राम - रावण

दिंनाक: 06 Jan 2019 14:58:19

विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला एका खेळाची करून देत आहोत. तो खेळ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळत असालच. खेळ खेळताना क्रीडा शिक्षकांचीही मदत घ्या. खेळ खेळताना आलेली मजामस्ती आम्हाला जरूर लिहून पाठवा.
ठिकाण : मैदान
वयोगट : ७ ते १४ वर्षे
किती जण खेळू शकतात : कमीत कमी १० मुले किंवा जास्तीत जास्त कितीही
रचना : मैदानावर मध्यभागी एक रेषा आखणे. त्या रेषेपासून सारख्याच अंतरावर दोन्ही बाजूंस दोन रेषा आखणे व दोन गट पाडून मुलांना ओळीत उभे करणे.
 
खेळ कसा खेळायचा :
मध्यभागी रेष आखावी. या आखलेल्या रेषेच्या दोन बाजूंना दोन गट उभे करावेत. एक गट ‘राम’ व दुसरा गट ‘रावण’ असेल. खेळ घेणार्‍यांनी ‘रा..रा..रा..रा..राम’, असे म्हणत कधी ‘राम’, तर कधी ‘रावण’ म्हणायचे. ‘रा..रा..रा..रा..राम’ म्हटले की, रावण गट आपल्या बाजूला रेषेेच्या पलीकडे पळत जाईल व राम गटातील मुले त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतील. ‘रा..रा..रावण’ म्हटल्यास राम गट आपल्या बाजूच्या रेषेच्या पलीकडे पळत जाईल व रावण गट त्यांना पकडायला जाईल. रेषेच्या आत असताना पकडले, तर तो गडी बाद. अशा तर्‍हेने हळूहळू मुलांची संख्या कमी होईल व ज्या गटातील मुलगा शेवटी राहील, तो गट जिंकला.
 
थोडा बदल करून :
यात बदल म्हणून किंवा मुलांना चकवण्यासाठी मधूनच ‘रा..रा..रा..राक्षस’ म्हणावे. राक्षस म्हटल्यास मुलांनी स्तब्ध उभे राहावे. हलणारी मुले बाद होतील.
 
या खेळातून मुलांना काय मिळते? :
१) भरपूर पळापळी होते, त्यामुळे व्यायाम होतो.
२) खेळ घेणार्‍याकडे, तो काय म्हणेल याकडे लक्ष देण्याने एखादी गोष्ट ऐकून ताबडतोब त्यावर कृती करण्याचे कौशल्य आत्मसात होण्यास मदत होते, यामुळे मुलांमधील तत्क्षणी निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
३) दंगा करत खेळता येणारा खेळ असल्यामुळे मुले खूप मजेत खेळतात.