गुलबकावली

दिंनाक: 16 Oct 2019 14:57:37


आठवणींचं कसं असतं ना! एक विण सुटली की पुढचे सारे धागे सुटत जातात. परवा सहजच माझ्या शाळेसमोरच्या रस्त्याने जाण्याचा प्रसंग आला. बदललेल्या शाळेला बघताना ‘गुलबकावली’ची आठवण चेहर्‍यावर हसू फुलवून गेली. गोष्ट अशी की, मला गोष्टीची पुस्तकं वाचायची प्रचंड आवड. वेडंच म्हणा हवं तर. आणि एकदा पुस्तक हातात घेतलं की, वाचल्याशिवाय खाली ठेवायचं नाही शिरस्ता! त्यामुळे अनेक गंमतीदार आणि कायम लक्षात राहतील असे प्रसंग माझ्या आठवणींत जमा आहेत. त्यापैकी एक प्रसंग म्हणजे ‘गुलाबकावली’ मी चौथीत होते तेव्हा. मैत्रिणीने तिच्याकडचे नावासारखेच दुर्मिळ असे ‘गुलबकावली’चे पुस्तक मोठ्या मिनतवारीनंतर दोन दिवसाच्या अटीवर वाचायला दिले होते. पुस्तकातील गोष्ट इतकी मस्त होती की, मी पुस्तक जरासुद्धा बाजूला इतकी मस्त होती की, मी पुस्तक जरासुद्धा बाजूला ठेवत नव्हते. त्यादिवशी तर रात्री झोपताना मी पुस्तक कुशीत घेऊन गुलबकावलीचे स्वप्न पहातच झोपले. दुसर्‍या दिवसाची सकाळही त्याच स्वप्नात तरंगत उगवली. आई रागावली सुद्धा ‘इतकं पुस्तक वेड बरं नाही.’ पण अस्मादिक गुलबकावलीमध्ये इतके हरवले होतो की, आईच्या रागावण्याकडे स्पेशल दूर्लक्ष केले होते मी...

शाळेत पोहोचल्यावरही पुस्तकाचे इमाने इतबारे वाचन चालूच होते. शाळा भरली. प्रार्थनेची घंटा वाजली. तरी मी आपली पुस्तकातच! मैत्रिणीने ढोसलल्यावर कशीबशी प्रार्थनेसाठी जाऊन उभी राहिले. प्रार्थना झाल्यावरही तेच... वर्गहजेरीतही लक्ष नाही की मैत्रिणींच्या बडबडीकडेही लक्ष नाही. बाई वर्गात आलेल्याही समजले नाही इतकी मी पुस्तकात हरवून गेले होते.

आज बाईंनी विज्ञानाच्या नवा धडा शिकवायला घेतला होता. सर्वांना विज्ञानाची पुस्तके बाईंनी उघडायला सांगीतली. मी देखील पुस्तक बाहेर काढले. विज्ञानाच्या पुस्तकात काही माझे लक्ष नव्हते. बाईंच्या ते लक्षात आले. त्यांनी मला उभे करून एक प्रश्‍न विचारला. सुदैवाने मी त्याचे उत्तर दिल्यावर बाईंनी मला खाली बसायला सांगितले व धड्याकडे लक्ष देण्याच्या कानपिचक्याही मिळाल्या. एवढ्यावरुन शहाणी होईल ती मी कसली? माझं आपलं खाली मान घालून वाचन चालूच. बाई जवळ येवून उभ्या राहिलेल्याही कळलं नाही. पाठीत बसलेल्या जोरदार धपाट्यानं कळवळून मी वर पाहिलं तर बाई साक्षात विठूमाऊलीच्या रुपात कमरेवर हात ठेऊन रागानं माझ्याकडे बघत उभ्या होत्या. क्षणात कान पकडून तसंच ओढत मला आमच्या मुख्यबाईंकडे घेऊन गेल्या. ‘बघा..   ही अभ्यासाच्या तासाला गोष्टींचे पुस्तकं वाचत होती.’  मग काय मोठ्या बाईंकडूनही धपाट्यांचा प्रसाद मिळाला आणि वर शिक्षा म्हणून शाळेच्या चौकात दिवसभर अंगठे धरुन उभे राहण्याची शिक्षा मिळाली.

शाळा सुटल्यावर सगळ्या मैत्रिणींनी माझी हुर्यो उडवली. मी अगदी रडवेली होऊन घरी आले तर घरीही माझा प्रताप आधीच समजला होता. मोठ्या बाई माझ्या आधीच माझ्या घरी पोहोचल्या होत्या. मी घाबरले आता परत खरपूस मार मिळणार असा विचार करत असतानाच बाईंनी मला जवळ बोलावले. ‘‘ पुस्तकं वाचनाची तुझी आवड चांगलीच आहे. पण चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी करु नयेत बाळ!’’ असं त्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाल्या. माझे दिवसभराचे दाबून ठेवलेले रडू अनावर झाले. मी चुकले म्हणून मी ओक्साबोक्सी रडू लागले. त्यानंतर बराच वेळ बाई मला समजावत राहील्या. मीही पुन्हा असं न करण्याचे कबूल केले. रात्री आईनेही पुन्हा समजावले. आता मी ठरवले अभ्यासाच्यावेळी अभ्यास करायचा आणि उरलेल्या वेळात गोष्टीच्या पुस्तकाचे वाचन.

दुसर्‍या दिवशी  शाळेत गेल्यावर ‘गुलबकावली’ मैत्रिणीला परत देताना तिच्या हातातला ‘हातिमताई’ मला खुणावू लागला. आणि माझ्या रात्री केलेल्या निश्‍चयाला पूर्णविराम मिळाला.

- मानसी चिटणीस (पालक)

शि.प्र.मं. मराठी माध्यम प्राथमिक, शाळा, निगडी