चौघीजणी

दिंनाक: 17 Oct 2019 15:53:42


 

बालमित्रांनो, पूर्वीच्या काळी फार लांब, अप्राप्य, वेगळी  अशी वाटणारी अमेरिका आणि तेथील जीवनशैली आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. ‘इंटरनेट’ या जादूगाराने सर्वांना या जागतिक खेड्याचा (Global Village) एक छोटासा घटक बनवून टाकलेले आहे.

त्यामुळेच लहानांचे विश्‍व हे थोड्याफार फरकाने सर्वत्र सारखेच पाहायला मिळते. म्हणूनच आज आपण जगभरात अभूतपूर्व लोकप्रियता मिळवलेल्या आणि हॉलिवूडमध्ये जिच्यावर दोन चित्रपटही बनले आहेत, अशा लुईझा मे. अलकॉट या लेखिकेच्या- प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका शांता शेळके यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘चौघीजणी’ (मूळ पुस्तक) Little Women या पुस्तकाचा परिचय पाहू.

लुईझा मे अल्कॉट या अमेरिकन लेखिकेचे ‘लिटल विमेन’ हे पुस्तक १८६८ ला प्रथम प्रसिद्ध झाले. याला जगभर प्रसिद्धी मिळाली आणि अनेक भाषांमधून याची भाषांतरे ही केली गेली.

यामध्ये असलेल्या मेगा, ज्यो, बेथ, डॉमी या चार बहिणी लेखिकेने स्वत:च्या आयुष्यावरून बेतलेल्या आहेत.

या चौघीजणी एकमेकींहून स्वभावाने अगदी वेगळ्या आहेत. तरीही प्रेमाच्या नात्याने त्या अगदी दृढपणे बांधल्या गेलेल्या आहेत.

त्यांच्या कोवळ्या आशा, आकांक्षा, समस्या, स्वप्ने, सुख-दु:खे वाचताना आपण अगदी त्यांच्याशी एकरूप होऊन जातो. त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या विविध घटना, वयानुक्रमे त्यांच्यात होणारे बदल, अनेकविध संकटे आणि आपत्तींशी त्यांनी दिलेला लढा आणि मिळालेले धडे हे सर्व वाचताना आपणही त्यांच्यासोबत आशा-निराशा, सुख-दु:ख यांच्या झोत्यावर झुलत राहतो.

एकूण ४७ प्रसंगांमधून विभागलेली ही त्यांची कहाणी वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. एका खोल अर्थाने हे पुस्तक जीवनमूल्यांचे संस्कार वाचकांवर घडवते, पण तसे करताना ते कुठेही ढोबळ, बटबटीतपणाने उपदेश करत नाही किंवा कंटाळवाणे होत नाही.

तर बालमित्रांनो, तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल, तेव्हा मिळवा हे पुस्तक आणि वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया शिक्षणविवेकला जरूर कळवा.

मूळ पुस्तक : Little Women ( By Louisa M. Alcot )

(मराठी अनुवाद) : चौघीजणी

अनुवादक : शांता शेळके

- स्वाती गराडे

सहशिक्षिका, म.ए.सो. रेणावीकर विद्यामंदीर