‘‘मी या परीक्षेत खूप अभ्यास केला होता. पण ऐनपेपरच्या वेळेस मी सगळं विसरले. काही आठवतच नव्हतं मला.’’ नेहा खूप उदास होऊन हे सांगत होती. तिच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ती घोकंपट्टी जास्त करत होती. सराव कमी पडत होता. तसंच ती अभ्यास करायचा म्हणून करत होती, मनापासून करत नव्हती. त्यामुळे ती परीक्षेत कमी पडत होती.

मुलांनो, नेहासारखीच परिस्थिती तुमच्यापैकी बर्‍याच मुलांची असू शकते. का बरं आपल्या लक्षात राहत नाही? असं काय होतं आणि आपण उत्तरच्या उत्तरं विसरतो. जाणून घ्यायचयं तुम्हाला? ऐका तर मग...

 कोणतीही गोष्ट सर्वांत प्रथम आपल्या पंचज्ञानेद्रियांमार्फत ग्रहण केली जाते. म्हणजेच शिकली जाते. त्यानंतर ते मेंदूत जतन केले जाते, म्हणजेच ती माहिती साठवून ठेवली जाते व आवश्यक तेव्हा ती माहिती आठवली जाते. म्हणजेच आपल्या स्मरणशक्तीसाठी शिकणे किंवा ग्रहण करणे, साठवणे आणि आठवणे या तीन पायर्‍या अतिशय महत्त्वाच्या असतात. शिकणे, साठवण व आठवण यापैकी एक जरी पायरीत जर अडचणी आल्या तर आपल्याकडून ती माहिती विसरली जाते.

आपल्या स्मरणशक्तीवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. हे घटक कोणते ते जाणून घेऊ या.

  • आहाराचा स्मरणशक्तीवर परिणाम होत असतो. म्हणून आपल्या आहारात डाळी, उसळी, बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा. दिवसातून एकदा तरी वरण-भात-तूप-लिंबू असा आहार घ्यावा.
  • तुम्ही कोणत्या वेळेला अभ्यासाला बसताय तेही खूप महत्त्वाचं आहे. जागरण करणे नक्कीच चांगले नाही. परंतु झोपायच्याआधी पाठांतर केल्यास चांगले लक्षात राहाते. मात्र ही वेळ प्रत्येकाची वेगळी असू शकते. कोणाचा पहाटे लवकर उठून अभ्यास केल्यासही लक्षात राहू शकतो.
  • तुम्ही जर खूप थकला असाल आणि तशात अभ्यासाला बसलात तरी देखील तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून स्वयंअध्ययनाला बसताना ताजेतवाने असताना बसावे.
  • अभ्यास करण्याच्या इच्छेचा स्मरणशक्तीवर नक्कीच परिणाम होत असतो बरं का. तुम्ही जेव्हा अभ्यास मनापासून करता तेव्हा लक्षात राहण्याची शक्यता नक्कीच वाढते.
  • अभ्यास करताना जितके व्यत्यय जास्त तितकी स्मरणशक्ती कमी होते. म्हणून अभ्यासाला बसताना सर्व साहित्य एकाचवेळी घेऊन बसा. मधेमधे उठू नका. मोबाईल, टी.व्ही. यांसारख्या प्रसारमाध्यमांपासून आवर्जून दूर राहा.
  • ‘माझी स्मरणशक्ती चांगली आहे. मी जो अभ्यास करत आहे तो माझ्या चांगला लक्षात राहात आहे.’ हा विचार देखील तुमची स्मरणशक्ती वाढण्यास नक्की मदरूप ठरेल.
  • जितकी उजळणी जास्त तितकी स्मरणशक्ती चांगली. एबिंगहॉस नावाच्या मानसशास्त्राने यावर एक चांगला प्रयोग केला. प्रयोगाअंती त्याला असे दिसून आले की, एखादा भाग शिकल्यानंतर पहिल्या चोवीस तासाच्या आत त्याची उजळणी केली नाही तर जवळजवळ ७०% भाग विसरला जातो. तसेच त्यांना असेही आढळले की एकदा शिकलेल्या भागाची पुढच्या तीन महिन्यात जर उजळणी झाली नाही तर ९०% भाग विसरला जातो. म्हणजेच तुम्ही तिमाही परीक्षेत एखाद्या धड्याची अधूनमधून उजळणी केली नाही तर तो धडा सहामाही परीक्षेच्या वेळेस पुन्हा नव्याने तयार करावा लागेल. तेव्हा मुलांनो, एक दिवसाच्या आत, एका आठवड्यानंतर, एक महिन्यानंतर व परीक्षेच्या आधी अशा प्रकारे तुम्ही उजळणीचे टप्पे ठेवलेत तर लक्षात राहण्यासाठी ते नक्कीच फायद्याचे ठरेल.

- रश्मी पटवर्धन