमाची सुरुवात राजीव तांबे यांच्या ‘कपबशी’ या कथेच्या अभिवाचनाने झाली. शिक्षणविवेक उपक्रम सहाय्यक स्वाती यादव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विवेक समूहाचे समन्वयक महेश पोहनेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातील मैत्रभाव जपत एक चळवळ म्हणून रुजत असलेल्या शिक्षणविवेकची वाटचाल त्यांनी प्रास्ताविकात सांगितली.

 

शिक्षणविवेक संपादकीय सल्लागार आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजीव तांबे यांनी आपल्या मनोगतात मुलांना व्यक्त होऊ देण्याविषयी सांगितले. स्वत:च्या मुलीचे उदाहरण देत त्यांनी मुलांचे विचार करण्याचे वेगळेपण सांगितले.

 

त्यानंतर बालसाहित्यकार ल.म. कडू यांनी ताराबाई मोडकांपासून प्रकाशित होणाऱ्या बालसाहित्याचा आवर्जून उल्लेख केला. मुलांच्या उत्सुकतेला संयुक्तिक उत्तराची जोड मिळाली तर ते उत्तम विचार करू शकतील हे सांगताना त्यांनी विद्याविहार सहलीतील एक अनुभव सांगितला.

 

शिक्षणविवेक संपादक मंडळ सदस्य भालचंद्र पुरंदरे यांनी मुलांची कल्पनाशक्ती वाढीस लागण्यासाठी त्यांना वेगवेगळे उपक्रम करू देण्याविषयी सुचवले. किल्ला बनवण्यासारख्या उपक्रमातून मुलांच्या भाव विश्वाला बहरण्यास आणखी चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

 

शिक्षणविवेक आयोजित स्पर्धांमध्ये उत्तम सहभाग घेतलेल्या मुलांना या वेळी प्रोत्साहानपर बक्षिसे देण्यात आली. शिक्षणविवेक संपादक सहाय्यक सायली शिगवण यांनी बक्षिसांचे वाचन केले. चित्रकला स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, जाहिरात लेखन स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या स्पर्धांसोबतच पालक आणि शिक्षक यांच्यासाठी फोटोग्राफी आणि काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी होणाऱ्यांचे साहित्य दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. मुलांसोबत पालक आणि शिक्षकही बक्षीस घेण्यास उत्सुक होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, लेखिका निलिमा गुंडी आणि शिक्षणविवेक संपादक सदस्य मानसी वैश्यंपायन यांनीही या कौतुक सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. शिक्षणविवेक उपसंपादक रोहित वाळिंबे यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि पालक शिक्षक यांचे आभार मानले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या चित्रांचे प्रदर्शन या वेळी सभागृहात लावण्यात आले होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी चित्र प्रदर्शनाचा लाभ घेतला.