‘मानसी’ला झाडांना पाणी घालायला खूप आवडायचं. ती रोज एका छोट्याश्या झारीनी गॅलरीतल्या झाडांना पाणी घालयाची, तिने एकदा त्यांच्या बिल्डींगच्या बागेत एक छोटासा बेडूक बघितला, तिला आश्चर्य वाटलं की लोक त्याला घाण बेडूक असं का म्हणतात? तिला तर तो खूपच छोटासा आणि गमतीदार वाटला होता. तिला तो खूपच आवडला. तिच्या मनात आलं आपण तो पाळूयात का? तिने आईकडे खूप हट्ट केला, पण आई काही ऐकायला तयारच नव्हती. मानसी मात्र विचार करत होती, किती मज्जा येईल मी त्याच्याशी अशी खेळीन तसं करीन आणि मध्ये बराच वेळ गेला.

आणि अचानक तिचं लक्ष गॅलरीतल्या एका कुंडीपाशी गेलं, ती होती कुंडी मोगऱ्याच्या झाडाची. त्या झाडाच्या बुंध्यापाशी मातीत दोन छोटे बेडूक चक्क गप्पा मारत बसले होते. अगदी मोठ्या माणसांसारखे बोलत होते. थोड्याच वेळात त्यांनी मानसीला हाक मारली “हॅलो मानसी” मानसीला खूप गंमत वाटली तीसुद्धा त्यांच्याशी बोलायला धावली.

“अरेच्चा. मी आताच विचार करत होते की, तुम्ही आला तर किती मज्जा येईल? तर खरंच तुम्ही आलात. थांबा हं मी तुम्हाला खाऊ घेऊन येते. माझी आई म्हणते आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपण खाऊ द्यायचा असतो.”

ते छोटे दोन खुदुखुदू हसले. मानसी एक बुंदीचा लाडू घेऊन आली आणि दोघे मस्तपैकी खाऊ लागले. 

“तुमचे नाव काय आणि तुम्ही अचानक असे आलात?” मानसीने विचारले. माझ नाव ‘टिंकू’ आणि हा ‘पिंटू’. आमचं घर तुमच्या बिल्डींगच्या बागेतल्या पाण्याच्या डबक्यात आहे. खरं म्हणजे आम्ही खूप भावंडं आहोत. पण आम्ही दोघ जरा लांब खेळत होतो, तेव्हा तुला पाहिलं आमच्याकडे बघताना. आम्हालाही जरा मजा वाटली आणि मग तुझ्या मागेमागे आलो उड्या मारत. तुला कळलचं नाही. तुझीच इच्छा होती ना या कुंडीत आम्ही राहावं म्हणून. इथेच आलो बसायला. चला आता आपण खूप मज्जा करू. खूप खेळू, उड्या मारू.

“हो पण आधी सांग ना तुमचं घर कसं आहे? आई कुठे आहे?”

“आमचं घर म्हणजे पाण्याच्या डबक्यात काठाशी असलेलं गवत. तुला माहितेय आमची आई एका वेळी आमच्यासारख्या शंभर बाळांची अंडी घालते. असाच डबक्याच्या काठी आणि मग आम्ही अंडी असताना गवताला चिकटून बसतो. नंतर काही दिवसांनी आम्ही त्यातून बाहेर येतो तेव्हा आम्ही.....”

“माशासारखे दिसतो म्हणून लोक आम्हाला बेदुकमासे म्हणतात.” पिंटूचं बोलणं मध्येच तोडून टिंकू म्हणाला.

“पण नंतर काय होत सांगू काही दिवसांनी पाण्यातलं भरपूर शेवाळ खाऊन आम्ही मोठे होतो आणि आमच्या शेपट्या निघून जातात.” मग आम्ही पटापट उड्या मारून पाण्याच्या काठावर येतो आणि खूप खेळत बसतो.”

“आहे की नाही मज्जा? आधी मासे होतो आणि नंतर बेडूक.” “हो, पण माझी आई म्हणते तुम्ही चिखलात आणि गटारात नाचत असता म्हणून, शी घाण ssss”

“असू देत, आम्हाला तेच खूप आवडतं. तुला माहितेय आम्हाला आमची कातडी ओली करून घ्यायला खूप आवडतं आणि पाण्यामध्ये किडे, छोटे मासे म्हणजे आमचा आवडीचा खाऊ.”

“शी घाण” मानसी पुन्हा ओरडली आणि सगळे मोठ्यांदा हसायला लागले.

“म्हणजे मी तुमच्या घरी आले तर तुम्ही मला तुमचा खाऊ देणार की काय?” ईई......

पुन्हा सगळे मोठ्यांनी हसले आणि छान दोस्त झाले. नंतर मानसी म्हणाली, "तुम्ही दगडासारखे कसे काय दिसता? एकदा तर मला वाटलं की दगडच उड्या मारत चाललाय नित बघितलं तेव्हा कळलं की तो बेडूक आहे म्हणून.”    

हो कारण जसे आम्ही पाण्यातले किडे खातो, तसं आम्हालाही दुसरे प्राणी खाऊ शकतात. साप, पाण्यातले पक्षी, मासे बदकं वगैरे. मग त्यांना कळू नये आणि त्यांनी आम्हाला पकडू नये म्हणून आम्ही अगदी दगडासारखेच दिसतो आहे की नाही मज्जा?

“हो म्हणजे जसं आम्ही फॅन्सी ड्रेस करतो तसच तुमचा हा दगडांचा फॅन्सी ड्रेस आहे हो ना?” पुन्हा तिघे मस्त हसले, खिदळले आणि त्या दोघांनी घरभर उड्या मारायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर मानसीसुद्धा घरभर बेडूक उड्या मारू लागली आणि हसत सुटली.

पण थोड्या वेळाने आवाज आला. “अगं, मानसी उ ssठ, झोपेत काय हसतेस? अगं, उठ पडशील पलंगावरून.”

तर काय? दचकून मानसीने डोळे उघडले तर समोर आई मग मानसीच्या लक्षात आला आणि ती हसत सुटली आणि म्हणाली “आई, त्यांना पाण्यातच राहायला आवडतं त्यांना कशाला पकडायचं जाऊ देत.”

“अगं, कोणाला?”, आईला काहीच कळल नाही. मानसी मात्र गालातल्या गालात हसत राहिली.

-अंजली अत्रे 

[email protected]