म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड येथील शाळेत दि. ७ सप्टेंबर रोजी शिक्षणविवेक आयोजित विविध उपक्रम उत्साहात संपन्न झाले. शाळेच्या इंग्रजी माध्यम विभागात मुलांसाठी पपेट शो घेण्यात आला. पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील मुलांनी पहिल्यांदाच असा कार्यक्रम पाहिला होता. पपेट्समधील  आजीबाई मुलांना विशेष आवडली. पपेटच्या गाण्यावर ताल धरत सर्वच मुलांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात मुख्याध्यापिका शलाका गोळे आणि ज्योती क्षीरसागर या उपस्थित होत्या. शिल्पकार चरित्रकोशाच्या सहसंपादक चित्रा नातू, शिक्षणविवेकच्या आदिती दाते आणि रुपाली निरगुडे यांनी पपेट शोचे सादरीकरण केले.

इ. ५वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षणविवेक सहसंपादक रेश्मा बाठे आणि चित्रा नातू यांनी मुलांना हस्तलिखिताची संकल्पना सांगून ते तयार करण्यासाठी अनेक क्लुप्त्या सांगितल्या. कार्यशाळेच्या समारोपात शाळेचे पर्यवेक्षक दत्तात्रय शेरखाने यांनी शिक्षणविवेकचे आभार मानून यापुढेही उपक्रम घेण्याचे निमंत्रण दिले.

शिक्षणविवेकसाठी नियमित लेखन करणारे पक्षीतज्ज्ञ अमित पावशे यांनी दुपारच्या सत्रात १० वीच्या मुलांसमोर 'करिअर मार्गदर्शन' हा विषय मांडला. आपल्या ध्येयाकडे अचूकतेने मार्गक्रमण करताना येणारी आव्हाने व अडथळे यांची मुलांनी मोकळेपणाने चर्चा केली. शाळेचे मुख्याध्यापक शांताराम कुलकर्णी यांनी संपूर्ण सत्रांचे उत्तम नियोजन केले होते.


शेवटच्या सत्रात मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागातील मुलांसाठी पपेट शोचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका स्वाती चिंबळकर उपस्थित होत्या. दिवसभरातील वेगवेगळ्या उपक्रमांतून नवनवीन विषय विद्यार्थ्यांना कळल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक खूश होते.

-रुपाली निरगुडे

[email protected]