जसं आहे तसं

दिंनाक: 02 Jan 2019 14:52:43


कधीतरी शाळेतून किंवा टयूशनमधून निरोप येतो आणि घरात एकच हलकल्लोळ माजतो. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. कारण हा निरोप असतो घरातल्या लाडक्या बाळाच्या एखाद्या चुकीच्या वागण्यासंदर्भात येऊन भेटण्याबाबतचा. हे वागणं गृहपाठ न करणं, शिस्तीत न वागणं, उलट उत्तर देणं, सांगितलेलं न ऐकणं हे, मारामारी करणं किंवा याप्रकारचं कोणत्याही प्रकारचं वागणं. असा निरोप आला की घरी एकमेकांची उणीदुणी काढणं हे ठरलेलंच आणि शाळेत गेलं की मात्र वेगळाच पवित्रा.

एकतर शाळेची चूक, शिक्षकांच्या चुका, शिक्षकांचं वागणं याबाबतचं कोणतंतरी चोख कारण देत मुख्य मुद्द्याला बगल देण्याची वृत्ती तर सार्वत्रिक. पण या सर्व तू तू मैं मैंमध्ये काय होतं तर मुख्य मुद्दा बाजूलाच राहतो जो आपल्या फायद्याचा असतो, ज्यामुळे आपल्या लाडक्या बाळामध्ये चांगला बदल घडवण्याची संधी आपल्याला मिळणार असते, ज्यात आपल्या पाल्याचं हित असतं. म्हणून आजपासून जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पहिलं काय करायचं तर झालेला आरोप खोडून काढण्यासाठी खूप बौद्धिक श्रम करायचे नाहीत तर तेच बौद्धिक श्रम आपलं पाल्य असं का वागतं, यात आपलं काय चुकत असेल, आपण आपल्यामध्ये कोणता बदल केला पाहिजे, घरातल्या सर्वांनी मिळून आपल्या बाळासाठी काय केलं पाहिजे हे सगळं ठरवण्यासाठी आणि ठरवलेलं राबवण्यासाठी करावेत. शाळेत किंवा टयुशनमध्ये शिक्षकांना भेटायला गेलात आणि त्यांनी आपल्या पाल्याबाबत काही सांगितलं तर ते पार फेटाळून लावत शिक्षकांच्या चुका शोधत राहण्यापेक्षा आपल्या दोघांचीही भूमिका ही आपल्या बाळाच्या हिताचीच आहे हे लक्षात घेत त्यांनी सांगितलेलं सत्य स्वीकारत त्यावर कोणता तोडगा काढायचा यावर त्यांच्याशी चर्चा करून योग्य उपाय शोधणे आणि तो अंमलात आणणे हे पालक म्हणून आपलं काम असतं. समजा आपल्याला सर्दी झाली असेल आणि ती झाल्याचं आपण नाकारलं तर योग्य उपाययोजना शक्य होईल का? नाही ना? तसंच या अशा ज्या आपल्या बाळाच्या बारीकसारीक चुका असतात ते त्याचं बारीकसारीक दुखणंच आहे ते जसं आहे तसं मान्य करून त्यावर योग्य ती उपाययोजना करणं हे आक्रस्ताळेपणा करणं, आरडाओरडा करणं किंवा दुर्लक्ष करणं या सर्वांहून योग्य असतं आणि एक बरं का घरातही जबाबदारी कोणाची याचा ऊहापोह टाळून सर्वांनी मिळून जबाबदारी घ्यावी आणि बघावा एकदा करिश्मा!

-मेघना जोशी 

[email protected]l.com

 

उमलते पालकत्व : लेख 2

फूल की फूलझाड?