मुलांनो, या महिन्याची कथा आहे - मिलिंद, नागसेन आणि मिलिंद पन्हची.

इ.स. पूर्व २ र्‍या शतकातली ही गोष्ट आहे. त्या वेळी गांधार राज्यात ग्रीक राजे राज्य करत होते. या राजांना Indo Greek असे म्हटले जाते. त्यांची राजधानी होती साकल. म्हणजेच आजची पाकिस्तानमधील सियालकोट नगरी. नदी, ओढ्यांनी समृद्ध, उपवनांनी सजलेली, सुनियोजित, खोल खंदक व उंच तटबंदी असलेली ही नगरी व्यापाराने भरभराटीस आली होती. साकल नगरीतून ग्रीक राजा चशपरपवशी राज्य करत होता तेव्हाची ही गोष्ट आहे. गंमत माहितय? भारतातील लोक Menander ला ‘मिलिंद’ म्हणत असत. ग्रीक ‘अ‍ॅलेक्सझंडर’ला आपण सिकंदर म्हणतो ना? अगदी तसेच! तर आजच्या गोष्टीतला राजा आहे मिलिंद.

मिलिंद एक सामर्थ्यवान, अभ्यासू आणि विद्वान राजा होता. अनेक विद्यांमध्ये पारंगत असलेला मिलिंद वादविवाद करण्यात कुशल होता. त्याने अनेक बौद्ध भिक्षूंना धर्माविषयी प्रश्न केले. त्यांच्याशी वाद केला. परंतु मिलिंदला कुणाकडूनही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. तेव्हा त्याचा मंत्री त्याला म्हणाला, ‘केवळ थेर नागसेनच तुमच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल. तुम्ही नागसेनला भेटायला चला!’ कोण होता हा नागसेन?

नागसेन हा काश्मीरमध्ये राहणारा एक वैदिक ब्राह्मण होता. तीन वेदांमध्ये पारंगत असलेला पंडित होता. मात्र नागसेनाला बौद्ध धर्माविषयी आंतरिक ओढ वाटत होती. म्हणूनच बौद्ध धर्म जाणून घेण्यासाठी तो मगध प्रांतात गेला. मगधाची राजधानी पाटलीपुत्र येथे तो पोहोचला. पाटलीपुत्र म्हणजे बिहारमधील पटना शहर. येथील अशोकवनात धर्मरक्षित नावाचा एक ग्रीक भिक्षू राहत असे. नागसेन काही महिने गुरू धर्मरक्षित जवळ राहिला. तिथे बौद्ध धर्म व त्यामधील तीपिटक ग्रंथ शिकला. त्यामध्ये निपुण झाला; इतकेच नव्हे तर त्याने बुद्धाची शिकवण पूर्णपणे आत्मसात केली. त्यावर गुरूंची संमती घेऊन थेर नागसेन साकल येथील एक बौद्ध मठात आला.

एके दिवशी नागसेनाच्या मठापाशी अवचित एक रथ येऊन थांबला. रथात आरूढ होता राजा मिलिंद! राजा रथातून उतरला व नागसेनाला नम्रपणे सामोरा गेला. आपली ओळख सांगून तो म्हणाला -

मिलिंद  : मी तुमच्याशी धर्माविषयी वाद घालू इच्छितो.

नागसेन : राजा, तू विद्वान म्हणून वाद घालणार की राजा म्हणून वाद घालणार?

मिलिंद : विद्वान कसा वाद घालतो?

नागसेन : आपली चूक असेल तर क्रोधीत न होता, विद्वान ती मान्य करतो.

मिलिंद : राजा कसा वाद घालतो?

नागसेन : दुसर्‍याने चूक दाखवली असता क्रोधीत होऊन त्यांना शिक्षा देऊ शकतो. 

मिलिंद : मी विद्वान म्हणून वाद घालेन.

नागसेन : ठीक आहे तर. विचार तुला काय हवे ते!

मिलिंद : मी ज्याला ‘नागसेन’ म्हणतो तो कोण आहे?

नागसेन : राजा! तुला काय वाटते?

मिलिंद : नागसेन म्हणजे मला दिसणारे नाक, कान, डोळे, तोंड, हात, पाय, बोटे, नख, केस इत्यादी म्हणजे नागसेन आहे.

नागसेन : अगदीच चुकलास तू राजा! मला सांग, तू आता मठात कसा आलास?

मिलिंद : मी रथातून आलो.

नागसेन : मला सांग, रथ म्हणजे चाक, घोडे, चाबूक, सारथी की लगाम?

मिलिंद : छे! छे! या पैकी काहीच ‘रथ’ नाही.

नागसेन : तसेच, हे दिसणारे शरीर म्हणजे ‘नागसेन’ नाही! नागसेन शरीराच्या पलीकडे आहे!  

मिलिंद : मग, हा श्वास जो शरीराच्या आत बाहेर जातो येतो, तो म्हणजे नागसेन आहे, असे मला वाटते.

नागसेन : का बरे?

मिलिंद : कारण श्वास थांबला तर मनुष्य जिवंत राहणार नाही.

नागसेन : समजा, बासरी वाजवणार्‍याने बासरीत श्वास फुंकायचे थांबवले तर ती बासरी मेली असे म्हणणार काय?

मिलिंद : अर्थातच नाही!

नागसेन : बरोबर! तसेच श्वास म्हणजे सुद्धा ‘मी’ नाही. श्वास ही शरीराची एक शक्ती आहे. ‘नागसेन’ श्वासाच्या पलीकडे आहे!

अशा प्रकारे राजा मिलिंद व नागसेन यांच्यामध्ये अनेक दिवस संवाद चालला. मिलिंदच्या प्रश्नांना उत्तरे देऊन नागसेननाने त्याचे समाधान केले. पुढे मिलिंदने बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्मात सांगितल्याप्रमाणे, तो एक दयाळू राजा झाला. त्यामुळे प्रजेने त्याच्यावर अतिशय प्रेम केले. मिलिंदच्या मृत्युनंतर प्रजेने त्याच्या अस्थींवर एक स्तूप उभारला.

राजा मिलिंद व नागसेन या दोघांमधील संवाद ‘मिलिंद पन्ह’ म्हणजे ‘मिलिंदचे प्रश्न’ या ग्रंथात नंतर लिहिला गेला. पाली भाषेतील हा ग्रंथ पुढे संस्कृतमध्ये नागसेनभिक्षुसूत्र या नावाने लिहिले गेले. सोप्या व आकर्षक पद्धतीने बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची ओळख करून देणार्‍या ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली. भारतात आणि भारताबाहेरसुद्धा. हा ग्रंथ श्रीलंका, चीन आदि देशांमध्येदेखील अतिशय लोकप्रिय होता.  

-दिपाली पाटवदकर 

[email protected]

संदर्भ - 

१.The Decate of king Milinda – Bhikku Pesala

२. Education inncient India : Valachi and Nalanda Universities – Dr. Suvarna Nalapat

 

राजा कनिष्क, कवी अश्वघोष आणि बुद्धचरित