कबड्डी

दिंनाक: 04 Jan 2019 15:06:14

कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया या देशांत खेळला जातो. नुकताच चीन व जपान या देशांतही तो प्रसारित झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष खेळणारे सात व राखीव पाच खेळाडू असतात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे व महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाभारत काळापासून खेळला जाणारा हा खेळ अतिशय लोकप्रिय झाला आहे आणि आता प्रो-कबड्डी लीगमुळे या खेळाला खूपच लोकप्रियता मिळाली आहे. या खेळाला पूर्वी ‘श्‍वास’ या नावाने ओळखले जात होते. त्यानंतर बरीच वर्षे हा खेळ ‘अभंग’ या नावाने खेळला जात होता. उत्तर प्रदेशमध्ये याला ‘तो-तो’ या नावाने, तर बिहार व बंगालमध्ये या खेळाला ‘हू-हू-हू’ या नावाने संबोधले जात होते. भारताच्या विभिन्न भागांमध्ये हा खेळ ‘हू-तू-तू’ कुस्ती या नावाने ओळखला आणि खेळला जात होता. आता मात्र भारताच्या विभिन्न भागांमध्ये ‘कबड्डी’ या नावानेच हा खेळ प्रसिद्ध व लोकप्रिय झाला आहे. १९३४मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. १९३६मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. १९३८पासून हा खेळ भारतात ‘राष्ट्रीय खेळ’ म्हणून ओळखला जाऊ लागला. कबड्डी हा खेळ भारतीय हौशी कबड्डी संघटनेच्या (A.D.F.D) अधिपत्याखाली खालील नियमांनुसार खेळला गेला पाहिजे.
क्रीडांगण (मैदान) : क्रीडांगण हे चाळून घेतलेल्या स्वच्छ मातीचे सपाट व मऊ असावे, जेणेकरून खेळताना खेळाडूंना दुखापत होणार नाही.
क्रीडाक्षेत्राचे मोजमाप :
अ) पुरुष व कुमार गट मुले : १३ * १० मी. 


(आकृतीत दाखवल्याप्रमाणे)
पुरुष : ८५ कि.ग्र. वजनाखाली 
कुमारगट मुले : वय २० वर्षे व त्याखालील (वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत) आणि ७० किलो वजनाखालील.
ब) महिला व कुमारगट मुली : १२ * ८ मी. 
महिला : ७५ किलो वजनाखालील
कुमारगट मुली : वय २०वर्षे व त्याखालील.
क) किशोरगट मुले व मुली : ११ * ८ मी.
किशोर गट मुले : वय वर्षे १६ व त्याखालील वर्षांच्या शेवटच्या दिवसापर्यंत) आणि ५५ कि.ग्रॅ. वजनाखालील
३) बाद खेळाडूंसाठी बसण्याची जागा : बाद झालेल्या खेळाडूंना बसण्यासाठी क्रीडांगणाच्या अंतिम रेषेपासून दोन मीटर अंतरावर जागा असावी. त्याचे क्षेत्र खालीलप्रमाणे आयताकृती असावे.
पुरुष व कुमारगट मुले विभागात : ८मी. * १मी.
महिला व कुमारगट मुली विभागात : ६मी. * १मी.
किशोरगट मुले मुली विभागात : ६मी. * १मी.
४) अंतिम मर्यादा (सीमारेखा) क्रीडांगणाच्या चारही बाजूस असणार्‍या रेषेस अंतिम मर्यादा म्हणतात. (या रेषेची रुंदी ३ ते ५ से.मी. असावी.)
५) राखीव क्षेत्र : क्रीडाक्षेत्राच्या दोन्ही बाजूस असणार्‍या १मी. रुंदीच्या पट्टयास ‘राखीव क्षेत्र’ म्हणतात
६) मध्य रेषा : क्रीडांगणाचे दोन सम-समान विभाग करणार्‍या रेषेस ‘मध्य रेषा’ म्हणतात.
७) अंगण : मध्य रेेषेने विभागलेल्या क्रीडाक्षेत्राच्या प्रत्येक विभागास ‘अंगण’ असे म्हणतात
८) निदान रेषा : मध्य रेषेस समांतर असणार्‍या दोन्ही अंगणातील रेषेस ‘निदान रेषा’ असे म्हणतात. मध्य रेेषेपासून ही रेषा पुरुष व कुमारगट मुले विभागासाठी ३.मी अंतरावर असावी.
९) बोनस रेषा : निदान रेषेपासून एक मीटर अंतरावर अंतिम रेषेकडे समांतर असलेल्या रेषेस ‘बोनस रेषा’ असे म्हणतात.
१०) दम : (श्‍वास प्रक्रिया) मान्य केलेला ‘कबड्डी’ हा शब्द स्पष्ट स्वरांत अखंडपणे एकाच श्‍वासात पुन्हा पुन्हा उच्चारित जाणे, यास ‘दम’ असे म्हणतात. दम घेण्याची कालमर्यादा ३० सेंकदांची असेल.
११) चढाई करणारा : प्रतिपक्षाच्या अंगणात दम घालीत जाणार्‍या खेळाडूस ‘चढाई करणारा’ असे म्हणतात. चढाई करणार्‍याने प्रतिपक्षाच्या अंगणास स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ करायला हवा.
१२) बचाव करणारा : ज्या अंगणात चढाईची प्रक्रिया सुरू असेल, त्या अंगणातील प्रत्येक खेळाडूस ‘बचाव करणारा’ असे म्हणतात.
१३) दम सोडणे किंवा जाणे : ‘कबड्डी-कबड्डी’ असा शब्दोच्चार सतत एकाच श्‍वासात करत असताना मध्येच श्‍वास घेणे या क्रियेस ‘दम सोडणे किंवा दम जाणे’ असे म्हणतात. दम घेणे व तो सुरू ठेवणे, या दोन्ही क्रिया प्रथम घेतलेल्या एकाच श्‍वासात करणे आवश्यक आहे. दम हा एकाच श्‍वासात जास्तीत जास्त ३० सेंकदांचा असावा. जर चढाई करणार्‍याने आपल्या अंगणात सुरक्षित येण्यासाठी ३० सेंकदांची कालमर्यादा ओलांडल्यास तो बाद झाला असे पंचांनी घोषित/जाहीर करावे.
१४) पाठलाग : आपल्या अंगणात परत जाणार्‍या चढाई करणार्‍यास बाद करण्याच्या हेतूने, बचाव करणारा नियमाचा भंग न करता दम घेऊन प्रतिपक्षाच्या अंगणात धावून जातो, या क्रियेस ‘पाठलाग’ असे म्हणतात.
१५) खेळ चालू असताना खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा अंतिम मर्यादेबाहेर जमिनीस स्पर्श झाल्यास तो खेळाडू ‘बाद’ झाला असे समजावे. पण झटापटीच्या वेळी मात्र खेळाडूच्या शरीराचा कोणताही भाग क्रीडांगणाच्या मर्यादेच्या आत जमिनीस लागलेला असेल, तोपर्यंत तो बाद झाला, असे होत नाही.
१६) आपली पाळी नसताना, जर खेळाडू दुसर्‍याच्या अंगणात गेला, तर त्याला पंचांनी परत बोलावून विरुद्ध संघास एक गुण द्यायचा असतो.
१७) तृटीत काळ : संघनायक/संघशिक्षक/कोणताही सहभागी खेळाडू सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर तीन वेळा व नंतर तीन वेळा तृटीत काळ मागू शकेल. मात्र, अशा प्रत्येक तृटीत काळाची मर्यादा ३० सेंकदांपेक्षा जास्त असणार नाही. तृटीत कालावधीत जेवढा वेळ गेला असेल, तेवढाच वेळ उरलेल्या वेळात समाविष्ट करण्यात येईल.
१८) खेळाडू बदली करणे : सरपंचाच्या परवानगीने सामन्याच्या तृटीत कालावधीत अथवा मध्यंतरात दोन खेळाडू बदलता येतील.
१९) एखादा खेळाडू सामन्यासाठी निलंबित अथवा बडतर्फ झाल्यास त्याच्याऐवजी बदली खेळाडू घेता येणार नाही. त्या संघास तितक्या कमी संख्येने खेळावे लागेल.
२०) अंतिम निकाल : सामन्याच्या शेवटी ज्या संघाने अधिक गुण मिळवले असतील, त्या संघास विजयी झाल्याचे घोषित करण्यात येते.
असे अनेक नियम आहेत, परंतु काही महत्त्वाचे नियम लिखित केले आहेत.
 
-रोहिदास भारमळ
 
लंगडी या खेळाविषयी माहिती घेऊ खालील लेखात 

 लंगडी