पाऊस फुले

दिंनाक: 18 Oct 2019 15:03:44


 

पाऊस फुले

  • सोनकी – श्रावण भाद्रपदात फुलांचे वैभव अनुभवायला मिळतं. त्यात ताजेपणा, उत्साह, हिरवेपणा टिकून राहिलेला दिसतो. श्रावणात उगवून आलेल्या गवतांच्या पातीवर छोटी छोटी फुलं फुललेली दिसतात. त्यात अनेक रंगांचे प्रकार दिसतात. तसेच कडेकपारीत टेकडीच्या उतारावरची श्रावणातली सुवर्णकांती सोनकीची फुलं वाऱ्यावर डोलताना दिसतात. पुण्या-मुंबईच्या रस्त्यावर ती सहजी आपणाला दिसतात. सात ते आठ पाकळ्यांच्या या फुलांचे सौंदर्य त्यांच्या हळदी रंगानं वाढतं. सूर्यफुलाच्या कुळातील ही सोनकी सह्याद्रीतील महत्त्वाची वनस्पती. ती किल्ले, पठारं आणि घाटांमध्ये विपुल प्रमाणात दिसते. सरत्या पावसाळ्यातच तिचा येणारा बहर सह्याद्रीला सोनेरी रंग बहाल करतो. ती तशी काटक ! तिच्यात पुंकेसर कळा नसला तरी तिच्या पिवळ्या रंगामुळे किडे, फुलपाखरं, मधमाशा आकर्षित होऊन मधुरस गोळा करतात. सोनकीची पाने दातेरी कडांची मागून चंदेरी रंगाची असतात. पावसाळा सरताना सह्याद्रीच्या भटकंतीत ही तेज:पुंज, तजेलदार सोनकीची लक्षावधी फुले डोळ्यांचं पारणे फेडतात. सोनकीच्या सहा-सात प्रकारच्या जाती सह्याद्रीत आढळतात. यापैकी एक जात सह्याद्रीत फक्त उभ्या कड्यांवरच वाढते. तर एक जात फक्त विदर्भातच आहे. सोनकीचे शास्त्रीय नाव सेनीशिओ ग्राहमायी असे आहे.
  • कापुर्ली – डोंगर उतारावर उगवणारी कापुर्लीची झाडं ही साधारण दोन-अडीच फूट उंचीची असतात. पावसाळा सुरु होताच जमिनीतून हिचे कोंब वर येतात. देठ वर येते. गुलाबी रंगाचं मांसल असं खोड पाण्याने भरल्याप्रमाणे दिसतं. खोडावर कातरलेली लांब गोलाकार पानं येतात. दोन ते चार सें.मी. लांबीची ही पानं असतात. या पानांच्या आतील बाजूला मऊसर पातळ लव असते. फांदीवर या पानांची रचना समोरासमोर असते. दोन-अडीच महिन्यात पानांमधून आठ-दहा इंचाचे जांभळट रंगाचे तुरे वर येतात. या तुऱ्यांच्या टोकावर गच्च भरलेली जांभळ्या रंगाची भरगच्च फुले येतात. या फुलातील वरची पाकळी लहान, खालची पाकळी टोकदार असते. ही फुलं अगदी लहान आकारांची असतात. तुळशीच्या मंजिरीप्रमाणे ही दिसतात.

कास पठारावरील विविध रंगांची निळाई वगैरे कारवी नेत्रसुख देते. क्लोरोफायटम, युट्रीक्युलेरीया ही अल्पायुषी पावसाळी रानफुलं ! मे महिन्यातला राकट, रापलेला सह्याद्री पावसाळ्यात असंख्य रंगीत रानफुलांनी बहरतो. जणू त्यांचा रंगांचा खेळच सुरू होतो. रंगांची सरमिसळ, असंख्य रंगछटा त्यात आढळतात. कधी हळदीबरोबर चिमुटभर लाल सांडलेला, तर कधी निळ्याजवळ पिवळा तर कधी स्वच्छ पांढऱ्या रंगावर जांभळा ठिपका या रंगांच्या जोडीने समर्पक असा पोत, शिरा, ठिपके, पट्टे या गोष्टी फुलांच्या सौंदर्यात भरच घालतात. सह्याद्रीची ही काळी कातळकांती फुलांचे रंग अधिकच खुलवते.

आभाळाचं दान घेऊन आलेली ही निळ्या युट्रक्युलेरीयाने व्यापलेला डोंगरमाथा तसेच जांभळा तेरडा, रानहळद आणि सात-आठ पाकळ्यांची पांढरी फुलं मध्यभागी छोट्या दांड्यांना पिवळे परागकण असलेली क्लोरोफायटमची सुरेख फुलेही मन वेधून घेतात. आपल्या रोजच्या व्यवहारात रंग कुठल्या ना कुठल्या गोष्टींशी जोडले गेले आहेत. कधी त्या विचारधारा वा तत्वप्रणालीचे गुण-दोषही या रंगाला नकळत चिकटलेले दिसतात. भगव्या शेजारी हिरवा, निळ्याशेजारी लाल. पण असं या रंगांचं निकोप, निरागस व्यक्तिमत्व अजूनही टिकून आहे ते या निसर्गातल्याच रान फुलांतच !

निसर्गात निरुद्देश असं काहीच नाही. ती कशी एकमेकांशी न भांडता जात, पंथ न पाहता आनंदाने हसत-खेळत आपलं आयुष्य घालवत असतात. हे पाहून आपल्याला त्यांच्यापासून नक्कीच काही शिकता येण्यासारखं आहे.

पावसाळ्यात कास पठारावर गेलात तर अशी विविध रंगांची उधळण पाहताना डोळ्यांचे पारणे फेटले जाते. किती हे दृश्य मनात साठवून घेऊ असं होऊन जातं.

- मीनल पटवर्धन