मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे. म्हणूनच भारतात लोक कोणता ना कोणता सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात, त्यातलाच हा ‘संक्रांत’ सण! ज्यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाला मकरसंक्रांत - ‘मकर संक्रमण’ असं म्हणतात. त्या वेळी उत्तरायण सुरू होते आणि दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. पौष महिन्याच्या कृष्णपक्षात सुरुवातीलाच हा सण येतो. हवीहवीशी वाटणारी ऊबदार गुलाबी थंडी आता जाण्याच्या मार्गावर असते. या वेळी नवीन आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. असा हा संक्रात सण आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रांतात उत्साहाने साजरा केला जातो, कसा ते पाहा -

बंगालमधील लोक या वेळी नवीन आलेले धान्य, तांदूळ यांच्या लोंब्या घेऊन लक्ष्मी-दुर्गाची पूजा करतात. ते लोक पक्वान्नही नवीन आलेल्या तांदळाचेच बनवतात. त्याला ‘पिथे’ म्हणतात. म्हणजे नवीन आलेल्या तांदळाच्या पिठाची पारी करून नारळ, गुळाचे पुरण घालून गोड करंजी बनवतात.

मध्य प्रदेश - उत्तर प्रदेश येथील तिळगुळाला ‘रेवडी’ म्हणतात. ती आपण येथेही पाहतो. पण ‘गझग’ हा तिळाचा विशेष प्रकार येथे असतो. साखरेच्या पाकातील चिक्की प्रकारासारखाच हलका पण कुरकुरीत असा हा पदार्थ असतो. तो फक्त येथेच मिळतो.

गुजरात-सौराष्ट्र-काठेवाड येथे स्त्रिया संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला ‘खिचडा’ करतात. त्यात हरभरे, मटार, गहू, तांदूळ, ज्वारी, ऊस, बाजरी, मूग, गाजर, फ्लॉवर, वांगी घालतात. तिळाचे दाणे, खोबरे, गूळ घालून लाडू करतात. ते घरी येणार्‍यांना दिले जातात. विशेष म्हणजे येथील स्त्रिया कुरमुरे, दाणे, डाळे यांचे गुळाचे लाडू बनवतात.

बंगलोर-(कर्नाटक) येथेही नवीन आलेल्या तांदळाची चणाडाळ, दूध, गूळ घालून ‘हुग्गी’ (खीर) करतात. या ‘हुग्गी’ बरोबर चिंचकोळ, दाणे, तीळ, मेथी, जिरे, गूळ, मीठ, मिरची, कढिपत्ता घालून ‘गोज्जू’ही करतात.

मद्रास येथील ‘पोंगल’ ही खीर फार प्रसिद्ध आहे. मूगडाळ आणि तांदूळ तुपावर भाजून शिजवायचे आणि त्यात दूध, गूळ घालून ही खीर बनवायची.

पंजाबमध्ये तर संक्रातीच्या आदल्या दिवशीच हा सण साजरा करतात. एक दिवस आधीच ‘सरसो का साग’, ‘मकारोटी’, ‘खिचडी’ करून ती दुसर्‍या दिवशी म्हणजे संक्रातीला खातात. तसेच थोडी लाकडे जाळून त्यावर मक्याची कणसे भाजून, मुळा, खीर, रेवडी, भुईमुगाच्या शेंगा एका ताटात घ्यायच्या. अग्नीची पूजा करून त्यात ताटातील थोड्या-थोड्या वस्तू टाकायच्या आणि पूजा संपवायची. प्रसाद म्हणून घरातील सर्वांना खाण्याच्या या वस्तू दिल्या जातात.

आंध्रप्रदेश-तेलंगणात भोगीला ‘खिचडी’ करतात. मिश्र भाजीही असते. आपण महाराष्ट्रात तिळगुळाचे लाडू करतो तर येथे त्याच सामानाच्या कुटाच्या तिळगूळपोळ्या केल्या जातात. हे येथील विशेष पक्वान्न असते.

महाराष्ट्रातही भोगीच्या दिवशी खिचडी, मिश्रभाजी, तीळ घालून भाकरी करतात. संक्रातीच्या दिवशी गूळपोळी करतात.

दाणे, खोबरे, तीळ - हे स्निग्धता, तर प्रेम, गूळ, हे गोडी ही प्रेम व माधुर्याची प्रतीके आहेत. थंडीच्या दिवसात या नवीन आलेल्या पदार्थांचा वापर मुद्दाम केला जातो, कारण आपल्या शरीरात त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि शरीराचे रक्षण होते. या दिवशी धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रम केले जातात. ते राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असतात. तिळगूळ देण्याघेण्याने परस्परांवर प्रेम करावे, द्वेष, मत्सर सोडून गोड मधूर भाषण करावे अशी आपली संस्कृती या उत्सवाच्यारूपाने आपल्याला प्रेरणा देते. एकमेकांच्या भेटीने सद्गुणांचे ‘संक्रमण’ करावे, हा या सणाचा हेतू आहे. विद्यार्थी मित्रांनो संक्रांत सणाच्या शुभेच्छा! ‘तिळगूळ घ्या गोड बोला!’

-मीनल पटवर्धन 

[email protected]