विश्वकवी रवींद्रनाथ खूप शिकले असतील, असे वाटत असेल तर ते खरे नाही, बरं का!

टागोरांच्या विशाल कुटुंबात मुलांच्या शिक्षणाची खूप काळजी घेतली जाई. मुलांना शिकवायला घरी वेगवेगळे शिक्षक येत. फक्त लिहिणं-वाचणंचं नाही तर शरीरशास्त्र, संगीत, चित्रकला शिकवण्याचीही व्यवस्था केली होती. घराच्या उत्तरेला रिकाम्या असलेल्या गोलाबाडीत कुस्तीचा आखाडा केला होता. तिथे एक पंजाबी पैलवान कुस्तीचे धडे द्यायला येई. गाणं शिकवण्यासाठी प्रसिद्ध गायक विष्णू चक्रवर्ती येत. रविन्द्रनाथांचा संगीताकडे ओढा होता, त्यामुळे गाणं शिकताना त्यांना मजा वाटे. छोटा रवींद्र, मोठा भाऊ सोमेंद्र आणि ज्येष्ठ बहिणीचा मुलगा सत्य हे तिघे समवयस्क एकत्र शिकत, खेळत, जेवत असत.

छोट्या रविन्द्रनाथांना वर्णपरिचयाचे धडे फार निरस वाटत. अक्षरांचा चेहरा लक्षात ठेवायचा, जोडाक्षरांचा गुंतागुंतीचा चेहरा लक्षात ठेवायचा, पुन्हा अक्षरं जुळवून शब्द, शब्द जुळवून वाक्य वाचायची, लिहायची... हे त्यांना फार अवघड वाटे. परंतु एक दिवस ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या एका धड्यात त्यांनी वाचले- “जल पडे, पाता नडे”. म्हणजे पाणी पडते, पान हलते. हे छंदोबद्ध वर्णन वाचून त्यांना मजा वाटली. आणि मग अक्षरं, शब्द, वाक्य शिकल्यावर कविता वाचता येते, गाता येते, हे लक्षात आल्यावर बांगला भाषा शिकण्याचा त्यांना उत्साह वाटू लागला.

रवींद्रनाथ लिहितात – “मी सतत गुणगुणत असे – जल पडे, पाता नडे.... आणि मग कर, खल, गण इ. शब्द पाठांतराचे वादळ थांबवण्यासाठी मला कवितेचा किनारा मिळाला. जीवनातली ही पहिली कविता म्हणताना झालेला आनंद आजही आठवतो आणि कवितेतलं प्रेम, आत्मीयता मला अजूनच मोहून टाकते.”

छोट्या रविन्द्रनाथाना मग शाळेत भरती करण्यात आलं. पण त्यांना तिथे आवडेना. वर्गातल्या विद्यार्थ्यांचं आणि त्याचं जुळेना. ते वर्गात एकटेच बसत. ज्योतीप्रकाश या त्यांच्या भाच्याने त्यांना कवितेचा छंद, अक्षर-मांडणी, यमक इ. शिकवले. म्हणतात ना – उत्तम मातीत पडलेले बीज रुजायला वेळ लागत नाही, तसंच झालं. रवींद्रनाथ कविता लिहू लागले. कवितेमुळे त्यांची उदासी पळाली. ते लिहितात, “लहानपणीच माझं कवितेबरोबर प्रेम जुळलं. ती माझी प्रथम प्रेयसी, मैत्रीण. सुख दिलं तसा त्रासही खूप दिला तिनं. माझ्या एकाकी आयुष्यात तिचीच सोबत असायची.”

रवींद्रनाथांना शाळा कधीच आवडली नाही. मुंज झाल्यावर त्यांना वडील महर्षी देवेन्द्रनाथांनी स्वतःबरोबर हिमालय भ्रमणाला नेले. वाटेतील गावे, निसर्ग, भव्य हिमालय यांच्या दर्शनाने ते भारावून गेले. परतल्यावर त्यांना बंदिस्त शाळेत जावेसे वाटेना. अनेक कारणे सांगत ते शाळेतून पळून येत. त्यांची शाळा बदलली, पण त्यांचे बुद्धी परिवर्तन होण्याचे, म्हणजे शाळेची गोडी लागण्याची चिन्ह दिसेना. त्यांनी स्वतःच शाळेत जाणे सोडून दिले. त्यांच्या मोठ्या भावाबहिणींनी खूप प्रयत्न केले. पण उपयोग शून्य.

हेच शाळेतून पळून येणारे बालक पुढे जेव्हा जगात विश्वकवी म्हणून सुप्रसिद्ध झाले, तेव्हा त्यांच्या त्या भावाबहिणींचे हृदय आनंदाने आणि अभिमानाने किती भरून आले असेल, नाही?

त्यानंतर १७ व्या वर्षी रवींद्रनाथ मोठे भाऊ सत्येंद्रनाथ यांच्याबरोबर इंग्लंडला ICS परीक्षा देण्यासाठी गेले. दीड वर्षाच्या तिथल्या वास्तव्यात त्यांनी आजुबाजूच्या अनेक गोष्टींचे अवलोकन केले, बरे-वाईट अनुभव घेतले. इंगजी साहित्य वाचले, चर्चा केल्या. पाश्चात्य संगीताशी त्यांचा घनिष्ठ परिचय झाला. भविष्यात ते एक श्रेष्ठ संगीतकार झाले, त्यात पाश्चात्य संगीत ऐकण्याचाही भाग होता. वडिलांनी बोलावल्यावर ICS परीक्षा न देताच रवींद्रनाथ भारतात परतले आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रचंड जमीन जुमल्याचा कारभार बघू लागले.

कुठलीही पदवी नसतानाही संवेदनशील मन आणि उपजत उच्च बुद्धिमत्ता असलेले रवींद्रनाथ श्रेष्ठ शिक्षक झाले, विश्वकवी झाले, सर्वांना आदरणीय झाले !

-स्वाती दाढे

[email protected]

 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या बालपणाविषयी सांगतायेत स्वाती दाढे 
बालपण - विश्वकवीचे