ए स्नेहलताई, मला नेहमी एक प्रश्न पडतो. हे काम चांगलं, हे वाईट असं असतं कां खरंच ?', निखिलनं विचारलं.

'का रे बाबा, असा प्रश्न का पडला तुला? काम कोणतंच चांगलं किंवा वाईट नसतं. आपण ते किती आवडीनं, मनापासून करतो हे महत्त्वाचं.', ताई म्हणाली.

'हो किनई ! मला पण असंच वाटतं. पण माझी आई मला अभ्यासावरून नेहमी ओरडते. म्हणते, अभ्यास कर रे बाबा नीट. नुसत्या उनाडक्या करून काय वडापावची गाडी टाकायची आहे काय? शाळेत शिपाई होऊन घंटा बडवायची आहे?'

'सेम हिअर....', केतकीनं दुजोरा दिला. 'आमच्याकडे पण नेहमी हेच.... काय तर म्हणे, अगं, चांगल्या कंपनीत जाॅब मिळवायचा तर फर्स्ट क्लास इंजिनिअर व्हायला हवं.'

'पण सगळ्यांनी डाॅक्टर किंवा इंजिनिअरच झालं पाहिजे कां ? आम्हाला काही आवड निवड आहे का नाही?'

'हो हो शमिका... अगं पण तुम्ही तुमच्या पालकांच्या दृष्टिकोनातूनही विचार करा. प्रत्येक पालकाला वाटत असतं, आपल्यापेक्षा आपल्या मुलांना सर्वच गोष्टी छान मिळाव्यात. त्यांना परिस्थितीमुळे जे करायला जमलं नाही, ते सर्व तुम्हाला करायला मिळावं. तुम्ही खूप सुखी समाधानी आयुष्य जगावं. आणि असं बघा, शिकण्याचंही एक वय असतं ना. त्या वयात तुम्हाला काही चिंता काळज्या नसतात. आई बाबांच्या छत्राखाली तुम्ही निर्धास्त असता. अशा वेळी तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या अधिकाधिक संपन्न व्हावं. स्वत:च्या व्यक्तिमत्वाला आकार द्यावा, असं त्यांना वाटतं.', स्नेहलताई.

'पण हा आकार ठराविक साच्यातूनच द्यायचा का? आम्हाला आमच्या आवडीच्या विषयात काही करायचं असेल तर ? ' सारंग.

'अरे हो... जरूर करा. पण केवळ पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, सेलिब्रिटी स्टेटस अशा कुठल्यातरी गोष्टींना भूलून तर तुम्ही त्या विषयाकडे ओढले जात नाही ना, हे पालकांना पाहावंच लागतं. त्याबाबत माहिती मिळवावी लागते. त्या वाटेवरच्या अडचणींचा विचार करावा लागतो. यासाठी त्यांची सर्व धडपड असते बरं!',  स्नेहलताई.

'अग पण ताई आम्ही पण काही टक्के टोणपे खाल्ले, काही चुका केल्या, त्यांतून काही शिकलो. तर कुठे बिघडलं ? आता कुणाला कोरिओग्राफर व्हावसं वाटलं, कुणाला फोटोग्राफर व्हावसं वाटलं तर ? ' शमिका.

'मला तर बाई टीचर व्हायचंय. आणि तेही कुठल्यातरी परदेशी भाषेचं. '

'अरे वा, छानच आहे की. ' स्नेहलताई बोलू लागली. ' असं बघा तुम्हाला जे काही व्हावसं वाटतं ना, त्या संबंधी खूप माहिती मिळवा. आई बाबांशी मोकळेपणानं बोला. त्यांना पटलं पाहिजे की, तुम्ही जे काहीतरी वेगळं करू इच्छिता, ते खरंच तुम्हाला आवडलंय म्हणून. वरवरच्या कोणत्यातरी गोष्टींवर भुलून नाही. तसंच त्यासाठी तुमची वाटेल ती मेहनती घ्यायची तयारी आहे. मग तुम्ही जे शिकाल, ज्यात तरबेज होऊ इच्छिता, त्यांत स्वत:ला झोकून द्याल, तेव्हढं चांगलं. कारण शेवटी प्रत्येकाला आपापल्या लायकीप्रमाणेच काम मिळतं. म्हणून जे काम करायची इच्छा आहे, त्यासाठीची पात्रता, कौशल्य मिळवणं हे सर्वात महत्वाचं.

याला एक दुसरी पण बाजू आहे. आयुष्यभर केवळ पैशासाठी काम न करता, आपल्या आवडीचं काम करून पैसे मिळवणं कधीही चांगलंच, नाही कां ? म्हणजे आपण जे काम करतो त्यांचं ओझं वाटत नाही किंवा नाईलाजानं करावं लागतं असंही नाही. हा धावतो म्हणून आपण सुद्धा पैसा -प्रसिद्धीच्या मागे धावायला हवं असं नाही. आपल्याला समाधान मिळवून देणारी वेगळी वाट आपण चोखाळली तर ते कधीही चांगलंच. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणं यासारखं भाग्य नाही. 

त्याचबरोबर एकदा कां आपण निर्णय घेतला की नंतरच्या सर्व यशापयशाची जबाबदारी आपलीच. म्हणूनच कोणताही निर्णय घेतांना पालकांशी विचार विनिमय करून घ्यावा. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, तो आत्मसात करण्याची कुवत आहे का हेही पहावं लागतं. ती कुवत स्वत:मध्ये निर्माण करावी लागते. 

तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्राच्या काही बेसिक डिमांड्स असतात. म्हणजे काही कामं करतांना स्वत:तच रमून गेलं तरी चालतं, तर काही ठिकाणी टीमवर्कला महत्व असतं. तिथे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावं लागतं. तर काही ठिकाणी तुम्हाला टीमचं नेतृत्व करणं अपेक्षित असतं. काही काही वेळेला तर आधीच्या कामाव्यतिरिक्त निराळ्याच नवीन गोष्टी शिकून आत्मसात कराव्यात लागतात. त्या त्या क्षेत्रात आलेल्या नवीन गोष्टी शिकून स्वत:ला वारंवार अपडेट करावं लागतं. '

'अगं ताई, माझ्या दादाचा एक मित्र तर सायन्समधील पदवीधर झाला आणि शेवटी बॅंकेत नोकरीला लागला. असं कसं?', अथर्वनं विचारलं. 

'हो असंही होतं कधी कधी.... शिक्षण एका क्षेत्रातलं अन् नोकरी दुसऱ्याच क्षेत्रातली. पण ती एक तडजोड असू शकते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असंही नाही ना!', स्नेहलताई म्हणाली. 'काही वेळा एक ठराविक अंतर चालून गेल्यावर वाटू लागतं की हे नाही आपल्यासाठी. अशा वेळी रस्ता बदलून नवीन रस्त्यालाही लागावं लागतं. काही हरकत नाही. सबंध आयुष्यभर फरपट होण्यापेक्षा हेही चांगलंच. म्हणूनच आपल्या परिस्थितीतून मार्ग काढताना, मोठ्यांचा अनुभवी सल्ला कामी येतो. आयुष्यात अशी संक्रमण करण्याची वेळ येते कधी कधी. ते फक्त आपल्याला पेलता यायला हवं. त्यासाठी मनाची तयारी हवी. कोण काय म्हणेल याला महत्त्व न देता, आपल्या निर्णयावर आपल्याला ठाम राहता आलं पाहिजे.'

'संक्रमणावरून आठवलं.... निसर्गात सुद्धा असं संक्रमण होत असतं ना?' शाल्मलीनं मोठेपणाचा आव आणत विचारलं. 

'म्हणजे काय ग शाल्मली?', छोट्या वेदानं प्रश्न केला. 

'अगं, म्हणजे आता पौष लागला ना..... मग मकरसंक्रांत आली. या दिवसापासून सूर्याचं संक्रमण सुरू होतं. तो मकर राशीत प्रवेश करतो. त्याचा प्रवास उलट दिशेला व्हायला लागतो. त्यालाच उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. त्यानंतर दिवस हळुहळू मोठा व्हायला लागतो. '

'मला तर संक्रांत खूप खूप आवडते. तिळगूळ, गुळाची पोळी, ताजे हरभरे, ऊसाची कांडं, बोरं सगळं सगळं खायला मिळतं.', नेहा.

'आणि नुसता तिळगूळ खायचा नाही, तर गोड बोला पण लक्षात ठेवायचं.', स्नेहलताईनं आठवण दिली. 'सर्वांशी मिळून मिसळून वागायचं, सर्वांना समजून घ्यायचं. हा खरा अर्थ लक्षात ठेवायचा, गोड गोड बोला म्हणण्याचा.'

'मकरसंक्रांतीला पतंग उडवायला काय मज्जा येते. मला तर काटाकाटी करायला खूप आवडतं. मी नेहमी सात आठ पतंग तरी काटतोच.', अथर्व. 

'मग.... त्या त्या वेळी त्या त्या खेळांची मजा घ्यायचीच. पण थोडी सावधगिरी बाळगून. दुसऱ्याला इजा न पोहोचवता, आपण आनंद घ्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे झालं. या सणांच्या निमित्तानं रोजच्या रुटीनमधून थोडासा विरंगुळा, थोडीशी करमणूक .... म्हणून तर भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावानं संक्रांत सण साजरा केला जातो. या सणाला तिळगूळाचं महत्त्वही सगळीकडे आहे. मुख्य म्हणजे थंडीच्या दिवसात शरीरातला आवश्यक अशी उष्णता मिळण्यासाठी तिळगूळ आणि काळे कपडे. 

आसाममध्ये बिहू, पंजाब हरियाणामध्ये लोहडी, तामिळनाडूमध्ये पोंगल अशी वेगवेगळी नावं आहेत. बाकी सगळीकडे मकरसंक्रांत हेच नाव आहे. 

मग लागा आता संक्रांतीच्या तयारीला ..', स्नेहलताईच्या म्हणण्याला सगळ्यांनी होकार दिला.