८ सप्टेंबर १९६५ पश्‍चिम आघाडी. खेमकर सेक्टरमधील अस्सल उत्तर या सीमेलगतच्या रणभूमीवर अकस्मात ४ ग्रेनेडिअर या पलटणीला आदेश मिळाला. समोरून पाकिस्तानचे ६० पॅटर्न रणगाडे अंधाराचा फायदा घेत पंजाबात उतरत होते. ४ ग्रेनेडियर जवळ फक्त २० रणगाडे. या पलटणीच्या नेतृत्वाची धुरा कंपनी हवालदार मेजर अब्दुल हमीद या वीराकडे होती. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, ‘साथीयो, आज भारतमाता आपली कुर्बानी मागते आहे. वतनासाठी शहीद होणे हाच खरा मजहब आहे. मुस्लिम असलो तरी हिंदोस्ता का बशिंदा आहे, अल्लामियाँ, मुझे ताकद दो’ या त्याच्या देशप्रेमी आवाहनाला साद देत सर्व रणवीरांनी आपले रणगाडे ‘फेकला रणागणी घोडा’ या न्यायाने आग ओकत पाकी सैन्याकडे वळवले. ४ ग्रेनेडिअरच्या वीरांचे अक्राळविक्रळ रूप पाहून ६० पैकी ४० पाकिस्तानी रणगाडे पळून गेले.

अब्दुल हमीद आघाडीवर नेतृत्व करत एक-एक रणगाडा उद्ध्वस्त करत पुढे सरकत होता. पाकिस्तानच्या हद्दीत हिंदुस्तानी वीर घुसले. त्या घनघोर परिस्थितीतही आपल्या बहादूर सैनिकांनी रणगाड्याविरोधी सुरूंग पेरले. दुर्दैवाने ९ सप्टेंबर १९६५च्या सकाळी या बटालियनवर पाकिस्तानी सेबरजेटनी हवाई हल्ला केला. पराक्रमाची शर्थ करत अब्दुलने त्याच्यावर चालून आलेल्या दोन्ही रणगाड्यांना धुळीस मिळवलं, पण तो धारातीर्थ पडला.

पाकिस्तानी ब्रिगेडियर अब्दुलला कुर्नीसात करत म्हणाला, ‘अब्दुल तुम सचमुच शेर हो!’ आणि त्या ब्रिगेडियर ए.आर. शम्मीलासुद्धा अब्दुल हमीदने टिपले, तो उद्गारला ‘आखीर, सच्चा मुसलमान हुँ! हिंदोस्ता का राहगीर हुँ! हमारी संस्कृती है हिंदु संस्कृती, खुदा ताला तेरी खिदमत करने आ रहा रहुँ !’ आणि अब्दुल हमीदने प्राण सोडले. जन्नतच्या मार्गावर तो देशप्रेमी सेनानी निधड्या छातीने गेला. १ जुलै १९३३ मध्ये उत्तर प्रदेशात गरीब कुटुंबात जन्मलेला अब्दुल हमीद परमवीर चक्र मिळवत ४ ग्रेनेडियर बटालियनच्या इतिहासाला चार चाँद लावत कुर्बान झाला.

-कॅ. विनायक अभ्यंकर

[email protected]

पुणेरी परमवीर