शालेय जीवन आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध असतो. म्हणजे अंगाई गाऊन आई पहिल्यांदा संगीतच शिकवते. अगदी बालवाडीच्या आधीही अंगणवाडीपासून ते इयत्ता दहावीच्या सर्व वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शालेय शिक्षणाबरोबर संगीत हातात हात धरून वाटचाल करीत असते. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या यशस्वी जीवनामध्ये कलेचे म्हणजेच संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

बालवयामध्ये -

‘काळा काळा कापूस पिंजला रे

ढगांशी वारा झुंजला रे

आता तुझी पाळी, वीज देत टाळी

फुलव पिसारा नाच!!’

हे गीत गाताना मुलांना आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर पाऊस कसा पडतो? त्याचं निसर्गाशी असलेलं नातं कसं आहे? माणसांबरोबर पक्षांनाही त्यातून आनंद कसा मिळतो? या सार्‍या गोष्टींचे सहजपणे संस्कार केले जातात.

‘बे एके, बे दुणे चार’ हे गाण गातांना मुलांना आपोआप पाढ्यांची गोडी लागते. पाठांतर कसे करावे? हेही समजते. ‘आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही’ ही कविता चालीत गाताना मुलांना आपल्या आयुष्यातील आईचे स्थान, तिची माया हे तर कळून येतेच, पण त्याचबरोबर जेव्हा मुलांना त्या गाण्यातून जाणविणार्‍या सर्व भावना आपण त्यांच्या चेहर्‍यावर पाहतो, तेव्हा खरोखरच आपल्याला धन्यता वाटते आणि मुलांच्या वाढत्या वयाची जाणीवही आपणास सुखावून जाते.

वाढत्या वयाबरोबर मुलांची समजही वाढते. अशा वेळी शालेय मैदानावर एकत्रितपणे गायल्या जाणार्‍या जोशपूर्ण गीतामुळे सार्‍या शाळाभर देशभक्ती ओसंडून वाहू लागते. एकाच लयीत तालासुरात, स्पष्ट उच्चारासहित देशभक्तीपर गीत गाताना सर्व विद्यार्थ्यानींच्या अंगात वेगळेच स्फुरण चढलेले असते. देशभक्ती, राष्ट्रप्रेम, एकात्मता याचे महत्त्व नव्याने पटवून देण्याची आवश्यकताच तेथे उरत नाही. अशाच प्रकारे शालेय विविध प्रार्थना आणि संस्कारगीते गाताना विद्यार्थीनींचे निरागस चेहरे जगातल्या सुंदर चित्रांपेक्षाही अधिक सुंदर दिसतात.

शालेय परिपाठातील विविध प्रार्थना आणि ओंकार साधना यामुळे विद्यार्थी क्षणार्धात शालेय वातावरणाशी एकरूप होतात. अभ्यासक्रमातील निसर्ग गीते, पर्यावरण गीते, लोक गीते (शाहिरी, पोवाडे, गोंधळ, भारूड, जोगवा विविध सणांवर आधारित गीते) इ. परंपरा जतन करणे, संवर्धन करणे आणि समाज प्रबोधन करणे या तीनही गोष्टी साध्य केल्या जातात. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतवाद्याने केल्यामुळे योग्य व पोषक असे वातावरण निर्माण होते.

एकूणच काय तर मनाची एकाग्रता साधणारे उत्तम साधन म्हणजे संगीत होय. संगीतामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो. मन शांत होते, मनाला प्रसन्नता लाभते. असे निरोगी मन अधिक कार्यक्षमतेने काम करू शकते. म्हणूनच शालेय जीवनात संगीताची जोपासना केल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडतात. लहानपणापासून संगीताचे ज्ञान घेतल्यास उत्तम श्रोते तयार होतात. नवीन प्रतिभावान कलाकार तयार होण्यास मदत होते. संगीत कलेचा विकास आणि सन्मान वाढतो. म्हणूनच महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पु.ल. देशपांडे यांनी म्हटले आहे -

‘शिक्षण माणसाला जगण्याची दिशा दाखवते

तर कला माणसाला कसं जगायचं हे शिकविते.’

- डॉ.स्वरदा सचिन राजोपाध्ये

संगीत शिक्षिका, कन्याशाळा, सातारा.