चुपचाप आयडिया

दिंनाक: 28 Jan 2019 14:59:35


दुपारची शांत वेळ होती. सारा आईच्या समोर बसून पुस्तक वाचत होती आणि आई साराचं बोलणं ऐकता ऐकत भाजी निवडत होती. साराला मधेच थांबवत आईने विचारलं, ‘‘आज गीता नेहमीपेक्षा उशीरा आली वाटतं?’’

‘‘ऑ.. तुला कसं कळलं? तू कुठं पाहिलंस तिला?’’

‘‘कमालच आहे तुझी, पाहायला कशाला पाहिजे तिला? अगं, गीता बाजूने गेल्याचं डोळे नसलेल्या माणसालासुद्धा कळेल.’’

‘‘कसं काय?’’

‘‘आत्ता ती जिन्यावरून वर गेल्याचं तू ऐकलं नाहीस का? फटाक् फटाक् आवाज करत ती जिने चढते आणि फटाक् फट, फटाक् फट आवाज करत ती जिने उतरते आणि तिला चालताना पाहिलं आहेस का..?’’

‘‘अंह. ऐकलं आहे! खस् खस् पाय घासत चालते ती.’’

‘‘असं खसर फटर, खसर फटर करत चालू नये इतकं पण तिला कसं समजत नाही.’’

‘‘पण आई, ती तरी काय करणार? ती सँडल्स किंवा बूट नाही ना वापरत. ती पायात स्लीपर्स घालते. त्यामुळे जिने चढताना-उतरताना सटाक् फटाक् आवाज होणारंच ना? आपण स्लीपर अंगठ्यात पकडली की मागचा भाग तरंगतंच राहतो ना? म.. तो सटाक् फटाक् करणारंच की.. काय?’’

‘‘सारा तुझं म्हणणं खुपसं खरं आहे. पण सगळं नाही.’’

‘‘म्हणजे..?’’

‘‘माझ्याकडे पण आहेत स्लीपर्स. अजिबात आवाज न करता मी तुला जीना चढून आणि उतरून दाखवते...’’

‘‘थांब.. थांब. आधी मी पाहते’’, असं म्हणत साराने स्लीपर्स घातल्या आणि ती घराबाहेर पळाली.

दोन मिनिटातच परत येत साराने आईला हसतच विचारलं, ‘‘ऐकलीस का माझी चढ-उतर? मी सॉलीड ट्राय केला.. पण कसं शक्य आहे गं?’’

आई हळूच हसतच म्हणाली, ‘‘गीतापेक्षा थोडा कमी आवाज. आता माझी पाळी. पण मी एकटी नाही जाणार. मी काय ट्रिक करते ते शोधून काढ.’’

आई आणि सारा दोघी मिळून जिने उतरू लागल्या. आई चूपचाप पायर्‍या उतरू लागली तर साराचा ऑर्केस्ट्रा सुरू झाला. आई समोर दोन्ही हात पसरून सारा म्हणाली, ‘‘आधी थांब. तू काय आयडिया करतेस ते मला सांग.’’

‘‘अं हं. अजिबात नाही सांगणार. तू जिन्याच्या एकदा खाली उभी राहा आणि एकदा वरती. नीट पाहा मी काय करते. अगदी सोपी ट्रिक आहे ही.’’

आईने सांगितल्याप्रमाणे साराने आईच्या पावलांवर लक्ष केंद्रित केलं. तर तिला एव्हढंच कळलं की जिने चढ-उतर करताना आईच्या पायातल्या स्लीपर्स मागच्या बाजूने न तरंगता, त्या खोटेला घट्ट चिकटून असतात. त्यामुळे अजिबात आवाज येत नाही. पण हे असं कसं होतं, हे मात्र तिला काही कळेना.

सारा फुणफुणत आईला म्हणाली, ‘‘हे काय? मी आणि गीता काय वेड्या आहोत का? तू काही तरी जादू करतेस..’’

साराला जवळ घेत तिला समजावत आई म्हणाली, ‘‘असं काय बोलतेस सारा? अगं प्रत्येक डिझाईनच्या मागे एक लॉजिक असतं आणि त्या लॉजिकच्या मागे विज्ञान असतं. वेगवेगळे प्रयोग करून आपल्याला ते विज्ञान शोधून काढावं लागतं.. कळलं..?’’

‘‘काहीसुद्धा कळलं नाही गं. मला समजेल असं सांग ना...’’

‘‘ओके. काही हरकत नाही. तू किंवा गीता पायात ज्याप्रमाणे पायात स्लीपर अडकवता त्याप्रमाणे मी अडकवत नाही म्हणून आवाज येत नाही हे स्पष्टच आहे.’’

‘‘खरं सांगू का आई, मला अजून काहीच कळलं नाही.’’

‘‘हं. तुझा उजवा पाय वरती उचल आणि तुझ्या उजव्या पायाचा अंगठा किंचित खाली दाब. बघ काय झालं..?’’

‘‘ओह वॉव! ही मागे तरंगणारी स्लीपर खोटेला घट्ट चिकटली. कमाल आहे!’’

सारा आता काय कर..

आईला थांबवत सारा म्हणाली, ‘‘थांब. तू नको सांगूस. मला शोधून काढू दे. चल.. आता आपण दोघी मिळून जिना उतरू या.’’

आणि खरंच दोघीजणी चुपचाप जिना उतरल्या.

उजव्या हाताचं पहिलं बोट सरळ करून, दुसेर्‍या बोटाने चुटकी वाजवत सारा म्हणाली, ‘कळली मला ती चुपचाप आयडिया. चालतानापण ही वापरता येईल.’

‘‘हो. पण चालताना त्यात थोडा बदल म्हणजे..’’

आईचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सारा झपाझप चालू लागली होती.. आधी ऑर्केस्ट्रा सुरू झाला होता पण थोड्याचवेळा सार काही शांत शांत.

‘‘हं, चालताना पाय उचलून टाकायचा आणि पाय उचलला की, आहेच की आपली चूपचाप आयडिया. आई हो किनई?’’

आईने साराला शाबासकी देत चुपचाप मान हलवली.

काऽऽय? जिने उतरायची चुपचाप आयडिया कळलीय का तुम्हाला? तुम्ही जिने चुपचाप उतरता की ऑर्केस्ट्रा करत.. सांगाल मला?

मी तुमच्या चुपचाप पत्रांची वाट पाहतोय.

-राजीव तांबे

[email protected]

राजीव तांबे यांची कथा 
शहाणा कावळा