ऑलिंपिक क्रिडा स्पर्धा म्हटलं कि प्रत्येक भारतीयाच्या मनात एक खिन्नतेची भावना उमटते. इतक्या वर्षांनंतरही भारताला ऑलिंपिक स्पर्धेत फारसं यश मिळत नसल्याचं  शल्य  सगळ्याच भारतीय नागरिकांच्या मनात आहे. रशियात नुकत्याच पार पडलेल्या विश्वकौशल्य ऑलिंपिक स्पर्धेनं मात्र भारताच्या अपयशाची ही परंपरा पार  धुवून टाकली आहे. २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१९ या कालावधीत रशियातील कझान येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत भारतीय युवकांनी भरघोस असं यश तर मिळवलंच. एकूण ६३ देशातील १४०० स्पर्धकांशी लढत देत आपल्या युवकांनी १९ पदकं मिळवली. यापूर्वीच्या स्पर्धेत आपल्या देशाला मिळालेल्या पदकांच्या संख्येत या वेळी लक्षणीय वाढ करुन झाली. यामुळे भारताचं मानांकन १९ व्या स्थानावरून ‌उंचावून एकदम १३ व्या स्थानावर आलं आहे. या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन जातीने हजर होते. या जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन मेडल्स पटकावलेल्या कौशल्यवीरांना, स्पर्धेपूर्वी सहा महिने  योगप्रशिक्षण देण्याचं  भाग्य मला लाभलं. भारत सरकारच्या एनएसडिसी  (नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) आणि ‌पुणे क्रेडाई मेट्रो या संस्थांतर्फे मार्च ते ऑगस्ट २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत काही स्पर्धकांना पुण्यात AISSMS कॉलेज (ऑल इंडिया श्री छत्रपती शिवाजी मेमोरिअल ) या ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात आलं. मागील स्पर्धेपर्यंत त्यांना फक्त आपापल्या विशिष्ट कौशल्यांचं (ब्रिकलेईंग, टायलिंग इत्यादी) प्रशिक्षण दिलं जात होतं. पण यावर्षी, या कौशल्यांचं सादरीकरण उत्कॢष्ट व्हावं म्हणून त्याला योगप्रशिक्षणाचीही जोड दिली गेली. या सर्व यशामध्ये क्रेडाईच्या जेपी श्रॉफ, कविश ठकवानी, मिलिंद तलाठी यांनी घेतलेल्या कष्टांचा फार मोठा वाटा आहे. त्याबरोबरच विदुला सायकॉलॉजीच्या आशा जयन यांनी समुपदेशन करुन या मुलांचं मनोधैर्य कायम उंचावलेलं ठेवलं हेही खूप उल्लेखनीय आहे. पश्चिम बंगाल, केरळ, बिहार अशा वेगवेगळ्या राज्यातून,घरापासून  शेकडो किलोमीटर दूर आलेली ही मुलं. त्यामुळे भाषेची मोठी समस्या होती. बहुतेकांचे वडिल ठेकेदाराकडे गवंडीकाम, प्लंबिंग, सुतारकाम करतात. त्यामुळे घरी अत्यंत गरिबी. पण या सगळ्या प्रतिकुलतेवर मात करणारी एकच गोष्ट प्रत्येकाच्या मनात सळसळत होती. आणि ती म्हणजे, आपल्या कौशल्याच्या बळावर देशाचं नाव उज्ज्वल करायचं. अर्थात, मनात ही दुर्दम्य इच्छाशक्ती असली तरी शारीरिक आणि मानसिक ताणही खूप होते. दररोज किमान दहा-बारा तासांच्या सरावामुळे सगळं अंग, विशेषतः मान, पाठ दुखायची. पण नियमित योगाभ्यासातून, या समस्या नाहीशा झाल्या.  शिथिलीकरणाच्या तंत्रांमुळे या तरुणांच्या मनावरचे ताण निघून गेले. ‌  योगासनांमुळे लवचिकता वाढली, स्नायू बळकट होऊ लागले. प्राणायामामुळे कामातली एकाग्रता वाढली. ध्यानामुळे ‌कामातले बारकावे अधिक उत्तम प्रकारे शिकण्याचं आणि साकारण्याचं तंत्र सुधारलं. जागतिक स्तरावर यश मिळणं ही अतिशय अवघड, अत्यंत कष्टसाध्य अशी गोष्ट आहे. आणि या भगीरथ प्रयत्नांना सुरुवात होते ती 'इंडियास्किल्स' या स्पर्धेपासून‌. वर्ल्डस्किल्स स्पर्धेत निवड होण्यापूर्वी, इंडियास्किल्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या अनेक फेऱ्यातून या युवकांना स्वत:मधलं कौशल्य सिध्द करावं लागतं. इंडियास्किल्स या स्पर्धेच्या निमित्तानं हजारो तरुण-तरुणी, गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील फेऱ्या जिंकत शेवटी अंतिम टप्प्यात दिल्लीत येतात. या सगळ्या प्रवासात त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरतं, मिळालेल्या बक्षीसातून स्वत:चा उत्तम व्यवसाय सुरू होतो. देशांतर्गत स्पर्धेतील हजारो युवकांपैकी फक्त तीन तरुण विश्व स्पर्धेसाठी निवडले जातात. या तरुणांना पंतप्रधानांच्या हस्ते खूप मोठ्या रकमेची रोख पारितोषिकं दिली जातात. आपल्या देशात कौशल्याधारित व्यवसायाला म्हणावी तितकी प्रतिष्ठा मिळत नव्हती.  कमी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कौशल्यांची श्रमप्रतिष्ठा वाढवण्यात या स्पर्धांचा खूप मोठा हातभार लागला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, एखाद्या गवंड्याचा मुलगा  अजाण वयातच शिक्षण सोडून अगदी नाममात्र रोजंदारीवर वडिलांना मदत करायला लागतो. या तुटपुंज्या पैशांच्या गरजेपायी, आयुष्यभर दारिद्र्यातच खितपत पडतो. इंडियास्किल्स आणि वर्ल्डस्किल्स स्पर्धेच्या रुपानं या तरुणांची स्वप्नं साकार झाली. ताठ मानेनं जगण्याची, स्वतंत्र व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी मिळाली. हजारो तरुणांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्थांना मनापासून सलाम !!!

  • मनोज पटवर्धन (योगप्रशिक्षक - वर्ल्डस्किल्स) 9881495483