‘ज्ञान नाही विद्या नाही, ते घेणेची गोडी नाही।
बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का?’
असा जळजळीत प्रश्‍न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या दीनांना प्रकाशाचा मार्ग दाखवणार्‍या पहिल्या स्त्री-शिक्षिका सावित्रीबाई फुले.
तो काळच असा होता की, त्या काळात लहान वयातच लग्न होत असे. फुले दांपत्यसुद्धा त्याला अपवाद नव्हते. असे जरी असले, तरी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक आगळे-वेगळे दांपत्य होते. पुण्यातील मुलींची पहिली शाळा, तसेच अस्पृश्य मुलींची शाळा सुरू करून, देशातील साक्षरता अभियानाची खरी सुरुवात त्यांनी केली. ज्ञान ही फार मोठी सत्ता असून, त्याविना स्त्रिया आणि दलित-बहुजन वर्ग यांची उन्नती होणार नाही, हे ओळखून प्रत्यक्ष शिक्षण प्रसाराच्या कार्याला त्यांनी आयुष्यभर वाहून घेतले. स्त्री-पुरुष समता आणि सामाजिक न्याय यांची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी कडवी झुंज दिली.
सावित्रीबाई फुले या केवळ एक शिक्षिकाच नव्हत्या, तर शैक्षणिक मानसशास्त्राच्या उद्गात्याही होत्या. १८५३मध्ये त्यांनी सिद्धांत मांडला की, ‘ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुले येतात, त्यांचा बरा-वाईट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असतो.’ त्या काळातही सावित्रीबाईंनी समाजाचा अभ्यास करून मांडलेला हा सिद्धांत आजही आणि यापुढेही अनमोल ठरणार आहे. अनाथ, तसेच विधवांच्या बाळंतपणासाठी, त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी १९६३मध्ये त्यांनी स्वत:च्या घरात ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ काढले. १९७३मध्ये ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना करून; हुंडाबंदी, बालविवाह, तसेच जाति-निर्मूलन यांसारख्या समस्यांनी त्रस्त समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी खंबीरपणे पुढाकार घेतला. या सर्वच बाबींवरून आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच झाली, यात काही शंकाच नाही. दुष्काळात खितपत पडलेल्या लोकांना अन्नछत्रे उभारली, याची सर्व जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली. महात्मा फुले यांच्या महानिर्वाणानंतर सत्यशोधक समाजाची पताका सावित्रीबाईंनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि सत्यशोधक समाजाची वाट खेड्यापाड्यांत पसरू लागली. दुष्काळात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या न्यायासाठी त्या लढल्या. 
त्यापाठोपाठ पुण्यात प्लेगच्या साथीने प्रचंड धुमाकूळ घातला, परंतु याही काळात सावित्रीबाईंचे कार्य अद्वितीयच होते. त्या कधीही थकल्या नाहीत. सतत हा मायेचा झरा दीनांसाठी वाहतच होता. प्लेगच्या आजाराने सावित्रीबाईंना विळखा घातला आणि ही तेजस्वी तारका निखळली. सावित्रीबाईंचे महानिर्वाण झाले.
आज त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणेची बीजे रुजली, अंकुरली आणि त्याची रोपे वाढून; ज्ञान, समता, न्याय यांचा वृक्ष बहरलेला दिसत आहे. शिक्षण, सामाजिक न्याय आणि जाति-निर्मूलन या क्षेत्रांत त्यांनी जे योगदान दिले, ते आजच्या वर्तमानालाही उजळून टाकणारे आहे. सावित्रीबाईंनी साहित्यातदेखील आपला ठसा उमटवला आहे. ‘काव्यफुले’, ‘बावन्नकशी’, ‘सुबोध रत्नाकर’, ‘ज्योतिबास पत्रे’, ‘ज्योतिबांची भाषणे’ असे विविधांगी लेखनही त्यांनी केले. सावित्रीबाईंनी आयुष्यभर ज्योतिरावांना दिलेली साथ ही अजोड होती. हे दांपत्य म्हणजे स्त्री-पुरुष समतेचे आणि शांततामय सहजीवनाचे आदर्श प्रतीक आहे.
३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा स्त्रीमुक्तीदिन म्हणून संबोधण्यात येतो. आजच्या वर्तमानकाळात आपल्या समोरचे प्रश्‍न खर्‍या अर्थाने सोडवायचे असतील, तर सावित्रीबाईंनी दिलेली ही शिदोरी आपले जीवन सदैव समृद्ध करत राहील. स्त्रीच्या व्यक्तित्वाचे आणि कर्तृत्वाचे उदात्त, क्रांतिकारक दर्शन घडवणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन.
- अस्मिता सुरेश सावंत 
साहायक शिक्षिका, अभिनव विद्यामंदिर, कल्याण