शहाणा कावळा

दिंनाक: 13 Jan 2019 15:26:58

गावातला समुद्रकिनारा म्हणजे मुलांचे मौजमस्ती करण्याचे ठिकाण. विशेषत: उन्हाळ्याच्या सुटीत तर इथे दिवस-रात्र मुलांची धाम-धूम धमाल सुरू असते. सकाळी पोहायला. व्यायाम करायला. धावायला. किनार्‍यावर सायकलीला फुगे बांधून फिरवायला. दुपारी ऊन-ऊन पाण्यात डुंबायला. पोहणं शिकायला. पाण्यात मस्तममस्ती करायला. संध्याकाळी वाळूत किल्ले करायला, खेळायला, मस्ती करायला नाहीतर पाण्यात लोळायला आणि सगळ्यात शेवटी, चटकदार भेळ, पाणीपुरी, नारळपाणी नाहीतर आईस्क्रीम चापायला.
या किनार्‍याला भेळपुरीवाले, चणे-शेंगदाणेवाले, नारळपाणीवाले, आईस्क्रीमवाले, कुल्फीवाले, फुगेवाले, खेळणीवाले, सरबतवाले अशांचा वेढाच पडलेला होता. 
त्यामुळे समुद्रात पाणमस्ती आणि इथे खाऊमौज करूनच मुले घरी जात. अशाच एका उन्हाळ्यातली ही गोष्ट. दुपारची वेळ होती. काही मुले ऊन-ऊन पाण्यात डुंबत होती; तर काही मुले सुक्या कुरकुरीत वाळूत खेळत होती. भेळवाले, आईस्क्रीमवाले, कुल्फीवाले संध्याकाळची तयारी करत होते. फुगेवाले, खेळणीवाले त्यांच्याच कामात रंगले होते. नारळपाणीवाला पण कामाला लागला होता.
नारळपाणीवाल्याने व्यवस्थित तासून ठेवलेली शहाळी समोर मांडून ठेवली. रिकामी शहाळी बाजूच्याच पिंपात भरून ठेवली. त्या पिंपाच्या बाजूलाच एका उंच स्टूलावर त्याने पाणी पिण्यासाठी छोटासा माठ भरून ठेवला होता. 
लोकांना तहान लागली तर लोकं त्याच्याकडे येऊन ताजं-ताजं नारळपाणी पीत, मऊ लुसलुशीत खोबरं खात समाधानाने ढेकर देत. पण नारळपाणीवाला तहान लागल्यावर मात्र माठातलंच पाणी प्यायचा. त्यादिवशी पण तो दुपारी त्या छोट्या माठातलं पाणी ढसाढसा प्यायला. डाव्या हाताने माठ तिरका करून त्याने उजव्या हातात पाणी घेऊन तोंडावर सपासप मारलं. तोंड खसाखसा पुसलं. आणि मग दुकानाच्या सावलीत एका फळीवर निवांत आडवा पसरला. बाजूच्याच नारळाच्या झाडावर बसून एक कावळा हे सर्व लक्षपूर्वक पाहात होता. त्याला तर खूपच तहान लागली होती. कावळा उडाला. त्याने हवेतच एक गिरकी घेतली आणि सावकाश त्या नारळपाणीवाल्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
कावळ्याने गळा फुगवून चोच किंचित उघडून घशातूनच कुर्र...कुर्रकू... असा आवाज काढला आणि मान तिरकी करून एका डोळ्याने नारळपाणीवाल्याकडे पाहू लागला. नारळपाणीवाला घूर्र..घूर घूर्र..घूर करत घोरत होता. त्याला ही ‘कावकीव’ ऐकूच आली नाही. नारळपाणीवाला झोपल्याची खात्री पटताच कावळा हलकेच उडाला आणि अलगद त्या छोट्या माठावर बसला. मग तो मान वाकडी करून माठात डोकावला. एकदम उजेडातून काळोखात डोकावल्याने कावळ्याच्या डोळ्यांसमोर अंधारीच आली. त्याला नीट काही दिसलंच नाही. त्या अंधार्‍या माठातल्या पाण्याचा त्याला अंदाजच आला नाही. 
मग त्याने माठावर बसून तोल सावरत उजव्या पंखावर चोच घासली. डोळ्यांची उघडझाप केली आणि एक डोळा बंद करून तो पुन्हा माठात डोकावला. आता त्याला दिसलं की.. माठात थोडंच पाणी शिल्लक होतं.
इतक्यात त्याला त्याच्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. कावळ्याने मनात विचार केला, आजोबांचं ठीक होतं. कारण आजोबांनी सांगितलेलं ते ठिकाण जंगलातलं होतं. आणि जंगल असल्याने, माती असल्याने त्यांच्या आजूबाजूला बारीक-सारीक खडे होते. 
पण आपण आहोत इथे समुद्र किनार्‍यावर... इथे कुठे आहेत माठात टाकायला खडे? इथे फक्त ‘खारट खारट पाणी आणि वाळू आणि वाळूच.’ आता आपल्यालाच काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. नवीन आयडिया शोधली पाहिजे आणि त्यासाठी जरा उडलं पाहिजे.
इथेतिथे नीट पाहिलं पाहिजे. ‘जो उडतो तो शोधतो. आणि जो शोधतो त्यालाच सापडतं’ असं आपल्यात उगाचच म्हणत नसतील, असा विचार करत कावळा सूर्रकन उडाला. संथपणे किनार्‍यावर गिरगिरू लागला.
कावळ्याने पाहिलं की, एका दुकानाबाहेर काही मुलं ग्लासातलं रंगीत सरबत तोंडात स्ट्रॉ घेऊन सपसप पीत होती.’
 कावळा समोरच्याच पिंपावर उभा राहून निरीक्षण करू लागला. मुले ओठात स्ट्रॉ धरून, तोंड बंद करून आणि तरीही स्ट्रॉ न चेपता सरबत तोंडात ओढून घेत होती. आणि मग ते सरबत पीत होती. कावळ्याने हा प्रयोग करूनच पाहायचं ठरवलं. कावळ्याने खाली पडलेली एक स्ट्रॉ उचलली. चोचीत धरली.
आता तो समोरच्या मुलांची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने चोच बंद केली आणि स्ट्रॉ पार चेपली गेली आणि त्याला कळलं....
‘ज्यांना ओठ आहेत तेच फक्त स्ट्रॉने पाणी पिऊ शकतात’ कावळ्याला आपल्या आजोबांची ‘कावकीव गाणी’ आठवली. त्यात ते किवकिवले होते, ‘‘अरे, कावळू आपल्या आणि माणसाच्या काही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत तर काही एकदम सारख्याच आहेत रे.’’ कावळा तिथून झुपकन उडाला. पुन्हा किनार्‍यावर गिरगिरू लागला. इतक्यात त्याला वाळूत खेळणारी मुले दिसली. काही मुले वाळूचा किल्ला करत होती. काही मुले ओल्या वाळूवर बोटाने चित्र काढत होती. काही मुले शंख शिंपले जमवत होती. दोन मुले मस्ती करत होती. एक मुलगा हातात दाणे घेऊन खात-खात दुसर्‍या हाताने दुसर्‍या मुलाला ढकलत होता. 
दुसर्‍या मुलाने त्याला असा जोरात धक्का मारला की त्याच्या हातातले सगळे दाणे वाळूवर पसरले. दोघेजणं वाळूतले दाणे पटापट गोळा करू लागले. दाण्यावरची वाळू फुंकून टपाटप खाऊ लागले.
हे पाहून कावळ्याला जबरदस्त आयडिया सुचली. कावळा आनंदाने कर्कश किवकिवला, किर्र कुर्र किर्र कूर्र कूर्र वाळूत खेळणारी मुले दचकून कावळ्याकडे पाहू लागली. कावळा आपल्याच नादात जोरात उंच उडाला. उडत उडत नारळपाणीवाल्याच्या जवळ गेला.
वरतूनच उंचावरून मान तिरकी करत त्याने एकंदर अंदाज घेतला. मग..
सगळं ठीकठाक आहे याची खात्री पटल्यावर.. तो सूर मारल्यासारखा वेगात खाली आला आणि..
त्याने त्या उंच स्टुलावरच्या छोट्या माठाला हलकेच धडक दिली. माठ स्टूलावरून बाजूच्या पिंपात पडला. पिंपात तर रिकामी शहाळी होती. या रिकाम्या शहाळ्यात माठातलं पाणी सांडलं. थोडासा खाटखूट आवाज झाला. 
पण या आवाजाने नारळपाणीवाला फक्त या कुशीवरून त्या कुशीवर वळला. कावळा ऐटित पिंपावर बसून शहाळ्यातलं पाणी प्यायला.
‘आजोबांची आठवली गाणी, 
नातू प्यायला नारळपाणी’ 
ही गावरान म्हण तुम्ही ऐकलीच असेल.
 
- राजीव तांबे 
 
कावळूदादा झोपेत खाली का पडत नाही याच उत्तर त्याने अन्वयला तर सांगितले. तुम्हालाही हे जाणून घ्यायची उत्सुकता असणारच यासाठी वाचा कावळेदादाची चौकीलॉक