मित्रांनो, रवींद्रनाथ कवी होते, लेखक होते, शिक्षक होते. ते चित्रकार, संगीतकार, शिल्पकार, कृषीतज्ञ ही होते. याशिवाय ते श्रेष्ठ बालमानसतज्ञ होते. म्हणजे लहान मुलांना काय हवे, काय शिकायला आवडते, कसे रहायला आवडते इ. ते बरोबर ओळखायचे, मुलांचे मन जाणायचे. मुलांना ज्यात रुची वाटेल, जे वाचावेसे वाटेल, काही करावेसे वाटेल अशा प्रकारे त्यांनी अभ्यासक्रम आखला, पुस्तके लिहिली, कथा-कविता लिहिल्या. मुलांच्या रोजच्या जगण्यातल्या, बघण्यातल्या गोष्टी, घटना, वस्तू यांना त्यांनी पुस्तकात आणले. कारण त्यांना माहीत होते, मुलेच नाही, तर मोठेसुद्धा नावडता विषय असेल, तर त्या ठिकाणी चटकन मनाने गैरहजर होतात.

रवींद्रनाथांनी सहजपाठ पाठ्यपुस्तक अशाच पद्धतीने लिहिले, की ते वाचताना, पाहताना मुलांना गोडी वाटेल, रस वाटेल, मुले त्यात रमून जातील. आज आपण सहजपाठातील एका कवितेचा आस्वाद घेऊ या. कवितेचे नाव आहे - बाजार. पूर्वी खेड्यापाड्यात आठवडी बाजार भरत असे. म्हणजे आठवड्यातून एकच दिवस बाजार. आजूबाजूच्या गावांतील, वाड्या-वस्तीतील माणसे खरेदी-विक्रीला येत. सगळ्या वस्तू तिथे मिळत. भाजी, वाणसामान, कपडे, इतर वस्तू यांची बाजारात रेलचेल असायची. हा बाजार सर्वांच्या परिचयाचा, पाहिलेला. अशा बाजाराचे वर्णन केलेली ही कविता -           

बाजार

कुंभारपाड्याची बैलगाडी

ओझे वाहाते कळशी-हंडी.

गाडी हाकतो बन्सीवदन

संगे त्याच्या भाचा मदन.

बाजार भरतो शुक्रवारी

 बक्षी गंजेत पद्मातीरी.

 

जिनसा जमवून आणती सारी

खरेदी-विक्री करती बाजारी.

गाजर, वांगी, पडवळ, मुळा

वेताच्या विणल्या टोपल्या, झुला.

मोहरी, छोले, मैदा, आटा

झारा, चमचा, वाट्या, चिमटा.

 

थंडीसाठी स्वेटर मस्त

शहरातून आली छत्री स्वस्त.

उसाचा गूळ कळशीभरून

माश्या बसल्या त्यावर उडून.

लाकडांची मोळी होडकीमधून

शेतकऱ्याची पोर विकते आणून.

 

अंध कानाई बसतो कोपऱ्यात

मागतो भिक्षा गाणे गात.

आईबाबामागे पोरेटोरे

चाखत फिरती चिंचा-बोरे.

सूर्य बुडता बाजार शांत

अंधुक उजेडात पदरव क्लांत.

 

-अनुवाद : स्वाती दाढे

[email protected]

 

पाश्चिमात्य आणि अभिजात भारतीय संगीत यांचे एकत्रीकरण करून सुप्रसिद्ध ‘रवींद्र संगीत‘ कसे तयार झाले? वाचा खालील लेखात.                          

रवींद्रनाथ : पहिली परदेश यात्रा