मदनबाण, कागडा, सायली 

मदनबाणाचे शास्त्रीय नाव – जॅस्मिनम ओडोरॅटिसिमम असं असून तो ओलिएसी कुळातील आहे. या सरळ, उंच वाढणाऱ्या, गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या झुडूपाचे मूलस्थान कानेरी व मादीर बेट आहे. भारतात त्याची लागवड सुवासिक फुलांसाठी, शोभेसाठी केलेली आढळते. याच्या फांद्या काहीशा कोनयुक्त, सहज न वाकणाऱ्या असतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी विभागलेली असतात. पर्णदले ३ वा ५, चकचकीत अंडाकृती व विशालकोनी असतात. फुले पांढरी, पिवळी, सुगंधी असून शेंड्याकडे उन्हाळ्यात येतात. फुले आल्यावर पालवी कमी दिसते. देठ थोडे लहान वाटते. पाकळ्या ५, लांबट, विशालकोनी बहुधा नलिकेपेक्षा आखूड असतात. इतर शारीरिक लक्षणे ओलिएसीत वर्णन केल्याप्रमाणे असतात.

तैवानमध्ये याची लागवड फुलांसाठी करतात. तेथे फुलांचा उपयोग चहाला सुवास देण्यासाठी करतात. सुकल्यानंतरही फुलांचा सुगंध टिकून राहतो. फुलांपासून ०.११६ % लालसर तपकिरी अर्क निघतो. त्यामध्ये लिनॅलुल डी-लिनॅलिल ऑसिटेट, बेंझिल, अल्कोहॉल, बेंझिल ऑसिटेट, मिथिल अँथ्रानिलेट, इंडॉल व सेस्क्किटर्पिन किंवा डायटर्पिन अल्कोहॉल ही रसायने असतात. मात्र त्यात जॅस्मोन नसते. मदनबाण हा जाई व मोगऱ्याचा प्रकार आहे.

कागडा

कोणी याला रानमोगराही म्हणतात. ही कुंदाची पांढरी शुभ्र जात. याचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम ल्युबिसेन्स याचे कुळही ओलिएसी. या आधाराने चढणाऱ्या झुडपाचा प्रसार चीन व भारतात सर्वत्र असून कोकण, दक्खन व कारवारच्या जंगलात आढळतो. बागेत लागवडीतही तो दिसतो. कड्यावरच्या रानावनातल्या कुंदाच्या काही कळ्या शुभ्र पांढऱ्या, तर काही जाईपेक्षाही लालसर रंगावर असतात. कुंद रानवट पण त्याला अनोखा मृद्गंध वास असतो. त्याला रानाच्या मेव्याचा अनोखा साज असतो. एखाद्या तरुणीच्या सुंदर दातांना कुंदकळ्यांची उपमा दिली जाते. हा दिसायला मोहक, किमतीला माफक आणि टिकायला काटक असतो. मोगरा महाग असल्याने यालाच जास्त मागणी असते.

पाने व कोवळ्या भागांवर मखमली लव आढळते. पाने काहीशी जाड व आखूड देहाची साधी, समोरासमोर, अंडाकृती, टोकदार, दोन्ही बाजू लवदार असतात. फुले लहान, बिनदेठाची, पांढरी वर्षभर झुबक्यांनी येतात. याच्या काही जातीत मंद पण मोहक वास असतो. डिसेंबर-जानेवारीत ती अधिक येतात. पाकळ्या ६-९ व रुंद असतात. अति थंडीत मात्र ही झाडे मुळापर्यंत मरतात. पण थंडी कमी झाली की, ती पुन्हा वर येतात. ५ ते ८ फुट उंचीचे हे झाड रुजण्यास व वाढण्यास सोपे.

याची लागवड फाटे कलम वा दाब कलमांनी केली जाते. वाढीला सूर्यप्रकाशाची गरज व निचरा होणारी जमीन लागते. लागवडीला कोणत्याही प्रकारची जमीन याला चालत असली. तरी सुपीक किंवा ओलसर रेताड जमिनीत ती उत्तम वाढते. सेंद्रिय खत याला चांगले. कलमे पावसाळ्यात लावतात. पुढे जरुरीप्रमाणे खतपाणी करावे. छाटणी करावी. याला २८ डिग्री फॅरनहाईट ही उष्णता योग्य असते. रासायनिक खताची जरुरी नसते. फुले येऊन गेल्यावर तो झुबका काढून टाकावा म्हणजे नवीन फुलांना यायला वाव मिळेल.

कुंपणाजवळ लावायला ही झाडे उपयुक्त. याचे हार, गजरे केले जातात. कळ्याही सजावटीसाठी योग्य म्हणून त्यांची खूप मागणी भारतात - शहरातून असते.

फुले वांतीकारक असतात. याची सुकी पाने पाण्यात भिजवून त्याचे पोटीस जुनाट व्रणावर लावतात. याची झुडपे शोभिवंत असल्याने जाळीवर किंवा एखाद्या ठेंगण्या झुडपावर चढवतात.

कागडा, नेवाळी ही कुंदाची भावंड.

सायली

हिचे शास्त्रीय नाव – जॅस्मिनम कॅलोफायलम, कुळ ओलिएसी. हे अतिसुंदर फुलझाड झुडूपासारख्या वेलीचे मूलस्थान निलगिरी असून तिचा प्रसार गुजरात, कोकण, अन्नमलाई व तिन्नेवेली टेकड्या येथे असून ती समुद्र सपाटीपासून सुमारे १,३३० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात आढळते. अलीकडे भारतात शहरातील बागांत, उद्यानात, सायलीचा बराच प्रसार झालेला आहे. पाने समोरासमोर किंवा एकाआड एक व त्रिदली असतात. दले अंडाकार, चिवट व चकचकीत असतात. फुले पांढरी शुभ्र, द्विलिंगी, नियमित, साधारण २.५ सें.मी. व्यासाची असून पुष्पमुकुट समईसारखा असतो. सायली झाडावरच फुलते. पाकळ्या दहा असून वर्षभर सुवासिक फुले येतात. मृदू फळे गर्द जांभळी व द्विभक्त (थोडी विभागलेली) असतात.

जाई, जुई, चमेली, कुसर इ. जाती सायलीच्या जॅस्मिनम प्रजातीतील असून याच्या ४० जाती भारतात आढळतात. या सर्व जाती एकाच कुळातल्या ओलिएसीत आहेत. तसेच कुंद, कागडा, नेवाळी ही आणि मदनबाणसुद्धा. चमेलीचा वेल म्हणजे अक्षरशः वेलांचा गुंता असतो. चमेलीला आरोग्याचा आदर्श समजतात. चमेलीची बहीण – सायली – पांढुरकी – पिवळट.

सायलीच्या लागवडीसाठी छाट कलमे, दाब कलमे, धुमारे वापरतात. तिला सर्व प्रकारची जमीन चालते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला ती खणून/नांगरून मऊ भुसभुशीत करतात व त्यात चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत घालतात. क्वचित रासायनिक खते देतात. तयार रोपे पावसाळ्याच्या सुरुवातीला लावतात. वेल मांडव, भिंती, लगतच्या झाडावर चढवितात. फुलांचा मुख्य बहर जून-सप्टेंबरमध्ये येतो. ही फुले सायंकाळी उमलतात. वर्षातून एकदा छाटणी करून, जमीन नांगरून खते देतात. व नियमित पाणी देतात. गरजेप्रमाणे रोगाचा प्रादुर्भाव नाहीसा करण्यासाठी आर्सेनेट हे कीटकनाशक फवारतात.     

-मीनल पटवर्धन 

[email protected] 

सुगंधी द्रव्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या जाई — जुई या फुलांविषयी माहिती घेऊ मीनल पटवर्धन यांच्या खालील लेखात.

जाई — जुई