२ ऑक्टोबर १८६९ साली पोरबंदर या गावी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. गांधीजी आपल्या कुटुंबातील सामान्य व्यक्ती होते. ते त्यांच्या विचारांनी आणि कृतींनी असामान्य बनले. मित्र मैत्रिणींनो गांधीजी आपल्याप्रमाणेच शाळेत जायचे. ते नेहमी सत्य बोलायचे आणि शिक्षकांचा आदर करायचे. एका प्रसंगातून आपण हे समजावून घेऊयात. एकदा एक शाळा निरीक्षक शाळेत आले. शिक्षकांनी काही इंग्रजी शब्द लिहून घेण्यास सांगितले. गांधीजींनी kettle हा शब्द चुकीचा लिहिला. हे शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना शेजारच्या मुलाची नक्कल करून तो शब्द बरोबर लिहिण्यासाठी खुणावले. पण गांधीजींनी तसे केले नाही. याचा परिणाम असा झाला की, त्यांचे पाच पैकी चार शब्द बरोबर आले. बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच्या सर्व शब्द बरोबर होते. शिक्षकांनी त्यांना 'ढ' म्हटलेच; पण त्याचा राग गांधीजींना आला नाही. आपण लबाडी केली नाही याचे समाधानच त्यांना अधिक होते. इतकेच नाही मित्रमैत्रिणींनो, ज्या शिक्षकांनी नक्कल करणे हे वाईट आहे हे शिकविले, त्याच शिक्षकांनी नक्कल कर असे सांगणे योग्य नव्हते. तरीही गांधीजींच्या मनातून शिक्षकांविषयीचा आदरभाव कमी झाला नाही. मित्रमैत्रिणींनो नक्कल केल्याने परीक्षेत आपला एक गुण वाढू शकतो, पण तो आपला कधीच नसतो. त्यामुळे आपण जितका अभ्यास केला तितकेच लिहावे. तेच आपले खरे गुण, आपली खरी प्रगती. मित्रमैत्रिणींनो आपल्यासारख्या लहान मुलांच्या कोवळ्या मनावर जीवनातील प्रत्यक्ष उदाहरणे आणि संगत यांचा फार परिणाम होतो. वयाच्या तेराव्या वर्षी उच्च माध्यमिक शाळेत जाऊ लागल्यावर गांधीजींना वाईट संगत लागली. गांधीजींचा एक वर्गमित्र, शेख महताब हा अतिशय सशक्त शरीरयष्ठीचा होता. खेळात आणि सामन्यांमध्ये तो सगळ्यांच्या पुढे असे. गांधीजींना असे वाटू लागले की, इंग्रज राज्यकर्त्यांना या देशातून हाकलण्यासाठी शेखसारखे बलवान व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मांस खाणे आवश्यक आहे. या भ्रामक विचाराने त्यांच्या मनाचा इतका ताबा घेतला की, त्यांनी चोरून मांस खाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्याची चव आवडली नाही. अशाच कुसंगतीच्या प्रभावामुळे काही वेळा त्यांनी सिगारेटस् ओढल्या. यासाठी अनेकदा भावाकडून पैसे घेतल्यामुळे कर्ज झाले. ते कर्ज चुकवण्यासाठी गांधीजींनी घरातील सोनेसुध्दा चोरले. हे सर्व केल्यानंतर मात्र त्यांना विवेकाची टोचणी लागे आणि आपल्या मनाप्रमाणे सद्सद्विवेक बुध्दीला अनुसरून वागण्याचे स्वातंत्र्य आपल्याल्या नाही, म्हणून त्यांचे मन उदास होई. शेवटी सगळ्या अपराधांची कबुली देणारे पत्र लिहन त्यांनी थरथरत्या हाताने ते वडिलांना दिले. वडील त्यांना एका शब्दानेही बोलले नाहीत. त्यांचे डोळे मात्र दुःखाने भरून आले. ते बघून गांधीजी गहिवरले. या घटनेचा आपल्या आत्मचरित्रात हृदयस्पर्शी उल्लेख करताना महात्माजींनी म्हटले आहे, 'मोत्याप्रमाणे टपटपणाऱ्या त्या प्रेमाच्या निर्मल आसवांनी माझी पापे धुऊन निघाली आणि माझे हृदय स्वच्छ झाले.' यानंतर त्यांनी वाईट संगत, प्रवृत्ती सोडली ती कायमचीच आणि त्यांनी सत्याची कास धरली ती आजन्म. सत्य, अहिंसा, सत्याग्रह या तत्त्वांवरच त्यांनी स्वातंत्र्याचा लढा लढला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामान्याकडून असामान्य कर्तृत्व गाजवणारे गांधीजी हे एक महात्मा होते. मित्रमैत्रिणींनो, आईवडील हे ईश्वरासमान असतात. त्यांचा कायम आदर केला पाहिजे. त्यांच्याशी कधीही खोटे बोलू नये आणि कधी चूक झालीच, तर ती सांगून त्यांची माफी मागावी. आपल्यामुळे आईवडिलांची मान लज्जेने झुकता कामा नये. ती नेहमी अभिमानाने ताठ राहिली पाहिजे. यासाठी आयुष्यभर झटले पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, २ ऑक्टोबर, महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आपण संकल्प करूयात की, मी नेहमी खरे बोलेन, वाईट कृत्य करणार नाही आणि आईवडील, शिक्षक आणि सर्व सज्जनांचा कायम आदर करेन.

- सुनील धुमाळ