प्रसंग १

‘‘चिनू, आज मला अगदी लाज वाटली तुझी. दोन विषयांत काठावर पास, हा काय रिझल्ट आहे? काय कमी करतो गं आम्ही तुला? थांब इंटरनेटचे कनेक्शन बंद करायला सांगते आणि आजपासून गाण्याचा क्लासही बंद. हाफ डे टाकून शाळेत आले ते काय हा असा रिझल्ट पाहायला? संध्याकाळी बाबा आले की, काही खैर नाही तुझी. जेवून घे आता. मी निघते ऑफिसला.’’ ओपन हाऊसला शाळेत जाऊन आलेल्या आईचा पारा चांगलाच चढला होता. आईच्या धमकीने चिन्मयीच्या काळजात धस्स झाले. आई आता गाण्याचा क्लास नक्कीच बंद करणार आणि संध्याकाळी बाबांचा त्रागा, आईची आदळआपट या विचाराने चिन्मयीच्या जीवाचा थरकाप झाला. ‘‘देवा, सोडव रे आईबाबांच्या तावडीतून.’’ न जेवताच चिन्मयीने गृहपाठ करायला घेतला.
 
प्रसंग २
‘‘हॅलो, रेणू जाऊन आलीस का चिनूच्या शाळेत? चौथ्या चाचणीत किती मार्क्स मिळवलेत तुमच्या लाडूबाईनं?’’ बाबांनी मिटिंग संपताच उत्सुकतेने विचारले. ‘‘इतिहास आणि विज्ञान जेमतेम पास झाल्यात बाईसाहेब, परीक्षेच्या वेळेस रजा घेऊनही काही उपयोग झाला नाही. कार्टीचं लक्षच नाही अभ्यासात. जरा लाड कमी करा तिचे.’’ आई धुसपुसतच उद्गारली. ‘‘तू रागावलीस की काय तिला? संध्याकाळी आपण समज दिली असती तिला. दुपारी घरी एकटी असते. काही भलतंसलतं करून घेतलं म्हणजे? पेपर वाचतेस ना रोज?’’, बाबा म्हणाले.
‘‘अरे देवा, खूप बोलले हो मी तिला. तिच्या भवितव्यासाठीच आपण राबतोय, हव्या त्या सोयी-सुविधा मागायच्या आधीच देतोय ना? आपल्याला कधी नवी कोरी पुस्तकं मिळाली होती काय? इतकं केल्यानंतर चांगले मार्क्स मिळवावे, ही अपेक्षा करणं चूक आहे का? निशासुद्धा काल हेच सांगत होती, तिच्या कुणालचे १०वीचे वर्ष आहे; म्हणून सहलीला न जाता अभ्यास करायला सांगितले, तर खोलीत जाऊन दार बंद करून बसला. धड बोललाही नाही तिच्याशी. मुलांना योग्य कारणासाठी रागावायचीसुद्धा आता भीती वाटायला लागली आहे. मुलांना वाढवताना आपण कुठे कमी पडलो? मुलांशी कसे वागावे तेच कळेनासे झाले आहे.
दोन्ही प्रसंग आज घरोघरी घडताना दिसतात. मुलांची वाढ आणि विकास या दोन्ही वेगळ्या प्रक्रिया असल्यामुळे पालकांचा वैचारिक, भावनिक गोंधळ उडालाय. बदलत्या काळाप्रमाणे पालकांपुढची आव्हाने बदलत चालली आहेत. पालक-बालक नात्याचं एक वेगळ्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.
आपल्या कुटुंबापेक्षा करिअरला अग्रक्रम देणारे पालकही आजूबाजूला मोठ्या संख्येने दिसतात. कारण वेगाने बदलणार्‍या जगात पालकांनाही अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. ऑफिसमध्ये परफेक्शन, परफॉर्मन्सचा आग्रह धरणारे आई-बाबा घरीही ‘बॉस’ बनून वावरायला लागले; तर पालकांशी शेअरिंग, केअरिंग आणि लव्हिंग अशी ओळख मुलांना कशी होणार? मुले ही आपली मालमत्ता नाही. आपण त्यांचे मालक नाही; तर त्यांच्या जीवनाचे विश्‍वस्त आहोत, ही भूमिका पालकांनी समजून घ्यायला हवी. मुलांचं काही चुकलं किंवा त्यांच्या कुवतीबाहेरचं, न पेलणारं काही त्याला नाही मानवलं तर आई-बाबा, न्यायाधीश आणि मुले आरोपीच्या पिंजर्‍यात उभी, हे चित्र कोण बदलणार? पालकांपैकी एकाने कठोर भूमिका घेतली, तर दुसर्‍याने क्षमाशील होऊन मायेची आश्‍वासक पाखर घालून त्यांच्या मनात जागा मिळवावी आणि मग त्याचे काय चुकले, काय बरोबर आहे हे समजावून सांगणे सोपे जाईल आणि त्यामुळे मुलांच्या मनात पालकांविषयी रोष, राग राहणार नाही. या आधीच्या पालकांच्या पिढीला तर खट, एट, डट हे शब्दही माहीत नव्हते; तरीही मुलांच्या मनावर मलमपट्टी करण्याचे औषध त्यांच्याकडे होते. श्यामच्या आईने त्याला चुकीची शिक्षा म्हणून वेताच्या छडीने मारलं, पण रात्री त्याच्या पायाला तेल लावताना तिचे डोळे भरून आले. त्या अश्रूंमुळे तेल लावणार्‍या मऊसूत हातांमध्ये कोवळ्या श्यामला करुणेचे, मानवतेचे मूल्य गवसले. आज चुकलं म्हणून फटके मारणारी आई आहे, पण हळूवार हातांनी तेल लावण्याचा विसर तिला पडलाय का? आपण लहान असताना बाबा रागावले की आईच्या कुशीत शिरून रडता येत होते, पश्‍चातापाने मन निरभ्र होत होते. पुन्हा ती चूक हातून घडू नये म्हणून मनाला बजावता येत होते; पण आपण पालक म्हणून मुलाला परवा दिलेला मार, त्याला आज पुन्हा चुका करायला प्रवृत्त तर करत नाही? कोडग्या आणि कोरड्या मनात संवेदनांचे बीज कसे रुजणार? शिक्षा देणार्‍या हातातली मायेची ऊब आणि वात्सल्याची धग मुलांना जाणवून देणारे पालकत्व आज हवे आहे. पालक म्हणून ज्याची भूमिका स्पष्ट आहे, त्याने योग्य वेळी योग्य पद्धतीने केलेली शिक्षा आणि त्यानंतर ममत्वाने केलेला स्पर्श मुलाच्या वृत्तीत नक्कीच परिवर्तन घडवू शकतो. आज ‘हम दो हमारा एक’ यामुळे मनाच्या तळातलं अगदी आतलं गूज सांगायला, भांडायला, पाठीशी घालायला भावंडे नाहीत. शाळेतही मार्कांच्या रॅट रेसमुळे मित्र नाहीत, आहेत ते केवळ स्पर्धक. अशा सगळीकडून एकाकी झालेल्या मुलांना जीवनाशी बांधून ठेवणारे कसदार, रसरशीत नाते कोण देईल? अर्थातच हे सारे आपण पालकच उत्तम प्रकारे करू शकतो. चला तर मग, आयुष्यावर रुसलेल्या या मुलांना जगण्यावर प्रेम करायला शिकवू या.
 
- मानसी वैशंपायन