मित्रांनो, मागील लेखामध्ये आपण पाहिलं की, अमेरिकेने कशा प्रकारे अपोलो-१३ मधील सर्व अवकाशवीरांना सुखरूप पुन्हा पृथ्वीवर आणले. अमेरिकेने त्यानंतर पुढे ४ मिशन चंद्रावर पाठवली आणि तीसुद्धा यशस्वी करून दाखवली. प्रस्तुत लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत अपोलो-१७ या अमेरिकेने पाठवलेल्या आणि चंद्रावरील शेवटच्या ठरलेल्या या मिशनबद्दल.

अमेरिकेने अपोलो-१३च्या दुर्घटनेनंतर धडा घेऊन आपल्या ल्युनार मोड्यूल आणि अवकाशयान यात सुधारणा करायला सुरुवात केली. या सुधारणा केल्यामुळे अमेरिकेला त्यांच्या या पुढील सर्व चंद्र मोहिमा यशस्वी करता आल्या. अपोलो -१७ ही मोहीम महत्त्वाची ठरणार होती; कारण या मिशननंतर अमेरिकेने येत्या काळात चंद्रावर मानवासहित मिशन न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या मोहिमेची तयारी ही बाब लक्षात ठेवून करण्यात येणार होती. या सर्व गोष्टींमुळे अगदी पूर्ण विचार करून आणि आता शेवटची मोहीम असल्याने नक्की कोणकोणते प्रयोग करता येतील त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल याचा सर्वांगीण विचार अमेरिकेतली या मोहिमेशी निगडित असलेल्या मंडळींनी सुरू केला.

नासाने (अमेरिकन अंतराळ संस्था) आपल्या प्रत्येक मिशनमध्ये काहीतरी नवीन अथवा वेगळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसाच या वेळीसुद्धा केला तो म्हणजे की, यांचे उड्डाण हे रात्रीच्यावेळी असणार होते. या मिशनसाठी आधीच सांगितल्याप्रमाणे प्रचंड तयारीसुद्धा करण्यात आली होती. यातच एक ल्युनार बग्गी म्हणजेच (Lunar Roving Vehicle) चंद्रावर चालणारी गाडी याचासुद्धा समावेश होता. अंतराळवीरांना यानाच्या उतरण्याच्या ठिकाणापासून जास्त दूरवर जाऊन तेथील अभ्यास करता यावा यासाठी यापूर्वीच्या २ मिशनमध्ये अशीच एक बग्गी चंद्रावर पाठवण्यात आली होती. या मिशनमध्येसुद्धा इलेक्ट्रिक इंधनावर चालणारी एक बग्गी समाविष्ट होती. या मोहिमेत एकूण तीन अंतराळवीरांचा समावेश होता. त्यापैकी एक हा चंद्राभोवती फिरत राहून उर्वरित दोघे हे चंद्रावर उतरून तीन दिवस संशोधन करतील, काही शास्त्रीय उपकरणे प्रस्थापित करतील आणि तिथून नमुने गोळा करून पुन्हा त्या मोड्यूलमध्ये सुखरूप येतील.

ठरल्याप्रमाणे ७ डिसेंबर १९७२च्या रात्री सॅटर्न ५ या रॉकेटच्या साहाय्याने हे ल्युनार लॅन्डर आणि रोवर, ३ अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावले. साधारण १० डिसेंबरच्या सुमारास अंतराळवीरांनी चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आणि यानाची तिसरी पायरीसुद्धा वापरून चंद्राच्या योग्य कक्षेत ते पोहोचले. साधारण ११ डिसेंबरच्या दिवशी हे दोन अंतराळवीर चंद्रावर सुखरूप उतरले आणि त्यांनी पुढील ३ दिवसांसाठी त्या यानाची तयारी करायला सुरुवात केली. त्या अंतराळवीरांपैकी एकाने ल्युनार बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर जोडायला सुरू केली आणि साधारण ४ तासांच्या चंद्रावरील वास्तव्यानंतर ते काम पूर्ण केले. त्या दोघांनी मिळून प्रत्येकवेळी साधारण ७ तास पृष्ठभागावर प्रयोग करत सुमारे २१-२३ तास चंद्र पृष्ठभागावर घालवले.

१४ डिसेंबरच्या दिवशी हे दोघेही अंतराळवीर चंद्राला सर्व मानवजातींकडून निरोप देऊन शेवटी चंद्राभोवती प्रदक्षिणा करत असलेल्या आपल्या तिसर्‍या मोड्युलला येऊन मिळाले. अशा प्रकारे मानवाचा चंद्र पृष्ठभागापासून ते पृथ्वीवरील आजवरचा शेवटचा प्रवास सुरू झाला. अशा प्रकारे १७ डिसेंबरला हे सर्व अंतराळवीर सुखरूप त्यांनी घेतलेल्या मातीच्या आणि खडकांच्या नमुन्यांसह पृथ्वीवर उतरले. महत्त्वाचे म्हणजे हे मिशनसुद्धा अगदी सहज घडून आले असे नक्कीच नाही. या मोहिमेमध्येसुद्धा अनेक अडचणी आल्या जसे की अंतराळ यानातील घड्याळ बिघडल्याने यांचे उड्डाण २ तास उशिराने करावे लागले, चंद्रावर उतरवलेल्या बग्गीला चाकांना असलेली धातूची जाळी तुटल्याने पहिल्यावेळी ही बग्गी चालवत असताना या अंतराळवीरांना अक्षरशः धुळीची अंघोळ झाली आणि गंमत म्हणजे यावर उपाय म्हणून त्यांनी सरळ सरळ टेपचा वापर करून ही जाळी नीट केली. या आणि अशा अनेकविध अडचणींमधून मात करत आणि आधी घडलेल्या सर्व चुकांमधून शिकत अमेरिकेने आपली शेवटची चांद्र मोहीम यशस्वी करू दाखवली.

मित्रांनो, या मोहिमेतील ते तीन अंतराळवीर कोण याची नावं इथ मुद्दाम नमूद केलेली नाहीत तुम्ही ती नक्कीच शोधून काढाल याची मला खात्री आहे! चला तर मग पुढील महिन्यात भेटू अशाच एका साहसी मोहिमेच्या कथेत!

-अक्षय भिडे

[email protected]

कठीण प्रसंगीसुद्धा अमेरिकेने अपोलो १३ हे मिशन कसे यशस्वी केले त्याची गोष्ट 

 अपोलो १३ : टळलेला अपघात