पहिल्या पावसाने आपल्याला जितकं हायसं वाटतं, त्याहून अधिक जमिनीखाली झोपून असलेल्या हजारो जीवांना आणि बियांना हायसं होतं. पहिल्या पावसानंतर ४८ तासांच्या आत पानकुसुम हे छोटंसं फूल जंगलात सर्वत्र उमललेलं दिसतं.

पानकुसुमचं शास्त्रीय नाव ‘पॅनकेशियम ट्रायफ्लोरम’ आहे. पहिला पाऊस पडला की हिचे जमिनीखालचे कंद जोमाने कामाला लागतात. पावसाच्या पाण्याने कंदांना पुरतं भिजवलं की त्यांना लगेच अंकुर फुटतो. आणि पहिल्यांदा बाहेर येतं ते सुंदरसं नाजूक फूल ! आपल्याकडे पावसाळ्यात येणारं हे पाहिलं फूल आहे. एका कंदातून दोन-तीनच फुलं उमलतात. या कंदाला प्रथम फुलं येतात. आणि पानं नंतर जमिनीतून दांडीवर येतो.

कोकण, सह्याद्रीचा पश्चिम किनारा इथे ही फुलं मुबलक दिसतात. छोट्या झाडांसाठी पावसाळ्याचे हे चार महिने महत्त्वाचे असतात. तेवढ्या अवधीत अन्न बनविणं, फुलं फुलणं, फळं, बिया व बियांचे फलन हे सारं करायचं असतं. अनेक छोट्या झाडांचे आयुष्य असते चार महिन्यांचे, त्यानंतर हे झाड वाळून जातं व पुढच्या वर्षी पाऊस येण्याची वाट बघत पसरल्या गेलेल्या बिया झोपून जातात. पुढे पाऊस आला की कंदात साठवलेलं अन्न वापरून पटापट जोमात फुलं किंवा पानं तयार करणं त्यांना शक्य होतं.

पानकुसुम, सापकांदा, शेवळ यांना पावसाळ्यात आधी फुलं येतात आणि मग पान. तर रानहळद, खाज कांदा, नागमणी अशांना फुलं व पानं दोन्ही एकदमच. परागीभवनासाठी वारा, फुलपाखरं, कीटक असणं जरुरीचे असते. त्यावेळेसच फुलं फुलली तर सर्वांत फायद्याचं असतं. पाऊस पडल्या पडल्या बघा पतंगासारखे अनेक कीटक आपल्या दिव्याभोवती येतात. माशा, मुंग्या व अनेक प्रकारचे किडेही पाऊस सुरु झाला की, थोड्याच दिवसात दिसू लागतात.

पानकुसुमची फुलं फार काळ टिकत नाहीत. त्यांच परागीभवनाचं काम होताच त्याची गहुळ्यासारखी फळंही होतात. हिची निळसर झाक असणारी सहा पाकळ्यांची फुलं, मध्यभागी बोटभर उंचीचे पुंकेसर पाहणे अशी अप्रतिम फुलं पाहायला मिळणं नशीबच लागतं म्हणायचं ! उरलेल्या पावसाळी दिवसात पानकुसुमला फुलं, फळं, बिया तयार करायच्या असतात. पानांद्वारे अन्न बनवून पुढच्या वर्षासाठी साठवायचे असतं. बीमध्ये मर्यादित अन्नाचा साठा करायला लागतो. जास्त साठा झाला तर झाड स्वतःचं अन्न तयार करून लागेल पण बियांची संख्या कमी होईल. ती बी जड होईल.

अन्नसाठा बीमध्ये खूप आहे पाहून तो खायला इतर प्राणी टपलेलेच असतात. त्यासाठी तिच्या संरक्षणासाठी बीला कठीण कवच व ते जाड असलं पाहिजे. मग ते जाड कवच फोडून कोंबाला बाहेर यायला वेळ लागेल. तोपर्यंत इतर झाडे उगवतील. मग कोंबाला रुजण्यासाठी इतर झाडांशी तीव्र स्पर्धा करावी लागेल.

जमिनीच्या प्रत्येक इंचासाठी या झाडांमध्ये जणू लढाईच सुरु असते. पावसाळ्यात दाटीवाटीने अनेक झाडे उगवलेली असतात. त्यांच्यात स्पर्धा असते. पाणी, जमीन, पोषक द्रव्यासाठी आणि सूर्यप्रकाश मिळवायला लवकरात लवकर उंच जाणं कोणाची पाने अधिक वर पसरली आहेत, हे पाहावं लागतं. नाहीतर दुसऱ्यांच्या सावलीत असल्याने त्याला जीवन संपवावे लागेल.

अशी स्पर्धा वनस्पती जगतात. सर्वत्र चालू असते. अगदी कीटक प्राण्यांमध्येही सर्वत्र सुरु असते.

क्रायनमलिली, काळी मुसळी पाहायला जंगल वा राष्ट्रीय उद्यानातच त्यावेळी जायला पाहिजे या लिलीचं संस्कृत नाव आहे मधुपर्णिका हं !

- मीनल पटवर्धन