'शिक्षण माझा वसा' राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला संपन्न

पुणे : ‘विवेक समूह’, ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’, ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन’, 'महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश' आणि ‘शिक्षणविवेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा आणि अ.भा.मराठी साहित्य संमेलाध्यक्ष मा. डॉ. अरुणाताई ढेरे यांचा सत्कार समारंभ रविवार दि. २७ जानेवारी २०१९ रोजी सायं. ५.०० ते ७.०० या वेळात आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला होता. तसेच ग.दि.मा. आणि बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ज्योतीने तेजाची आरती’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

अ.भा.मराठी साहित्य संमेलाध्यक्ष मा. डॉ. अरुणाताई ढेरे यांचा सत्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते मानपत्र आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "भाषा आणि साहित्य हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आपल्या मराठी भाषेचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे. मराठी शाळा वाचल्या पाहिजे म्हणून आपण शासनाला वेठीस धरतो, पण आपण स्वतः किती प्रयत्न करतो? मुलांना भाषा आणि साहित्याची गोडी लागावी यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी काम करणे खूप गरजेचे आहे. हल्ली जे प्रश्न आपल्या सर्वांना भेडसावत आहेत, अशा प्रश्नांवर अनेक साधी साधी माणसं आपल्या परीने काम करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे.

अरुणाताईंच्या सत्कार समारंभावेळी एअर मार्शल भूषण गोखले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'शिक्षकाला नेहमी विद्यार्थ्यांमध्ये आपले प्रतिबिंब दिसत असते. आणि तो विद्यार्थी जसा जसा घडत जातो तसं तसे ते फुलत जाते. तसेच आपण कितीही मोठे झालो तरी पाय नेहमी जमिनीवरच ठेवले पाहिजेत. माझ्या सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती, ती अशी की, जे काही वरती जाते ते परत खाली जमिनीवर येते, म्हणून आपण कितीही मोठे झालो तरी पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजे."

'शिक्षण माझा वसा' हा राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करणारे टी. बी. लुल्ला त्यांची शिक्षण क्षेत्राविषयीची भूमिका मांडताना म्हणाले, "कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी खरी अपूर्णता ही शिक्षण क्षेत्रातच जाणवते. त्यामुळे मी स्वतः अभ्यास केला आणि शिक्षण क्षेत्रात काम करायचं ठरवलं. त्यावेळी माझ्याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे तीन पर्याय होते. त्यातून मी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कसे घडवता येईल याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांना सोबत घेतले.   माझा यामागचा उद्देश एवढाच होता की, प्रत्येक विद्यार्थी आपल्या देशाला उपयोगी पडेल असा तयार झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना देखील प्रोत्साहन दिले पाहिजे. म्हणून आम्ही ३ वर्षात ३० शिक्षकांना 'शिक्षण माझा वसा' हा पुरस्कार दिला आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा एक व्हिडिओ बनवून तो संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना दाखवून त्याद्वारे आम्ही त्यांना प्रेरणा देण्याचं काम करणार आहोत."

पुरस्कार मिळाल्याने आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. त्यामुळे आपल्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. याचं उद्देशाने महारष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील उपक्रमशील युवा शिक्षकांचं काम प्रकाशझोतात यावं आणि त्यांच्या कार्याला अधिक गती मिळावी म्हणून २०१६ पासून 'शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराची सुरुवात झाली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये, श्री.सचिन बेंडभर (भाषा विषय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वढुु खुर्द), श्री. सतीश चिंधालोरे (जिल्हा परिषद डिजिटलपब्लिक स्कूल, खराशी, जि. भंडारा), श्री. अमर खेडेकर (जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा नाथाची वाडी, तालुका दौंड, जि.पुणे), श्री. संतोष बाबासो पाटील (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधीनगर, केंद्र खंडेराजूरी, ता. मिरज, जि. सांगली), श्री. अमोल हंकारे ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोतवस्ती, थबडेवाडी, ता. कवठेमहांंकाळ, जि. सांगली), श्री. महेश शिंदे ( जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कंडारी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद), श्री. संतोष दातीर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहीगाव, ता. कर्जत, जि.रायगड), श्रीमती. लीना जगदीश सुमंत (डे.ए.सो. पूर्वप्राथमिक विभाग), श्रीमती. प्राजक्ता रवींद्र पारेकर (नू.म.वि. मराठी शाळा, प्राथमिक विभाग), श्रीमती. ज्योती मुकुंद पोकळे (शिशुविहार एरंडवणे), श्री. बबन गायकवाड (केशवराज माध्यमिक विद्यालय, लातूर), श्रीमती. कल्पना वाघ (मुख्याध्यापिका, नवीन मराठी शाळा) या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

'ज्योतीने तेजाची आरती' या सांस्कृतिक कार्यक्रमात ३३ शाळांमधील २०० विद्यार्थ्यांनी गदिमांनी लिहिलेली आणि बाबुजींनी संगीतबंध केलेल्या गाण्यांचे सादरीकर केले. यामध्ये 'आई व्हावी मुलगी माझी', 'आवडती भारी मज माझे आजोबा', 'बिनभिंतींची उघडी शाळा', 'एका तळ्यात होती', 'नाच रे मोरा', झुक झुक अगीन गाडी' अशा एक से बढकर एक गाण्यांचा समावेश होता.

यावेळी ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन’चे चेअरमन अॅॅड. किशोर लुल्ला, ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळा’चे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, ‘राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे अध्यक्ष मा. दिलीप करंबेळकर, ‘साप्ताहिक विवेक’च्या संपादक मा. अश्विनी मयेकर, ‘शिक्षणविवेक’च्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारत विकास परिषदेतर्फे राष्ट्रीय स्तरावर हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रगान स्पर्धेतील प्रथम क्रमांकप्राप्त संस्कृत गीतगायनाने, म.ए.सो. बालशिक्षण इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थिनींनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पोकळे आणि मानली गावंडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रस्थाविक आणि आभार प्रदर्शन डॉ. अर्चना कुडतरकर यांनी केले.

 कार्यक्रमाची काही क्षणचित्रे: