व्यक्तिचित्रांबरोबरच मराठी वाचकांना पुलंच्या प्रवासवर्णनांनी भुरळ घातलेली दिसून येते. एक नवीन जग पुलंनी वाचकांसमोर उलगडलं. खरंतर ते जग जुनं होतं, पण पुलंच्या नजरेनं आणि शैलीने त्यांना नवत्व बहाल केलं. पुलंच्या या प्रवासवर्णनांची 'अपूर्वाई' म्हणूनच अजूनही कमी झाली नाही, ती कदाचित याच कारणामुळे."माझ्या पायाला चक्र आहे की नाही मला ठाऊक नाही. पण मला येणारे प्रवासाचे योग पाहिल्यावर एखाद्या ज्योतिषाला पाय दाखवावेसे वाटू लागले आहेत. एक गोष्ट मात्र खरी, मी मायदेशात तसा बैठा माणूस आहे. परदेशात मात्र खूप हिंडतो. आधाश्यासारखा पाहतो आणि जे जे ऐकले - पाहिले ते सांगण्याची मला ओढ लागते. आणि त्यातूनच माझे हे लिहिणे घडते. ही फिरत्याची खोड आहे. सुटेल तेव्हा सुटेल! त्यातून माझे हे सांगणे ऐकणारेही भेटत आले आहेत हे माझे भाग्य! प्रतिभेचे थोर देणे लाभलेल्या एखाद्या साहित्यकाराने ह्यातून शब्दांची कितीतरी मोठी शिल्पे उभी केली असती. ती ताकद माझ्यात नाही, याची जाणीव मला आहे. तरीही लिहिल्यावाचून राहवत नाही, म्हणून हे पांढऱ्यावर काळे" असं पुलंनीच 'जावे त्यांच्या देशा' या प्रवासवर्णनाच्या प्रस्तावनेत नमूद केलं आहे. हे पांढऱ्यावर काळं करायला पुलंची चार प्रवासवर्णनपर पुस्तकं साक्ष आहेत. त्यापैकी अपूर्वाई, पूर्वरंग ही प्रवासवर्णने तर जावे त्यांच्या देशा आणि वंगचित्रे ही प्रवासात आलेल्या अनुभवांची, भेटलेल्या माणसांची, घटनाप्रसंगांची वर्णने असलेली पुस्तके आहेत. पुलंनी जरी त्यांना पांढऱ्यावर काळं असं म्हटलं असलं तरी ज्या ज्या मराठी माणसाला परदेश प्रवासाची संधी मिळाली त्यांनी गाईड म्हणून या पुस्तकांचा उपयोग झाल्याचं सांगितलं आहे.

२० ऑगस्ट १९५८ रोजी पुल बीबीसीच्या शाळेत टेलिव्हिजनचा शिक्षणक्रम शिकण्यासाठी जायला निघाले. हा पुलंचा पहिलाच परदेश प्रवास त्यामुळे त्याची 'अपूर्वाई' खरंच होती. शिवाय अ - पूर्व म्हणजे पश्चिम दिशेचा प्रवास हेही पुलंनी पुस्तकाच्या शीर्षकातूनच सुचवलं होतं. 'संन्याशाच्या लग्ना' सारखी पुलंच्या या प्रवासाची पूर्वतयारीही अगदी प्राथमिक जमवाजमवीपासून झाली. टायची गाठ बांधायला शिकणं, सूट शिवून घेणं, चव्वेचाळीस पौंडांमध्ये सामान बसवणं अशा अनेक रंजक अनुभवांना सामोरं जात पुल लंडनला पोहोचले आणि एक नवीन दुनिया त्यांच्यासमोर खुली होऊ लागली.

या प्रवासात ब्रिटिश आणि युरोपीय रंगभूमीची विविध रूपं अनुभवण्याबरोबरच, एडिंबराचा नाट्य संगीतोत्सव, स्कॉटलंडमधील पिटलॉक्री या खेड्यातील महोत्सव, बॅलेट, रेव्ह्यू, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा रुदरफोर्ड हे सगळंच त्यांच्या स्मरणात राहणारं होतं, विचारांना चालना देणारं होतं.

'अपूर्वाई'नंतर अवघ्या तीन वर्षांत 'पूर्वरंग' हे प्रवासवर्णन वाचकांना उपलब्ध झालं.  मलाया, सयाम, बाली, जपान अशा पूर्वेकडील देशांमधल्या केलेल्या मुक्त प्रवासाचं वर्णन म्हणजे पूर्वरंग. "चार महिने रोज हिंडत होतो. रोजचा दिवस नवा होता. मनात कुठलाही पूर्वग्रह नव्हता. कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा कलाविषयक मताचा आग्रह न धरता जे पाहता येईल ते पाहत होतो. भेटता येईल त्याला भेटत होतो," असं पुलंनीच 'पूर्वरंग'मध्ये म्हटलं आहे.

त्यानंतर १९७० साली बंगाली भाषा शिकण्यासाठी पुल शांतिनिकेतनला गेले. बंगालमध्ये जाऊन तिथल्या लोकजीवनाशी एकरूप होऊन बंगाली भाषा शिकण्याची पुलंची इच्छा होती. त्यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पुल एकटेच बंगालला गेले. हे तीन महिने बंगालमध्ये वेगवेगळे मेळे, जत्रा, कीर्तन यांची धूम असते. अशा वातावरणात पुल तिथे गेले, पण बदलत्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यांना हा दौरा आटोपता घ्यावा लागला. त्यामुळे 'वंगचित्रे' या पुस्तकाची रचना काहीशी वेगळी ठरली. बंगाली भाषेचा, संस्कृतीचा अभ्यासक या रूपात पुल या पुस्तकात दिसतात. त्यामुळे एकूण पुस्तकाचा बाज हा थोडासा चिंतनशील झाला.

याउलट 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकात प्रवासातील एखादी जागा, शहर, निसर्गदृश्य मनावर कायमचं कोरलं गेलं, त्याविषयी लिहिल्यावाचून राहवत नाही म्हणून विचार शब्दबद्ध केले असा लेखांचा प्रकार आहे. त्यामुळे सुरूवात - मध्य - शेवट अशी चौकट इथे दिसत नाही. चार्ली चॅप्लीनला पाहून आपण कसे भारावलो याचं जसं वर्णन पुल करतात तसंच अमेरिकेचं वाढतं ऐहिक वैभव आणि कमी होत जाणारं मानसिक संतुलन बघून  हा 'एक बेपत्ता देश' बनतो आहे, असं पुलंना वाटलं, तर 'उदंड पाहिले पाणी' मध्ये पुलंनी पर्जन्यराजापासून ते बाकी जलावतार यांकडे आप्तमित्रासारखं बघितलं आहे.

व्यक्तिचित्रणात्मक लेखांमध्ये त्या त्या व्यक्तींमधील उणी बाजू लिहिण्याचं टाळणाऱ्या पुलंनी प्रवासवर्णनात मात्र उणीवांवर नेमकेपणाने बोट ठेवलं. त्या त्या प्रदेशातल्या खटकणाऱ्या गोष्टी, अपप्रवृत्ती, त्यांना आलेले अप्रिय अनुभव त्यांनी तितक्याच खुलेपणाने मांडले. त्यामुळे त्या त्या प्रदेशांचे जिवंतपण वाचकांना अधिक भिडलं. याशिवाय एका साहित्यिकाच्या नजरेतून केलेलं हे समाजनिरीक्षण असल्यामुळे स्वतःला आलेले अनुभवच  नेमकेपणाने त्यांनी मांडले. म्हणूनच वाचकांच्याही मनात ते दीर्घकाळ ठसले. त्यांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे "जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काय आहे? प्रत्येक पुरुष आणि स्त्री ही प्रेक्षणीय वस्तू आहे. हर गार्डची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात! जीवनाच्या फलाटावर, आपल्याला घेऊन जाणारी ती अटळ गाडी येईपर्यंत न कंटाळता प्रेमाने उभे राहण्याची धमक मात्र हवी! " पुलं जवळ ती धमक पुरेपूर होती. त्यामुळेच ते विविध गोष्टी विचक्षण नजरेने बघू शकले आणि त्याच गोष्टी ते वाचकांना दाखवू शकले.

पुलंच्या या प्रवासवर्णनपर पुस्तकांमधून पुलंचा स्वतःचाही एक मानसिक प्रवास दिसून येतो. 'अपूर्वाई' लिहित असताना प्रवासाचं प्रयोजन आणि लेखन हे दोन्ही कौतुकाचं होतं, तर 'पूर्वरंग'मध्ये ही अपूर्वाई थोडीशी ओसरलेली दिसते. शिवाय पूर्वेकडील देशांचा हा प्रवास पुलंनी स्वतःच्या हौसेसाठी आणि कोणत्याही जबाबदारीचं ओझं न घेता केलेला होता. त्यामुळे 'अपूर्वाई'त सतत डोकावणारा 'मी' 'पूर्वरंग'मध्ये मागे पडला. 'जावे त्यांच्या देशा'मध्ये त्या त्या व्यक्ती, स्थळं, प्रसंग यांची अधिक चिकित्सा, त्यांच्याविषयीची अंतर्मुखता येते. 'वंगचित्रे' लिहिताना लेखकाचं वय वाढलेलं, अनुभवविश्व फारच समृद्ध झालेलं; त्यामुळे नावीन्य, कौतुक, कुतूहल या भावना तुलनेनं फिक्या पडलेल्या दिसून येतात.

'अपूर्वाई'चा कित्ता 'पूर्वरंग' ने काहीसा गिरवलेला दिसला तरी नंतर 'वंगचित्रे' मध्ये अंतर्मुखतेचं, समाजमनस्कतेचं, समाजचिंतनाचं एक वेगळंच परिमाण पुलंच्या लेखनाला आलं. वाचकांना सुखावण्यापेक्षा अस्वस्थ करण्याची वेगळी वाट पुलंनी चोखाळली असंच म्हणावं लागेल.

-आराधना जोशी
[email protected]

 पुलोत्सव :लेख २ 

गुणग्राही पु. ल.