चला मुलांनो आज आपला पहिला तास गणिताचा आहे आणि आपण वेगवेगळ्या कोनांविषयी शिकणार आहोत. मी काल सांगितल्याप्रमाणे सर्वांनी पट्टी आणि कंपास मधलं सामान आणलंय ना?
शाळेत आपले शिक्षक अशा प्रकारे कोणताही विषय शिकवायला सुरुवात करतानाचा हा संवाद ओळखीचा वाटतोय ना मुलांनो? याला एक प्रकारची पद्धत म्हणूयात आपण. शिकवतानाच्या आणि शिक्षण ग्रहण करतानाच्या म्हणजे शिकतानाच्या अनेक अभ्यासपद्धती असतात. आता बाई ‘कोन’ हा काय प्रकार असतो, याबद्दल वेगवेगळी उदहारणं देत देत तुम्हाला त्याची इत्थंभूत माहिती देणार तसेच अभ्यासातले वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि आपण ते रोज शिकत असतो, या सगळ्या पद्धती एक व्यवस्था मिळून तयार करते. काही या क्षेत्रातले तज्ज्ञ एकत्र येतात आणि त्या त्या इयत्तांच्या मुलांच्या वयानुसार एक अभ्यासक्रम तयार करतात आणि टप्प्या टप्यात शिक्षक त्यांना  शिकवतात.
आपल्या त्या टप्प्यावरचा अभ्यास योग्य पद्धतीनं झालाय की नाही याची पडताळणी करण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. वेगवेगळे प्रकल्प, कार्यानुभव, प्रयोग, लेखन, वाचन अशी सर्व बाजूंनी अभ्यासक्रमाची चोख व्यवस्था लावली जाते आणि यालाच आपण शिक्षणव्यवस्था असं म्हणतो. अगदी छोट्या शिशुपासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत ठरवल्याप्रमाणे अभ्यासाच्या पातळीमध्ये अनेक बदल होत असतात. विषय वाढतात. बोबड्या बोबड्या बोलांमध्ये बोलगाणी म्हणणारं आपलं मुलं आयत्यावेळी दिलेल्या एखाद्या विषयावर सहजसुंदर बोलू लागतं.
आजकाल तर आणि शाळेतल्या शिक्षणाव्यतिरिक्त आपण इतर अनेक माध्यमांचा प्रगल्भ होण्यासाठी वापर करतोय, ही माध्यमं अभ्यासातूनच विकसित झालेली आहेत बरं का! टी.व्ही., मोबाईल, इंटरनेट यांमुळे शिक्षणाचा आवाका वाढलाय. कोणत्याही गोष्टीवर आपण अंधपणे विश्‍वास ठेवत नाही. त्याची चिकित्सा करण्यासाठी माध्यमांनी आपल्याला दोन डोळ्यांव्यतिरिक्त अनेक डोळेच जणू बहाल केले आहेत. माध्यम म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आपण वापरत असलेलं साधन. जसं पुस्तक. टी.व्ही. मोबाईल, कमप्युटर ही आणि अशी अनेक.
पूर्वी काय असायचं याची कल्पना तुम्हाला बर्‍याचजणांना असेलच. गुरुकुल पद्धती ही प्राचीन काळाची शिक्षण ग्रहण करण्यासाठी आपल्या समाजानं निर्माण केलेली पद्धत होती. हल्ली आपण शाळेत जातो आणि शाळा संपली की घरी येतो शाळेतून शिकवलेल्या अभ्यासाची घरी येऊन आईबाबांच्या किंवा  काही मुलं खाजगी शिकवणी वर्गांना जातात; त्या शिक्षकांच्या मदतीनं त्या अभ्यासाची पक्की उजळणी परीक्षेच्या दृष्टीनं करतो. परंतु त्या वेळी मात्र विद्यार्थीदशेत आलेल्या पाल्याला विद्याभ्यासाठी गुरुगृही पाठवलं जायचं. तिथेच राहून तो विद्यार्थी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि तेही प्रात्यक्षिकांसह! मुलांनो, वेदपठण त्यांचा अर्थ. आजूबाजूचा परिसर, अगदी औषधी वनस्पती(झाड), याशिवाय आपली कामं आपणच करणं म्हणजे स्वावलंबन रोज पोट भरण्यासाठी शिधा मागून आपण ते स्वत:च शिजवून खाणं, त्यासाठी लागणारं जळण कांडणही आपलं आपणच शोधणं म्हणजे त्या पुढच्या आयुष्यात आपल्या पालकांचा संग कमी होऊन आत्मनिर्भर होण्याची वेळ येते. त्या वेळी आपण चाचपडत शिकतो ते पूर्वीच्याकाही विद्यार्थीदशेत असतानाच मुलं शिकायची आणि ते ही आपल्या पालकांच्या कोणत्याही मदतीशिवाय मग जर आताच्या काळात आपल्याला जास्त खडतर प्रवास न करता अनेक मदती सज्ज असताना आखून दिलेली अभ्यासपद्धती अवगत करायची आहे, शिकून समृद्ध व्हायचं आहे तर त्या शिक्षणव्यवस्थेला कोणतीही तक्रार न करता सकारात्मक पद्धतीनं स्वीकारलं तर शिक्षक-पालक आणि आपण आनंदी शिक्षणव्यवस्थेचे धनी नक्कीच होऊ शकतो. माध्यमांधून शिक्षण, शिक्षक यांच्यावर जी टिकेची झोड उठवली जातेय त्याला उद्याचे शिक्षक म्हणून आज विद्यार्थीदशेत असतानाच आपण विरोध केला पाहिजे. विनोदापुरतं, ‘बंड्यानं अशी उत्तरं दिली... आणि गुरुजींनी त्याला जाम बदडलं किंवा बंड्यानं दिलेलं चमत्कारिक उत्तर ऐकून गुरुजी जंगलात पळून गेले असे किस्से एका कानानं ऐकून दुसर्‍या कानाने सोडणंच केव्हाही चांगलं असतं. आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात असे अनुभव कधी येतात का? नाही. विनोद हाही मनोरंजनाच्या दृष्टीने आवश्यकच असतो. मात्र जाहिराती, सोशल मिडीयावर शिक्षकांना जे विनोद किंवा कोटी केली जाते ती शैक्षणिक जडणघडणीबरोबरच आपल्या सामाजिक पैलूंच्या उभारणीच्या दृष्टीने घातक आहे. टीका करण्याचा संस्कार कळत नकळत आपल्या मनाचा ताबा घेतो आणि मग शिकण्याची सवय सुटू लागते. शिकण्याची प्रवृत्ती संपली की प्रगतीचे मार्ग आपोआपच बंद होतात. त्यामुळे या माध्यमांचा वापर ज्ञानग्रहण, माहिती संपादन आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी योग्य प्रमाणात केला गेला पाहिजे. संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी पालक, विद्यार्थी आजूबाजूचा परिसर शिक्षणातले सगळे घटक यांनी एकमेकांच्या हिताचा, चांगल्याचा विचार करून एकत्रितरित्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार, अंगीकार आनंदाने केला पाहिजे, तरच शिक्षणव्यवस्थेचे सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे ध्येय खर्‍या अर्थाने साध्य होऊ शकेल.
-माधवी राणे