कुकरची शिट्टी

दिंनाक: 12 Jan 2019 15:05:49

आईने दिलेलं दुदू पिऊन मी झोपलो होतो. एकदम फुस्स असा आवाज झाला आणि मी दचकलो.
आईने माझ्याकडे बघितलं आणि हसली. ‘‘काय मनू, आवाजाला घाबरलास ना!’’ मी नुसतंच म्यॅव केलं. मी म्हणजे एक मनीमाऊ आहे, माझे आई-बाबा आणि दादा मात्र माणसं आहेत. आई-बाबा मला मनू, बोकू किंवा माऊ म्हणतात. खूपच लहान आहे ना मी! दादा मात्र मला आळशा, झोप्या असं काहीपण म्हणतो. कारण मला खूप झोप येते. पण असा काही मोठा आवाज झाला की जाग येते. आत्ता पण मी आवाजाच्या दिशेनेच पाहत राहिलो होतो.
‘‘काय झालं मनू? अरे, कुकरची शिट्टी झाली.’’ आई म्हणाली.
कुकरची शिट्टी? म्हणजे काय? खूपच डेंजर दिसतंय. ‘‘अरे, कुकर म्हणजे ज्यामध्ये भात-डाळ शिजवतात ना, ते. कधीकधी बटाटे पण उकडतात. काही जण अंडी उकडायलाही वापरतात.’’
अंडी म्हंटल्यावर माझ्या तोंडाला जरा पाणी सुटलं.
आई पुढे सांगत होती, ‘‘या कुकरचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. काही मोठे काही छोटे; पण सगळ्यांत एकच पद्धत असते, ती म्हणजे वाफेच्या दाबावर अन्न शिजवणे. सुरुवातीला सगळे उघड्या भांड्यामध्ये अन्न शिजवायचे; नंतर डेनिस पॅपिन नावाच्या काकांनी एक गंमत केली. भांड्यात जे शिजवायचं आहे ते अन्न घेतलं, त्यात थोडंसं पाणी घातलं आणि भांड्याला घट्ट झाकण लावून शेगडीवर ठेवलं. त्यामुळे झालं काय की त्यातलं पाणी खूप म्हणजे खूपच गरम झालं. पाणी नेहमी १०० डिग्री सेल्सिअस तापमानाला उकळतं ना त्यापेक्षा पण जास्त, २०० डिग्री सेल्सिअस वगैरे. मग अन्न पटकन शिजलं. दुसरी पण एक गंमत झाली. उघड्या भांड्यात ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेबरोबर अन्नातील महत्त्वाचे घटक जे उडून जात होते ना ते पण अन्नातच राहिले.
त्यानंतर प्रेशर कुकरच्या रचनेत खूप बदल झाले. जास्तीची वाफ निघून जाण्यासाठी त्याला एक शिट्टी ठेवली. आल्फे्रड विशर नावाच्या काकांनी घरातले अन्न शिजवता येईल असा सुटसुटीत कुकर तयार केला.
आता आपण घरात जे कुकर वापरतो ना ते याच प्रकारचे असतात. त्यात एक मोठं भांडं असतं आणि एक झाकण. झाकणाला आतून रबरी नळी नसते, त्यामुळे झाकण एकदम घट्ट बसतं; आत तयार होणार्‍या वाफेला जराही बाहेर पडू देत नाही. झाकणाला अजून एक गोष्ट असते ती म्हणजे रबरी शिट्टी. कुकर थंड असताना कधीतरी ही शिट्टी काढून बघितलं, तर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी झाकणाला एक लहान छिद्र असतं. कुकरचं झाकण लावलं आणि तो गॅसवर ठेवला की आतलं पाणी हळूहळू गरम होतं. काही वेळाने ते उकळायला लागून त्याच्या वाफा तयार होतात आणि आतमध्ये वाफेचा दाब तयार होतो.
मी हे सगळं मन लावून ऐकत होतो, तेवढ्यात दादा शाळेतून आला आणि मागून मला टपली मारली. ‘‘म्यॅवऽऽ! आई गं!’’
‘‘अरे ए, पिल्लू आहे ना तो, कशाला त्रास देतोस त्याला!’’, आई दादाला ओरडली. मला म्हणाली ‘‘माऊ, जोरात लागली का रे टपली? अशीच जोरात वाफसुद्धा कुकरला आतून टपली मारते. वाफेचा दाब खूप जास्त झाला की, ही जास्तीची वाफ शिट्टीच्या खालच्या छिद्रातून, शिट्टीला वर ढकलून बाहेर पडते. बाहेर पडताना तिचा खूप मोठा आवाज होतो.’’
माझं दुदू उकळतात ना, ते पण एका मिल्क-कुकर किंवा बॉयलरमध्ये. पण त्याची शिट्टी अचानक होत नाही तर कुकरच्याछिद्रातून वाफ हळूहळू बाहेर पडते.
फुस्सस! शेवटची शिट्टी झाली आणि आईने गॅस बंद केला. मऊ-मऊ भात शिजून तयार झाला होता. पण या वेळेस शिट्टीच्या आवाजाला मी भ्यायलो नाही कारण, कुकरची शिट्टी कशी होते ते मला आता कळलं होतं आणि शेवटी मी माझ्या आई-बाबांचा शूर माऊ आहे ना!
 
-सायली कुलकर्णी