भारतीय सण-उत्सव कुठेनाकुठे निसर्गावर श्रध्दा ठेवून, त्याचे रक्षण करण्याशी जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे ते समाज आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी नाते सांगतात. आपल्याला सणांमधून झाडे, पशु-पक्षी, नाती यांचे रक्षण करण्याचा संदेश मिळतो. नागपंचमीला नागाची पूजा,  वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा,  नारळीपोर्णिमेला समुद्राची पूजा, तसेच नवरात्रोत्सवात विविध स्वरूपात आपण निसर्गाची पूजा करत असतो, त्याचे ऋण व्यक्त करतो.

पावसाळा संपल्याने, वर्षाऋतूने सर्व तर सृष्टी कशी हिरवीगार झालेली असते. त्या वेळी देवीचे आगमन होते. घरात तसेच मंदिरात घटस्थापना केली जाते. या काळात शेतात नवीन पीक तयार झालेले असते. शेतकरी हे नवीन आलेले धान्य देवीला वाहतात. शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. त्याचप्रमाणे आपणही घरात घटस्थापनेच्या दिवशी परडीत माती टाकतो. त्यामध्ये सात प्रकारची धान्य पेरतो. नऊ दिवस त्यामध्ये पाणी घालून काळजी घेतो आणि दहाव्या दिवशी उगवलेली छोटी छोटी रोपे देवीला वाहतो. या प्रथेने आपण धरणीमातेचे आभार मानतो. वंदन करतो. तसेच दिवसात पूजले जाणारे दुर्गादेवीचे वाहन आणि शक्तीचे प्रतीक असलेला सिंहसुध्दा आपल्याला निसर्गाशी असलेल्या जवळिकतेची आठवण करून देतो.

नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रात्र देवीची भक्तीभावे पूजा केली जाते. या उत्सवात देवीचीच पूजा का केली जात असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मित्रमैत्रिणिंनो, या मागे पौराणिक कथा आहे. महिषासूर नावाच्या राक्षसाने त्रिलोकात हाहाकार माजवला होता. तेव्हा देवीने आदिमाता, चामुंडा, दुर्गाभवानी, महिषासूरमर्दिनी, मत्सयकुर्मादी, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, महाकाली असे विविध अवतार धारण करून नऊ दिवस नऊ रात्र महिषासूराशी यध्द के ले आणि दहाव्या दिवशी त्याला ठार करून विजय मिळविला. मित्रमैत्रिणिंनो, ही केवळ कथा नाही, त्यामध्ये एक संदेश, अर्थ दडलेला आहे. आपण दुर्गा शक्तीला साक्ष ठेवून आपल्यातील चांगल्या विचारांच्या आधारे आपल्या मनातील न्युनगंड, निराशा, नकारात्मक विचार तसेच इतरांविषयीचा राग, द्वेष दूर करावा आणि मनाला बलवान, सकारात्मक करावे असा संदेश यातून दिला जात असावा.

नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात खेळला जाणारा खेळ म्हणजे भोंडला. 'ऐलमा पैलमा गणेश देवा', 'एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू' अशी हादग्याची पारंपरिक गाणी गात फेर धरणाऱ्या मुली तुम्ही पाहिल्याच असतील. मित्रमैत्रिणिंनो, हा याच भोंडला का बरं केला जातो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? भोंडला आपल्याला निर्सगात होणाऱ्या बदलाची आठवण करून देतो. या काळात हस्त नक्षत्राला सुरुवात झालेली असते. हस्त म्हणजेच हत्ती. म्हणून हत्तीला हस्त नक्षत्राचे प्रतीक मानून आणि या दिवसात हत्ती बुडेल इतका पाऊस पडावा म्हणून पाटावर हत्तीचे चित्र काढून किंवा हत्ती मांडून त्याची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे भोंडला साजरा करण्यामागे सामाजिक भूमिकाही आहे. पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नसायची. त्यांना सर्रासपणे समाजात मिसळण्याची संधी मिळत नसे. भोंडल्याच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येत असत आणि विचारांची देवाणघेवाण करत असत. आतासुध्दा घर आणि नोकरी यामध्ये स्त्रियांचा बराच वेळ जातो. त्यामुळे मैत्रिणींबरोबर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेलच असे नाही. भोंडल्याच्या निमित्ताने ती संधी स्त्रियांना मिळते. यातील गंमतीचा भाग म्हणजे खिरापतीत काय असेल बरं! याची उत्कंठा शेवटपर्यंत सगळ्यांच्या मनात असते आणि मग खिरापत ओळखून, ती एकत्रित खाण्याचा आनंद घेऊन भोंडला संपतो.

बदलत्या काळानुसार उत्सव साजरा करणाच्या पध्दतीतही बदल होत गेला आणि त्याच बरोबर आपल्या सणांची समाजाशी, निसर्गाशी घातलेली वीण देखील सैल झाल्याची आढळते. नवरात्रोत्सवात गरबा हा मोठ्या प्रमाणात खेळला जात असे. यामध्ये देवीची गाणी म्हणून देवीचा जागर केला जात असे. अलीकडच्या काळात गरब्याचे रूपांतर दांडियात झाले आणि हा खेळ मंदिरातून, रस्त्यावर, गल्लोगल्ली खेळला जाऊ लागला.

खरतरं नवरात्रोत्सव हा एकजूटीचा उत्सव. दांडियाच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात. परस्परांची भाषा, संस्कृती यांची देवाणघेवाण करणे अपेक्षित आहे. पण तसे होते का यावर विचार करणे आवश्यक आहे.

याबरोबरच नवा ट्रेण्ड रूजू पाहतो आहे आणि तो म्हणजे नऊ दिवस नऊ रंग. लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा असे या नऊ दिवसांचे नऊ रंग, एकाच दिवशी बहुतेक जण एकाच रंगाचे कपडे घातलेले तुम्ही पाहिलेच असतील. यामध्ये फरक असतो तो फक्त रंग छटांचा.

नऊ दिवस नऊ रात्रीच्यानंतर नवरात्रोत्सवाच्या सांगतेचा दिवस उजाडतो तो असतो दसऱ्याचा दिवस.

पूर्वीच्या काळी अनेक शूर, पराक्रमी राजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वारीसाठी जात असत. याला सीमोल्लंघन असे म्हणतात. राजे, सरदार हे लोक आपली शस्त्रे साफसूफ करून ती ओळीने मांडत व त्यांची पूजा करत. आता शेतकरी, कामगार, कारागीर स्वत:च्या हत्यारांची पूजा करतात.

विजयादशमीला रावणाच्या प्रतिमेचे किंवा पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आहे..विशेषत: उत्तर भारतात ही परंपरा दिसून येते. श्रीरामचद्रानी विजयादशमीलाच रावणाचा वध केला असे म्हटले जाते, म्हणून हा दिवस दृष्प्रवृत्तीचा नाश करण्याचा, विजयाचा दिवस म्हणून ओळखला जातो. म्हणूनच या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात केली जाते. सरस्वती पूजनाने (पाटीपूजनाने) लहान मुलांच्या शिक्षणाचा श्री गणेशा याच दिवशी केला जातो.

दसऱ्याला आपण आपट्याच्या पानांची पूजा करून सोन घ्या, सोन्यासारखं राहा असे म्हणून एकमेकाना आपट्याची पानं देतो. या दिवशी आपट्याच्या पानाला खूप महत्त्व असते. असे का बरं...याचे उत्तर इतिहासात सापडते. पाडवाचा अज्ञात वास संपल्यानंतर त्यांनी विजयादशमीच्या दिवशी स्वत:ची शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परत काढली व शमीवृक्षाचे पूजन केले. म्हणून आपण दसऱ्याला शस्त्रांची पूजा करून आपट्याची पाने एकमेकांना देतो. आपट्याच्या पानांचे पूजन हे निर्सगाशी आपले नाते दर्शविते. पण सोनं म्हणून लुटण्यासाठी दरवर्षी आपट्याच्या पानांची मोठ्या प्रमाणावर तोड होते, फक्त पाने नाही तर लोक त्याच्या फांद्याच तोडतात. आणि बाजारात विक्रीस आणतात. मुळातच संख्येने कमी झालेल्या आपट्याच्या झाडांवर देखील मानवाने हल्ला केला आहे. दुसऱ्या दिवशी हीच पाने रस्त्यांवर कचऱ्यासारखी पडलेली दिसतात. अशी वृक्षतोड व्हावी असा आपल्या मूळ सण-संस्कृतीचा उद्देश नक्कीच नसावा. पाने भेट देण्याऐवजी आपट्याची रोपे एकमेकांना भेट म्हणून दिली तर वृक्षसंवर्धन होईल. पर्यावरणाचे रक्षण होईल.

नवरात्रोत्सवाचे हे नवे रूप महत्त्वाचे आहे. जे आपल्याला पर्यावरण, संस्कृती-परंपरा, समाज यांच्याशी असलेल्या नात्याची जाणीव करून देते आणि खऱ्या अर्थाने निसर्गाची, प्राणीमात्रांची पूजा करून नवरात्रोत्सव साजरा होतो.

- सायली नागदिवे