वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे महासंचालक म्हणून नवी दिल्ली येथे १९९५ ते २००६ या काळामध्ये ठसा उमटवणारे अग्रगण्य संशोधक म्हणून रघुनाथ अनंत माशेलकर यांचा परिचय आहे. तत्पूर्वी ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे १९८९ ते १९९५ या कालखंडातील संचालक होते. निवृत्तीनंतर ‘ग्लोबल रिसर्च अलायन्स’ या जागतिक संस्थेचे २००६ सालापासून ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

माशेलकरांचा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये गोव्यामधील माशेल गावी झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मात्र मुंबईला झाले. ते लहान असताना त्यांचे वडील निवर्तले. त्यांच्या मातोश्री अंजनी यांनी त्यांना शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन दिले आणि त्यांचे कष्टपूर्वक संगोपन केले. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळेत अनवाणी जाऊन शिकणार्‍या माशेलकरांचे नाव शालान्त परीक्षेत उच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या सूचीमध्ये झळकले. विपरीत आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून नोकरी करावी, असे माशेलकरांना वाटले. आईने धीर दिल्यामुळे आणि प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण उत्तम पार पडले. १९६६ साली मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत, प्रथम येऊन मिळवली. पीएच.डी. पदवी मिळवण्यासाठी त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये (आय.सी.टी.) येथे संशोधन सुरू केले. प्रा. एम.एम. शर्मा यांनी त्यांना मार्गदर्शन केले. १९६९ साली त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ सालफोर्ड येथे सात वर्षे अध्यापन आणि संशोधन  केले.

परदेशात जे भारतीय संशोधक काम करीत होते, त्यांना तत्कालीन ‘सी.एस.आय.आर.’चे महासंचालक प्रा. नायुडम्मा यांनी भारतात आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यांनीच १९७६ साली डॉ. माशेलकरांना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एन.सी.एल.) आमंत्रित केले. देशात राहून देशासाठी काही उत्तम काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. एन.सी.एल.मध्ये रुजू होऊन ‘रासायनिक अभियांत्रिकी’ विभागात साहाय्यक संचालक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. या विभागाचे ते प्रमुख झाले आणि बहुलक अभियांत्रिकी हा संपूर्ण नवीन विभाग त्यांनी स्थापन केला. मोठ्या उत्साहाने आणि तडफेने औद्योगिक क्षेत्राशी संबंधित असलेले प्रकल्प त्यांनी हाती घेतले.

त्यांनी बहुलक अभियांत्रिकी या त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये दर्जेदार संशोधन करून उच्च दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये ते शोधनिबंधाच्या स्वरूपात प्रसिद्ध केले. पॉलिमरवर्गीय रसायनांची जडणघडण होताना अनेक प्रक्रिया घडतात. त्या वेळी घडणारे उष्मागतिकी बदल, पाणी शोषून घेणार्‍या पॉलिमरचे संशोधन आणि उत्पादन, जलाकर्षक पॉलिमरचे जेव्हा जलरोधक पॉलिमरमध्ये रूपांतर होते, तेव्हा होणारे रेण्वीय पातळीवरील बदल, पॉलिमरचे आकुंचन किंवा प्रसरण होताना घडणार्‍या प्रक्रिया, काही पॉलिमरवर्गीय रसायने जीवरसायनशास्त्रातील विकरांप्रमाणे (एन्झाइम) गुणधर्म दाखवतात, त्यांचे संशोधन माशेलकरांनी प्रदीर्घ काळ केले.

काही पॉलिमरच्या द्रावणांचा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रवाहीपणा बदलतो. अशा द्रावणावर दाब आल्यास त्यांचा प्रवाहीपणा किंवा वाहकता वाढते. दाब पूर्ववत झाल्यावर त्याच द्रावणाची वाहकतादेखील पूर्ववत होते. त्यांना ‘नॉन न्यूटोनियन सोल्यूशन’ म्हणतात. या प्रकारच्या संशोधनाला ‘र्‍हिऑलॉजी’ असे नाव आहे. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनामध्ये त्या विषयाचे बरेच महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन माशेलकरांनी पॉलिमर रसायनांचे द्रावण करून त्यांच्या प्रवाहीपणाचा सखोल अभ्यास केला आहे. ‘पॉलिएथिलिन टेरेथॅलेट’ हे रसायन मोठ्या प्रमाणात वापरात आहे. त्याचे व्यापारी उत्पादन करण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेची अभियांत्रिकी प्रतिकृती (मॉडेलिंग) करण्याचे अवघड संशोधन त्यांनी केलेले आहे.

१९८९ साली ते एन.सी.एल.चे संचालक झाले. त्या वेळी ‘जागतिकीकरण’ आणि ‘खुलेपणा’चे वारे जगभर वाहत होते. काळाचे आव्हान ध्यानात घेऊन सैद्धान्तिक किंवा मूलभूत रसायनशास्त्राची सांगड घालणारे उपयोजित संशोधन करण्याची सूचना त्यांनी तरुण संशोधक आणि त्यांच्या मार्गदर्शकांना केली. त्यांना त्यांच्या ‘बौद्धिक संपदे’चे संरक्षण करण्यासाठी उद्युक्त केले. परिणामी दर्जेदार वैज्ञानिक शोधनिबंध आणि त्यावर आधारलेल्या एकस्वांची संख्या वाढत गेली. यश दुहेरी होत गेले. त्यांच्या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्वरूप येऊ लागले. संशोधकांना युरोप- अमेरिका येथून प्रकल्प मिळू लागले. सल्लामसलतीसाठी चीननेदेखील संपर्क साधला. संशोधनासाठी आवश्यक असणारा निधी योग्य त्या संस्थेकडून किंवा उद्योजकांकडून मिळवण्यासाठी संशोधक प्रयत्न करू लागले. त्यात त्यांना यश मिळू लागले. त्यांचा आत्मविश्वास वाढला. माशेलकरांनी संशोधक आणि त्यांना साथ देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी शनिवार-रविवार राखून ठेवला. त्यामुळे दैनंदिन कामातील छोट्यामोठ्या समस्यांवर उपाय सुचू लागले.

माशेलकरांच्या प्रयत्नांमुळे बर्‍याच परदेशी कंपन्यांना आपली संशोधन आणि विकास साधणारी प्रयोगशाळा भारतात काढावी, असे वाटू लागले. भारतात सुमारे शंभर प्रयोगशाळा सुरू झाल्या. औद्योगिक जगतामध्ये ज्याप्रमाणे संशोधन आणि विकास प्रकल्पांची आखणी आणि कार्यवाही होते, त्याप्रमाणे धोरण आखण्यामुळे कालानुरूप फायदेशीर बदल होऊ लागले. १९९५ साली वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे महासंचालक झाल्यावर देशातील ठिकठिकाणी स्थापन झालेल्या ३८ प्रयोगशाळा आणि त्यांमधील २०,००० कर्मचार्‍यांचे नेतृत्व त्यांना करावे लागले. तत्कालीन जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ‘सीएसआयआर-२००१: व्हिजन अँड स्टॅ्रटेजी’ ही श्वेतपत्रिका तयार केली. बौद्धिक मालमत्तेचे आणि पारंपरिक भारतीयांचे ज्ञान कसे अबाधित राहील, यासंबंधी विचार करून त्यांनी कृती योजना ठरविली. मूलभूत विज्ञान आणि एकस्व घेता येण्यासारखे उपयोजित विज्ञान यांचा समन्वय साधणारे प्रकल्प व पीएच.डी.साठी त्या विषयावरील संशोधन अनेक प्रयोगशाळांमध्ये सुरू झाले. २००२ साली भारतातून जेवढी यू.एस. एकस्वे मंजूर करण्यात आलेली होती, त्यांतील ४० टक्के एकस्वे सी.एस.आय.आर.च्या प्रयोगशाळेमधील होती. विज्ञान- तंत्रज्ञानातील अशी एक ‘राष्ट्रीय चळवळ’ सुरू करण्याचे अनन्यसाधारण श्रेय माशेलकरांकडे जाते.

हळदीच्या भुकटीतील जंतुनाशक गुणांमुळे जखम लवकर भरून निघते, हे आपल्या भारतीयांचे पारंपरिक ज्ञान देशात सर्रास वापरले जाते. हळदीच्या या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मावर आधारलेले एक एकस्व अमेरिकेत मंजूर झालेले होते. (यू.एस. एकस्व ५,४०१,५०४१,१९९६) आपल्या आजीबाईंच्या बटव्यातील वनौषधीची ‘चोरी’ लक्षात घेऊन त्यांनी ‘सी.एस.आय.आर.’च्या वतीने हळदीचे एकस्व नावीन्यतेच्या अभावी रद्द व्हावे म्हणून कायदेशीर लढाई केली. हळदीचे गुण मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी नियतकालिकांमध्ये किंवा काही ग्रंथांमध्ये नमूद असल्याचे त्यांनी यू.एस. एकस्व मान्य करणार्‍या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणले. हळदीचे ते एकस्व रद्द झाले. नंतर जगप्रसिद्ध भारतीय तांदूळ ‘बासमती’च्यासंबंधीचे एक यू.एस. एकस्व (क्र. ५,६६३,४८४) एका परदेशी कंपनीने मंजूर करून घेतले. ‘बासमती’च्या नावाचे आणि तसेच भौगोलिक स्थानाचे महत्त्व व्यापारी दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्या कंपनीचे काही अवास्तव दावे (हक्क) रद्द करण्यातही ‘सी.एस.आय.आर.’ला यश मिळाले.

विकसनशील देशातील पारंपरिक ज्ञान किंवा बौद्धिक मालमत्ता अबाधित राखण्यासाठी पारंपरिक ज्ञानाची पद्धतशीर नोंद असलेल्या ‘साठा चकत्या’ (सीडीज्) तयार करण्याचा प्रकल्प ‘सी.एस.आय.आर.’ने आखला. ‘टी.के.डी.एल.’ (ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी) हा चकत्यांचा प्रकल्प यशस्वी पार पडल्यामुळे त्यासंबंधीच्या एकस्वाची लढाई खेळण्यात वेळ आणि पैसा वाया जाणार नाहीत. माशेलकर १९९५ साली जेव्हा ‘सी.एस.आय.आर.’चे महासंचालक झाले होते, तेव्हा त्या संस्थेच्या यू.एस. एकस्वांची संख्या फक्त ३० होती. २००६ साली ते निवृत्त झाले, तेव्हा ती संख्या ७५० पेक्षा जास्त झाली होती. हे यश त्यांच्या उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देण्यामुळे मिळाले.

जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत १९९१ सालानंतर भारताचे विज्ञान-तंत्रज्ञान धोरण बदलणे स्वाभाविक होते. भारताचे कृषिसंशोधन, स्वयंचलित वाहनांचे इंधनविषयक धोरण, उच्चशिक्षण धोरण, भारतीय औषध नियंत्रण कायदा (विशेषत: बनावट आणि भेसळयुक्त औषधांसंबंधीचे धोरण), विभागीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतर- अशा अनेक मुद्यांशी संबंधित असलेल्या मंडळात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. पंतप्रधानांना तसेच मंत्रिमंडळाला विज्ञान-तंत्रज्ञानविषयक सल्ला देणार्‍या समितीत (सायंटिफिक अ‍ॅडव्हायजरी कौन्सिल) त्यांनी दीर्घकाळ कार्य केले होते.

त्यांच्या कार्याचा गौरव अनेक संस्थांनी केलेला आहे. त्यांना पद्मश्री (१९९१), पद्मभूषण (२०००), महाराष्ट्र गौरव (२००६), पुण्यभूषण (२००८) पुरस्काराचा मान मिळालेला आहे. त्यांना मिळालेली मानचिन्हे पन्नासपेक्षा जास्त आहेत. त्यांना मिळालेले काही मानसन्मान आणि पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत : शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९८२), पंडित जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान पुरस्कार (१९९१), जी.डी. बिर्ला शास्त्रीय संशोधन पुरस्कार (१९९३), मटेरियल सायंटिफिक ऑफ इयर अवॉर्ड (२०००), आयएमसी युरान क्वालिटी मेडल (२००२), लाल बहादूर शास्त्री नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट सायन्सेस (२००२), वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन्स मेडल ऑफ इंजिनिअरिंग एक्सलन्स, पॅरिस (२००३) इंडियन सायन्स काँग्रेसचा जीवनगौरव पुरस्कार (२००४),  इंडियन सायन्स काँग्रेसचा आशुतोष मुखर्जी स्मृती पुरस्कार (२००४).

२६ विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे एफ.आर.एस. आहेत. तसेच रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (यु.के.), ऑस्ट्रेलियन अकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजिकल सायन्सेस अँड इंजिनिअरिंग, युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्स (यू.एस.ए.), इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (यु.के.), थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे सन्मानही त्यांना लाभले आहेत. ते अनेक कंपन्यांच्या आणि संस्थांच्या संचालक मंडळावर आहेत. ‘ग्लोबल रिसर्च अलायन्स’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.

— डॉ.  अनिल लचके 

सौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश 

विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड